पातुर – निशांत गवई
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टि के व्ही चौकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. अकोला जिल्हा सेक्टर पेट्रोलिंग करत असताना, ठाणेदार शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाने चौकात आकस्मिक नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान, वाहनांची तपासणी केली असता, वाहन क्रमांक MH 04 HF 7230 मध्ये मोठ्या प्रमाणावर देशी दारू आढळली.
या वाहनामध्ये 31 पेट्या सेवन स्टार देशी दारू सापडल्या, ज्यांचा एकूण मूल्य 77,300 रुपये होता. याच्याबरोबर दोन मोबाईल (किंमत अंदाजे 25,000 रुपये) आणि एक क्रूझर गाडी (किंमत अंदाजे 70,000 रुपये) सुद्धा ताब्यात घेण्यात आले. एकूण 8,02500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
कारवाईदरम्यान, जगदीश बाबुराव ताजने (वय 27, पिंपरडोली, पातुर) आणि अमित अशोक ताजने (वय 35, नवेगाव, पातुर) यांना ताब्यात घेतले आहे. या दोघांवर कलम 65 (महाराष्ट्र दारूबंदी कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या सोबत पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम, हवालदार मजीत, वसीम, प्रवीण कश्यप, उदय शुक्ला आणि स्वप्निल चौधरी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या प्रकारची कारवाई महत्त्वाची ठरली आहे, पातुर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे.
निवडणुकीदरम्यान दारूची वाहतूक करणाऱ्यांना कडक कारवाईचे इशारे याव्यतिरिक्त, पोलिसांनी निवडणुकीदरम्यान दारूच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईचा इशारा स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार शंकर शेळके यांनीदिला आहे.
या प्रकारच्या घटनांमुळे आगामी निवडणुकीच्या शांततेसाठी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, याची पुरेशी काळजी घेतली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पातुर पोलिसांनी या कारवाईला मोठे यश मानले असून, आणखी तपासाची प्रक्रिया सुरू आहे.