Monday, November 18, 2024
Homeराज्य'हमे बटना है, या फिर जुड़ना है..? आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा...

‘हमे बटना है, या फिर जुड़ना है..? आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा सवाल…

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपुरात जाहीर सभा

चंद्रपूर् – नरेंद्र सोनारकर

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची राममंदिर उभारणीसह विविध स्वप्ने देशातील एनडीए सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण करीत आहे. महाराष्ट्र विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

तेव्हा ‘हमे बटना है,और कमजोर होना है, या फिर जुड़ना है और मजबूत होना है’ याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेनीं करायला पाहिजे.असे प्रतिपादन जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी बल्लारपूर येथे जाहीर सभेत बोलताना रविवारी(दि.17)केले. दरम्यान जनतेला काय हवे आहे, तर विकास..,विकास… विकास ..असे म्हणत महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मंचावर भाजपा महायुतीचे उमेदवार ना.सुधीर मुनगंटीवार,नेते चंदनसिंह चंदेल,श्रीनिवास गोमासे,हरीश शर्मा,अजय दुबे,निलेश खरबडे,काशी सिंह,समीर केने,शिवचंद द्विवेदी आदींची उपस्थिती होती. ना.पवन कल्याण यांनी मराठी,तेलगु व हिंदी या तीन भाषेतून भाषण केले.

ना.पवन कल्याण यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, मी येथे फक्त मते मागण्यासाठी आलो नाही. तर ज्या भूमीत अनेक महापुरुषांचा जन्म झाला, ज्या भूमीत अनेक संत जन्मले, ज्या भूमीत महान लोक होऊन गेले, त्या भूमीला मी नमन करण्यासाठी आलो आहे. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी..ज्या मातीने आपल्या हक्कासाठी लढायला शिकवले, त्या मातीचा आदर करायला आलो आहे.

ज्या मातीने स्वराज्य शब्दाला अर्थ दिला, त्या मातीचा आदर व्यक्त करायला आलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. अन्यायाला विरोध करण्यासाठी ते माझे प्रेरणास्थान आहेत.

त्यांनी मला निर्भयपणे सनातन धर्माचे रक्षण करण्याची प्रेरणा दिली.जनसेनेच्या सात तत्त्वांपैकी एक तत्त्व बाळासाहेबांनी प्रेरित केलेले आहेत. प्रादेशिकतेकडे दुर्लक्ष न करता राष्ट्रवाद, सत्तेची पर्वा न करता स्वतःच्या तत्वांवर ठाम राहायचे असते हे मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो, मी जनतेला महायुतीला विकासासाठी साथ मागायला आलो आहो असेही पवन कल्याण यांनी सांगितले.

पवन कल्याण यांनी यावेळी महायुती आणि मोदी सरकारच्या कामांचा पाढाही वाचला. देशातील गेल्या दहा वर्षांच्या एनडीएच्या राजवटीवर नजर टाकली तर अयोध्येत 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रामाला त्यांचे स्थान मिळाले. एनडीएच्या राजवटीत देशाला जोडणारे रस्ते दिसू लागले आहेत.

गावोगावी रस्ते पसरलेले दिसतात. गेल्या दहा वर्षांत एनडीए सरकारने 25 कोटी भारतीयांना गरिबीतून बाहेर काढले आहे. 5 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला आहे. पीएम किसानच्या माध्यमातून 12 कोटी लोकांना फायदा झाला आहे. अशी यादीच पवन कल्याण यांनी वाचून दाखवली.

पांडुरंगाच्या महाराष्ट्रात मी प्रचारवारीसाठी निघालो हे माझे सौभाग्य

ना.कल्याण यांनी मराठीतून बोलण्यास सुरुवात करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच मराठी भाषेचा मी सन्मान करतो, त्यामुळे काही चुकले तर माफी असावी, असेही त्यांनी विनम्रपणे म्हटले.

भाषणात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज याचा गौरव केला. तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. बोलता बोलता चूक झाली असेल तर माफ करा. पांडुरंगाच्या वारीची प्रथा असणाऱ्या या महाराष्ट्रात मी प्रचारवारीसाठी आलो आहो.

किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ कल्याण यांचा चंद्रपुरात रोड शो..
आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण यांनी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन चंद्रपूरकरांना केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, भाजप विधानसभा अध्यक्ष प्रमोद कडू, अजय जयसवाल, रघुवीर अहिर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

पवन कल्याण यांच्या रॅलीला शहरातील स्थानिक बागला चौकातून सुरुवात झाली. यावेळी पावर स्टार पवन कल्याण यांना पाहण्यासाठी नागरिकांनी रोडच्या दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी पवन कल्याण यांनी सर्वांना अभिवादन केले.

कल्याण मंडपम उभारणार-मुनगंटीवार
बल्लारपूरला मिनी इंडिया म्हंटले जाते.सर्व जातीधर्माचे लोकं येथे राहतात.तेलगू भाषिकांसाठी ना.पवन कल्याण यांना खास निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी ना. मुनगंटीवार यांनी शहरातील विविध समाजातील लोकांसाठी केलेल्या विकास कामांचा हिशेब देत,तेलगू समाजासाठी बल्लारपुरात कल्याण मंडपम उभारण्याचे आश्वासन दिले.

प्रशांसाकाच्या तोबा गर्दीने भारावले ना पवन कल्याण,
ना पवन कल्याण हे उपमुख्यमंत्री असले तरी मुळात ते सिने कलाकार आहेत.पॉवर स्टार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या या हिरोला बघण्यास तेलगू भाषिकांनी एकच गर्दी केली.प्रशसकांच्या घोषणाबाजीने ते भारावले.महाराष्ट्रात तुम्ही मराठी शिकलात,या मातीच्या सेवेसाठी आलेल्या मुनगंटीवार यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: