Saturday, November 16, 2024
Homeराज्यमहाराष्ट्राचा गौरव प्रस्थापित करण्यासाठी महायुतीला विजयी करा - केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह...

महाराष्ट्राचा गौरव प्रस्थापित करण्यासाठी महायुतीला विजयी करा – केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह…

चंद्रपूर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा…

चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर

देशाचे दूरदर्शी नेतृत्व पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे योगदान हे लक्षणीय आहे. मात्र मध्यल्या अडीच वर्षाच्या काळात यात मोठी तफावत निर्माण झाली. महाराष्ट्राचा गौरव घालविण्याचे प्रयत्न झाले. महाराष्ट्राचे हे गौरव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी महायुतीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री श्री. अमीत शाह यांनी चंद्रपूरच्या जनतेला केले.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे उमेदवार ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित सभेला ते संबोधित करत होते. यावेळी मंचावर श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. अमीत शाह म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या प्रगती आणि उन्नतीसाठी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी १५ लाख करोड रुपये दिले आहे. याशिवाय अनेक प्रकल्प सुद्धा राज्यात दिले आहेत. येत्या २० तारखेला महायुतीच्या उमेदवारांना मत देऊन महाराष्ट्राचे गौरव प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

जनतेला संबोधित करताना ते म्हणाले, आपले एक मत भारताच्या भविष्याला मजबूत करेल, शेतकऱ्यांना समृद्ध करेल, लाडक्या बहिणींना त्यांचा अधिकार आणि सन्मान देईल, तरुणांना रोजगार देईल. तसेच महाराष्ट्राची संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मवीर संभाजी महाराज या सर्वांचा सन्मान करण्याचे काम आपले एक मत करेल, असे ते म्हणाले.

विरोधकांवर बरसले ना. श्री. सुधीर मुनगंटीवार

ईश्वराच्या भक्तीचे मार्ग अनेक असतील. पण ईश्वर एक आहे, असा संदेश ज्या गुरूनानक देवांनी दिला, त्यांना ना. श्री. मुनगंटीवार यांनी सुरूवातीलाच नमन केले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. 55 वर्ष केंद्रात आणि 50 वर्ष राज्यात काँग्रेसची सत्ता होती. राज्यात गेल्या पाच वर्षांतही 2 वर्ष 8 महिने काँग्रेस – महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात होते.

या काळात त्यांनी काय केले, हे न सांगता, आम्ही काय केले, असा उलटा प्रश्न काँग्रेस नेते विचारत आहेत. त्यांच्या या प्रश्नाला ना. श्री. मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तर दिले. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘ज्या-ज्या गावांमध्ये मी प्रचारासाठी जातोय, तेथे लोकांना विचारतो की, काँग्रेसने केलेले एक तरी काम आठवून सांगा. तेव्हा लोक डोक्याला ताण देतात, पण काँग्रेस नेत्यांनी केलेलं एकही काम त्यांना आठवत नाही. दुसरीकडे आम्ही केलेल्या कामांची यादी संपता संपत नाही.’

महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या

राजुरा विधानसभा मतदारसंघातून देवराव भोंगळे लढत आहेत. ‘जो करता है सेवाभाव, उसका ही नाम देवराव’, असे म्हणत ना. श्री. मुनगंटीवार यांनी देवराव भोंगळे यांची प्रशंसा केली. किशोर जोरगेवार चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. ‘अबकी बार किशोर जोरगेवार’, असे म्हणत जोरगेवार यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी चंद्रपूरकरांना केले.

चिमूर मतदारसंघातून बंटी भांगडिया,भद्रावती-वरोऱ्यातून करण देवतळे यांना तर ब्रम्हपुरीतून कृष्णा सहारे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी जनतेला आवाहन केले.

आमिषाला बळी पडू नका

कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा, असेही आवाहन त्यांनी केले. हजारो लोकांनी प्राणांची आहुती दिली, तेव्हा कुठे आज शाईचा थेंब तुमच्या बोटांवर येतो.

याच बलिदानामुळे आपल्याला लोकशाहीची फळं चाखायला मिळत आहेत. आज भगवान बिरसा मुंडा यांच्या जनजातीय गौरव दिनानिमित्त संकल्प करा आणि महायुतीच्या सोबत राहा, असे आवाहनही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: