Saturday, November 16, 2024
HomeMarathi News Todayभारसाखळे फसले हितशत्रूंच्या गराड्यात…आकोट वरील त्यांच्या अंतिम स्वारीत फितूरीची शक्यता...त्याने मोहिम फसणार...

भारसाखळे फसले हितशत्रूंच्या गराड्यात…आकोट वरील त्यांच्या अंतिम स्वारीत फितूरीची शक्यता…त्याने मोहिम फसणार कि फत्ते होणार?

आकोट- संजय आठवले

आपल्या स्वपक्षीयांनाच आपल्या दबावाखाली ठेवून त्यांची मुस्कटदाबी करणारे भारसाखळे आता आपल्या हितशत्रूंच्या गराड्यात फसले असून त्यांच्या करामतीमुळे भारसाखळे यांचे मार्गात अडचणींचे डोंगर उभे होऊ लागले आहेत. त्यामुळे आकोट तेल्हारा मतदार संघावर केलेल्या त्यांच्या ह्या अंतिम स्वारीची मोहीम फसणार की फत्ते होणार याबाबत वेगवेगळ्या अटकळी लावल्या जात आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये आपल्या विजयाबाबत आश्वस्त असलेले भारसाखळे यांचे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मात्र या अटकळींनी डळमळीत झाल्याचे दिसत आहे.

आकोट मतदार संघात सद्यस्थितीत एकूण ११ उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. सार्‍यांचा प्रचारही जोमात सुरू झालेला आहे. या प्रचारादरम्यान भारसाखळे वगळता अन्य दहा उमेदवारांचा मतदारांवर प्रतिकूल परिणाम होईल असा एकही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला नाही. परंतु प्रकाश भारसाखळे हे एकमेव ऊमेदवार ह्याला अपवाद ठरलेले आहेत. प्रचारा दरम्यान एका सभेतच झोपी गेल्याचा त्यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. त्या फोटोची चर्चाही तितक्याच वेगाने सुरू आहे. त्यासोबतच या फोटोच्या व्हायरल झाल्याने काही तथ्येही समोर आली आहेत.

ह्या फोटोचे बारकाईने अवलोकन केले असता ध्यानात येते कि, भारसाखळे यांचेसोबत असलेल्या टीम मधीलच कुणीतरी हा फोटो काढलेला आहे. फोटो घेणाराने निद्राधिन भारसाखळे यांचा नेमका क्षण टिपला आहे. म्हणजेच फोटो काढणाऱ्यास नेमका क्षण टिपण्याचे कौशल्य अवगत आहे. विशेष म्हणजे राजरोसपणे तो हे काम करीत आहे. यावरूनच हेही चटकन ध्यानात येते कि, भारसाखळे आपल्या सोबत आपल्या हितशत्रूंना घेऊन फिरत आहेत. परिणामी भारसाखळे यांनी कौशल्याने लपविलेली त्यांची गुपिते ऊजागर होत आहेत.

अशा स्थितीत भारसाखळे यांच्या गतकाळाचा मागोवा घेतला असता ह्या प्रकारांना भारसाखळे स्वतःच जबाबदार असल्याचे ,ध्यानात येते. गत काळात त्यांनी स्वपक्षियाना उगीच दुखावलेले आहे. त्यांचेवर आपल्या गुप्तहेरांकरवी पाळत ठेवून त्यांना जरबेत ठेवण्याचा प्रयोग केलेला आहे. त्यांना कोणतेही श्रेय मिळू न देण्याची खबरदारी घेतलेली आहे. डॉक्टर रणजीत पाटील यांचे समर्थक म्हणून कैकांना जाच केलेला आहे. अनेकांना पक्षीय कार्यातून बाद करण्याचे डाव रचले आहेत. कित्येकांना आपल्या भाषणातून शाब्दिक डागण्या दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बाबत या लोकांमध्ये स्वभाविकपणे बदल्याची भावना निर्माण झालेली आहे.

“पेराल ते उगवेल” हा निसर्गाचा निर्विवाद नियम आहे. सद्यस्थितीत तो नियम भारसाखळे यांना चपखलपणे लागू होत आहे. जे त्यांनी पेरले ते आता उगवू लागले आहे. त्यामुळेच भारसाखळे यांचे खरे रूप साऱ्यांना कळावे म्हणून असे फोटो आणि व्हिडिओ मतदारांसमोर आणले जात आहेत. वास्तविक पाहता हे कार्य अतिशय कौतुकास्पद असून वाखाणण्याजोगे आहे. कारण त्यायोगे आपल्या उमेदवाराची संपूर्ण पात्रता तपासून मतदार विचारपूर्वक आपले मत देऊ शकणार आहेत.

परंतु भारसाखळे यांचे प्रचाराकांकडून मात्र हा फोटो व्हायरल करणे हे भारसाखळे यांचे विरोधात षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मात्र हा फोटो व्हायरल करणे हा मतदारांना सावध करण्याचा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे मतदारांना सावध करणारांमध्ये आकोट मतदार संघातीलच नव्हे तर दर्यापूर अंजनगाव येथील लोकांचाही समावेश आहे. यातील अनेकजण भारसाखळे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी खांद्याला खांदा लावून भारसाखळे यांना सहकार्य केलेले आहे. त्यामुळे या लोकांना भारसाखळे यांचे सर्वच डावपेच अवगत आहेत.

आता निवडणुक अंतिम टप्प्यात शिरलेली आहे. निवडणुकीच्या रिवाजानुसार मतदानापूर्वीचे दोन दिवस अतिशय भारी असतात‌. अशा स्थितीत भारसाखळे यांचे पासून मतदारांना सावध करणारांच्या मते या दोन दिवसात भारसाखळे निर्णायक हालचाली करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा हालचालींची गुपिते ठाऊक असलेली ही मंडळी भारसाखळे यांचे हालचालीवर पाळत ठेवून आहेत. परिणामी कोणतीही अनुचित हालचाल भारसाखळे यांना जड जाणार असल्याचे संकेत आहेत.

आकोट मतदार संघातील भारसाखळे यांचे जोखड हटविणेकरिता या लोकांकडून काटेकोर व्यूहरचना आखली जात आहे. अशा अवस्थेत वृद्धापकाळाने त्रस्त व व्याधीग्रस्त असलेले भारसाखळे यांची आकोट वरील अंतिम स्वारीची ही मोहीम फसणार असल्याचे मानले जात आहे. मजेदार म्हणजे याची जाणीव भारसाखळे यांचे प्रचार कम्पुलाही आलेली आहे. त्यामुळेच ही प्रचारमंडळी भारसाखळे यांचे समक्ष काहीही पोपटपंची करित असली तरी त्यांचे पश्चात मात्र गहीरी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: