आकोट – संजय आठवले
विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केल्यानंतर उमेदवारीची लॉटरी लागलेल्यांची लगबग सुरू झाली असून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमध्ये मात्र तगमग वाढीस लागली आहे.
त्यामध्ये आकोटचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांचा समावेश असून त्यांची उमेदवारी आमच्यामुळेच वांध्यात आली असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे. सोबतच भारसाखळे यांचे ऐवजी कुण्या तरी स्थानिक नेत्यालाच भाजपा उमेदवारी देणार असल्याचे या नेत्यांनी महा व्हाईस न्यूज ला सांगितले.
आमदार भारसाखळे यांची उमेदवारी रोखल्याचे पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा भाजपाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर गजानन महल्ले यांनी महाव्हाईस न्यूजशी संवाद साधला. त्यावेळी डॉक्टर महाले यांनी मतदारसंघातील निष्ठावान घराण्यांच्या इतिहासाला उजाळा दिला.
अशा निष्ठावंतांना थांबण्याच्या सूचना देऊन भाजप श्रेष्ठींनी सन २०१४ मध्ये प्रकाश भारसाखळे यांना उमेदवारी दिली. यावर खेद व्यक्त करून डाॅ. महल्ले म्हणाले की, पक्षहित तथा पक्षाची निष्ठा कायम ठेवणेकरिता इच्छा नसूनही आम्ही सर्व लोकांनी भारसाकळे यांचा स्वीकार केला.
वास्तविक भारसाखळे हे कोणत्याच पक्षाशी प्रामाणिक नव्हते. अनेक पक्ष बदल करून ते भाजपात आले. तेही केवळ निवडणूक लढविण्याकरिताच. पक्ष निर्माण अथवा पक्ष बांधणीशी त्यांचे काहीही योगदान नाही. म्हणून त्यावेळीही आम्ही सर्वांनी स्थानिक उमेदवाराची मागणी केल्याचे महल्ले यांनी सांगितले.
पण पक्षादेश म्हणून आम्ही भारसाखळे यांचेशी जुळवून घेतले. त्यांना आमदार केले. पण याबाबत ते कधीही नेते कार्यकर्त्यांचे ऋणी राहिले नाहीत. नंतर २०१९ च्या निवडणुकीतही आम्ही त्यांना आमदार बनवले. पण ते नेते व कार्यकर्ते यांच्याशी नेहमीच फटकून वागत होते.
त्यांना प्रत्येक भाषणातून टोमणे मारणे, त्यांचा पाणउतारा करणे, ते कधीच मोठे होणार नाहीत याची नेहमी काळजी घेणे या प्रकारातच भारसाखळे मशगुल राहिले. त्यामुळे त्यांचे प्रति भाजपा नेते व कार्यकर्त्यांमध्ये कधीच सुसंवाद राहिला नाही. त्यांची ही वागणूक आम्ही वारंवार पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली.
आता २०२४ ची निवडणूक आहे. आताही आम्ही सर्व लोकांनी आम्हाला स्थानिक उमेदवार हवा असल्याचे पक्षश्रेष्ठींना आवर्जून सांगितले आहे. त्याचा परिणाम होऊन पक्षश्रेष्ठी आकोट येथे स्थानिक उमेदवार देण्याचे मनस्थितीत आहे. त्याकरिताच आमदार भारसाखळे यांची उमेदवारी रोखून धरण्यात आली आहे.
डॉक्टर गजानन महल्ले यांचे सुरात आकोट पालिका माजी सभापती मंगेश चिखले यांनीही आपला सूर मिळविला. ते म्हणाले कि, आमदार भारसाखळे आता वृद्ध झाले आहेत. कर्णबधिरता, डायबिटीस, उच्च रक्तदाब अशा व्याधींनी त्यांना ग्रासले आहे. अशा स्थितीत त्यांचेकडून तडफदार कामांची अपेक्षा करणे चूक आहे.
अगदी देवेंद्र फडणविस यांचे सभेत चक्क मंचावरच झोपून आमदार भारसाकळे यांनी आपण थकल्याची ग्वाही दिलेली आहे. पक्षीय धोरणाबाबत चिखले म्हणाले कि, पक्षाने महाराष्ट्रात गुजरात पॅटर्नचा प्रयोग करण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार वृद्ध अथवा व्याधीग्रस्त लोकांनी आता विश्राम करावा असा पक्षाचा मानस आहे.
त्याकरिता भारसाखळे यांना आहेत त्याच ठिकाणी थांबवून त्यांचे जागी कुणीतरी स्थानिक उमेदवार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भाजपाच्या पहिल्या यादीत भारसाखळे यांचे नाव वगळण्यात आले आहे. म्हणून आम्ही सर्व लोकांना विश्वास आहे कि, यावेळी पक्षश्रेष्ठी सर्व बाजूंचा सारासार विचार करून स्थानिक उमेदवार निवडणुकीत उतरवणार आहे. त्याकरिताच नव्या उमेदवाराच्या शोधार्थ मुंबई मुक्कामी भाजप श्रेष्ठींचा खल सुरू आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक उमेदवारांमध्ये स्वतः डॉक्टर गजानन महल्ले, डॉक्टर राजेश नागमते, ऍडव्होकेट विशाल गणगणे, माजी सभापती मंगेश चिखले, कॅप्टन सुनील डोबाळे, राजेश पाचडे, डॉक्टर रणजीत पाटील, राजेश पुंडकर, तेल्हारा माजी नगराध्यक्ष सौ. जयश्री पुंडकर, श्रीमती स्मिताताई राजनकर, सौ शोभाताई बोडखे ही नावे इच्छुकांचे यादीत आहेत.
त्यामुळे या साऱ्यांना डावलून आमदार भारसाखळे हे आकोटची उमेदवारी प्राप्त करण्यात सफल झाले तर हे मोठे आश्चर्य मानावे लागेल. आणि हे आश्चर्य घडलेच तर आकोट मतदार संघात भाजपा गोटात मोठा असंतोष निर्माण होऊन त्याचा फटका भाजपाला बसणार आहे हेही उघड सत्य आहे.