Wednesday, October 16, 2024
Homeराज्यदानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा रत्नागिरीत उभारणार भव्य पूर्णकृती पुतळा, ८ रोजी...

दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा रत्नागिरीत उभारणार भव्य पूर्णकृती पुतळा, ८ रोजी उदयजी सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन..!

भागोजीशेठ यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्मारक उभारणीचा भंडारी समाजाला दिलेला शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी पाळला!

गणेश तळेकर

रत्नागिरी – भंडारी समाजाचे श्रद्धास्थान, दानशूर, भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा रत्नागिरीत व्हावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी शब्द दिला होता.

त्यानुसार भंडारी समाजाला दिलेला हा शब्द पाळत भागोजीशेठ यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता साळवी स्टॉप येथील भागोजीशेठ कीर प्रवेशद्वाराशेजारी पालकमंत्री उदय सामंत करणार आहेत. याबद्दल रत्नागिरीतील समस्त भंडारी समाज व रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे आनंद व्यक्त करून पालकमंत्री सामंत यांचे आभार मानण्यात येत आहेत.

रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील प्रवेशद्वाराशेजारी भागोजीशेठ कीर यांचा हा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याशेजारी भागोजीशेठ यांच्या महान कार्याची महती सांगणारे शिलालेखही स्थापित करण्यात येणार आहेत. या स्मारकाद्वारे त्यांचे अखंड मानवतेसाठी केलेले कार्य संपूर्ण रत्नागिरीकरांना प्रेरणादायी ठरणार आहे. समस्त रत्नागिरीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

भागोजीशेठ कीर यांनी आपल्याला जे मिळाले नाही ते इतरांना मिळावे, आपल्याकडे जे आहे ते आपले नसून ईश्वराचे आहे असे मानून आपली स्वकष्टार्जित सर्व संपत्ती संपूर्ण मानवतेसाठी अर्पण केली. त्यांनी स्वखर्चाने देशातील पहिले पतित पावन मंदिर बांधले, महाराष्ट्रात अनेक शाळा, गोशाळा, धर्मशाळा, महीला विद्यालय, मंदिरे, पाणवठे, विहिरी, स्मशानभूमी, स्वखर्चाने बांधून लोकार्पण केल्या.

त्यांच्या या महान कार्यामुळे श्रीमान भागोजीशेठ कीर हे भारतातले एकमेव आधुनिक कर्ण ठरले आहेत. रत्नागिरीत उभारल्या जाणाऱ्या पुतळ्याद्वारे रत्नागिरीच्या या सुपुत्राचा आता आपल्या पतीतपावन भूमीत योग्य सन्मान होणार आहे.

भागोजीशेठ कीर यांचा हा पुतळा कसा असावा यासंदर्भात पालकमंत्री उदयजी सामंत यांनी रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर यांच्याशी चर्चा केली होती.

भागोजीशेठ यांचा खुर्चीवर स्थानापन्न असा फोटो कांचन मालगुंडकर यांनी सामंत यांना दाखवला असता, तो त्यांच्या पसंतीस उतरला आणि त्यानुसार पुतळ्याची पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येत आहे. लवकरच हा पुतळा रत्नागिरीच्या प्रवेशद्वाराशेजारी स्थापित होणार आहे.

पालकमंत्री सामंत यांना रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर यांनी पुतळ्याचे स्वरूप ठरविण्यासाठी जेव्हा भागोजीशेठ यांची फोटो फ्रेम देऊ केली त्यावेळी समाजाचे माजी नगरसेवक सुदेशजी मयेकर व युवा भंडारी मंथन मालगुंडकर उपस्थित होते. समाजासाठी वारंवार पाठपुरावा करणारे संघाचे अध्यक्ष राजीवजी कीर यांचे यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

तरी दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला 8 रोजी सायंकाळी 4 वाजता साळवी स्टॉप येथे भंडारी समाज बांधव व समस्त रत्नागिरीकर बांधवानी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे करण्यात आले आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: