Wednesday, October 16, 2024
Homeराज्यअमरावतीत जमाव बंदीचा आदेश; पोलिसांचा लाठीचार्ज, पोलीस ठाण्यावर दगडफेक...

अमरावतीत जमाव बंदीचा आदेश; पोलिसांचा लाठीचार्ज, पोलीस ठाण्यावर दगडफेक…

न्युज डेस्क – अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास जमावानं दगडफेक केल्यानं प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या संपूर्ण घटनेमुळे अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली.

काय आहे प्रकरण : उत्तर प्रदेशातील यती स्वामी नरसिंह महाराज यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जमाव शुक्रवारी दुपारी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला होता. प्रकरण उत्तर प्रदेशातलं आहे असं कारण देत पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही, असा या जमावानं केला. दरम्यान पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याबाबत सायंकाळपर्यंत नागपुरी गेट परिसरात चर्चांना उधाण आलं. रात्री दहा वाजताच्या सुमारास मोठा जमाव पोलीस ठाण्यावर धडकला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी संबंधित तक्रार नोंदवण्यास तयारी दर्शविली. मात्र जमावानं अचानक पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्यानं खळबळ उडाली.

दगडफेक, वाहनांची तोडफोड : संतप्त जमावानं नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यासह पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. परिस्थितीचं गांभीर्य पाहता दंगा नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस कुमक नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या परिसरात दाखल झाली. दगडफेक करणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या सर्व घटनेत काही पोलीस जखमी झाले. दुसरीकडं पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जमावातील अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस आयुक्त पोहोचले घटनास्थळी : पोलीस ठाण्यावर जमावानं दगडफेक केल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे नागपुरी गेट पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी सर्वात आधी परिसरात निर्माण झालेला तणाव निवळण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्तांच्या वतीनं करण्यात आला. या दगडफेकीसाठी जबाबदार असणारे आणि परिसरातील नागरिकांना भडकवणाऱ्या विशिष्ट व्यक्तींविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिले. “शहरात नवरात्रोत्सव सुरू आहे.

कुठं कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. कुठल्याही अफवांना बळी पडू नये, शहरात शांतता टिकवून ठेवावी,” असं आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केलं आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमाबंदीचा आदेश देखील पोलीस आयुक्तांनी जारी केला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: