Saturday, December 21, 2024
Homeगुन्हेगारीमाझोडच्या इतिहासात पहील्यांदाच सरपंच पती, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या समवेत पंधरा जणांवर अनु.जाती,...

माझोडच्या इतिहासात पहील्यांदाच सरपंच पती, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या समवेत पंधरा जणांवर अनु.जाती, जमाती अत्याचार प्रतीबंधक अधिनियमा अन्वये गुन्हे..!

पातूर – निशांत गवई

पो. स्टे.अंतर्गत येणाऱ्या माझोड येथील सरपंच पती, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या समवेत इतर पंधरा नागरिकांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये गुन्हे दाखल झाल्यामुळे आणि माझोड गावच्या इतिहासात पहील्यांदाच असा गुन्हा दाखल झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे गावात सर्व समाज वर्षांनूवर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत असताना ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे गावावर ही नामुष्कीची वेळ आल्याचे बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे ज्यांच्यावर हे गुन्हे दाखल झाले ते माजी सरपंच गजानन लाहुडकार व माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पाटील हे गेल्या पंधरा वर्षांपासून ग्राम पंचायतच्या राजकारणात सक्रिय आहेत. तेव्हा अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया त्यांना माहीत नसावी याचे आश्चर्य वाटत आहे.

त्यामुळे आपण पंधरा वर्षांपासून कुणाच्या हातात गावं देत आहोत हा विचार करण्याची वेळ येथील मतदारांवर आली आहे. अमोल डाबेराव यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार त्यांच्या झोपडीतील सामान ट्रॅक्टर मध्ये भरून ग्राम पंचायत मध्ये आणण्यात आले.आणि झोपडी जाळून टाकण्यात आली.या वेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून एक लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान केले.

या तक्रारी वरून माजी ग्रा. प.सदस्य संतोष पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पुंडे, सरपंच पती गजानन लाहुडकार, ग्राम पंचायत सदस्य शिवलाल ताले, तसेच योगेश पुंडे, गणेश काळे, मोहन काळे, विनायक काळे, विलास पुंडे, रामभाऊ पुंडे, राम निंबेकर , छोटू म्हैसने ,गणेश निंबेकर, विठ्ठल पुंडे, महादेव पुंडे आदी पंधरा जणांवर भारतीय न्याय संहिता (बि.एन.एस.)२०२३,१८९(२), २९६,११५(२),३२६(जी),३२३ तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनयम १९८९ अन्वये ३(१)(२०), ३(१)(५),३(२)(Va) आदी गुन्हे दाखल करण्यात आले.

तसेच प्रमोद सोळंके यांनी दिलेल्या तक्रारनुसार त्यांनी कसलेल्या शेतात बकऱ्या चारून ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या तक्रारी वरून सरपंच पती गजानन लाहुडकार ,गणेश निंबेकर ,राम निंबेकर ,मोहन काळे, विलास पुंडे, रामभाऊ पुंडे, महादेव पुंडे ,नितीन हरिदास पुंडे, अनिल म्हैसणे, व सुनील भड आदिवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माजी सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांच्या समजदारीला दाद!

हा सर्व प्रकार घडल्यामुळे माजी सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांच्या समजदारीला गावकऱ्यांनी दाद दिली आहे. कारण त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन सिईओ आयुष प्रसाद यांना आणल्यानंतर भर पावसात वेळेवर सभागृह न देणे, त्यांनी केलेल्या कामांचे छायाचित्रे ग्राम पंचायत मधून काढून टाकणे, सरपंच नामफलकावरून त्यांचे नाव खोडणे, सरपंच नाम फलक गायब करणे आदी प्रकार विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केले आहेत.

हे सर्व प्रकार जाती वादात मोडतात. मात्र आपल्या गावातील नागरिकांवर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती सारखा भारी गुन्हा दाखल होऊ नये तसेच गावाचे नाव खराब होऊ नये या उदात्त हेतूने सरपंच खंडारे यांनी गावाच्या पलीकडे हा विषय जाऊ दिला नाही. त्यामुळे त्यांच्या समजदारीला ग्रामस्थ सलाम करीत आहेत.

आता तरी नामफलक व फोटो लावावे

किमान या घटनेचा बोध घेऊन तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी काढून टाकलेले सरपंच नामफलक व केलेल्या कामांचे छायाचित्रे ग्राम पंचायत कार्यालयात लावावी अशी मागणी माजी सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी केली आहे. या आधी त्यांनी दोन वेळा तसे लेखी निवेदने ग्राम पंचायतीला दिली आहेत.

लाहुडकार यांना सरपंच पद लाठी नाही

गजानन लाहुडकार हे सरपंच असताना त्यांनी गावातील विठ्ठल मंदिराच्या ओट्याचे अतिक्रमण काढले होते. यात त्यांनी संपूर्ण गावाचा रोष ओढवून घेतला होता. अशातच त्यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले होते. आत्ताच्या घडीला सुद्धा अतिक्रमण काढण्यावरूनच त्यांच्यावर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियमा अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गजानन लाहुडकार यांना सरपंच पद लाठी नाही असे बोलल्या जात आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: