Wednesday, October 16, 2024
HomeSocial Trendingगुजरात पॅटर्नमुळे आमदार भारसाखळे निराधार...गडकरींचा आधारही ढासळणार…खासदार धोत्रेंचीही सावध भूमिका…

गुजरात पॅटर्नमुळे आमदार भारसाखळे निराधार…गडकरींचा आधारही ढासळणार…खासदार धोत्रेंचीही सावध भूमिका…

आकोट – संजय आठवले

राज्यातील पाऊस परतीला लागला आहे. मात्र राज्यातील राजकीय समुद्रात भरती ओहोटीच्या खेळाला चांगलीच रंगत असून उमेदवार निवडीकरिता भाजपाने यावेळी गुजराथ पॅटर्न ची चाळणी लावण्याची घोषणा केल्याने दुबार तिबार चान्स करिता टपून बसलेल्या इच्छुकांना जोरदार झटका बसला आहे. या झटका मशीनच्या घेर्‍यात आकोटचे आमदार प्रकाश भारसाखळेही आले असून त्यांचे आधारस्तंभ गडकरी आणि पाठीराखे खासदार धोत्रे हे सुद्धा गुजराथ पॅटर्न पुढे हतबल झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आकोटचे हे विकास पुरुष निराधार झाल्याचे चित्र आहे.

सन २००९ मध्ये दर्यापूर मतदारसंघ आरक्षित झाला. त्याने भारसाखळे निराधार झाले. परंतु “जलबीन मछली” आणि “आमदारकी बिन भारसाखळे” जिवंतच राहू शकत नाहीत. अशी गत असल्याने भारसाखळे यांनी यापूर्वीच आकोट मतदार संघ हेरून ठेवलेला होता. मात्र त्यांना कोणीच उमेदवारीचा चारा न टाकल्याने त्यांनी आकोटातून अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. परंतु त्यांना पुढील २५ वर्षे दर्यापूर विना राहावयाचे होते. त्यामुळे त्यांनी हा काळ व्यतीत करणेकरिता आकोटचा लळा काही कमी केला नाही.

उलट सन २०१४ मध्ये त्यांनी गडकरींचे अधिपत्य स्वीकारून भाजप प्रवेश केला. आणि आकोटची उमेदवारी पदरात पाडून घेतली. यावेळी त्यांचे भाग्य फळफळले. आणि गावठी बनावटीचे हे चालू मॉडेल आकोटकरांनी सहर्ष स्वीकारले. त्यातच भरीत भर म्हणून आकोट व तेल्हारा नगर परिषदाही भाजपच्या ताब्यात आल्या. आणि भारसाखळे यांना पंख फुटले. त्यांनी सर्वात आधी आकोट तेल्हारा तालुक्यातील भाजप आपल्या मुठीत घेतली. त्यांचे मर्जीविना कोणतेही काम होणार नाही, कुणी नेता, कार्यकर्ता डोके वर काढणार नाही, ही काळजी त्यांनी डोळ्यात तेल टाकून घेतली. त्यातच पाच वर्षे निघून गेले.

त्यानंतर सन २०१९ मध्ये पुन्हा विधानसभा निवडणूक लागली. भारसाखळे पुन्हा विजयी झाले. आणि अहंकार त्यांचे अंगोअंगी भिनला. त्या पोटी मतदारसंघातील नेते कार्यकर्त्यांना सौम्य पण जिव्हारी लागेल असे बोल ते बोलू लागले. आणि त्याचे दुष्परिणाम ही दिसणे सुरू झाले. इतके कि, आता २०२४ ची विधानसभा घोषित होण्याचे टप्प्यात असतानाच भारसाखळे यांचे विरोधात पक्षांतर्गतच शड्डू ठोकले जाऊ लागले आहेत. नागरिकांमध्येही त्यांचे विरोधी वातावरण बनू लागले आहे

भारसाखळे यांना याची पूर्ण कल्पना आहे. पण त्यांना आपल्या कपटनीतीवर पूर्ण भरवसा आहे. या नीतीमुळेच त्यांनी आपल्या प्रथम निवडणुकीत पाटील, कुणबी आणि मुस्लिमांवर आपले गारुड निर्माण केले होते. पण त्यात ते सफल झाले नाहीत. परंतु दुसऱ्या निवडणुकी या गारुडाचा त्यांना मोठा लाभ झाला. पण पाटील समूहाने त्यांचा कावा ओळखून त्यांचे कडे पाठ फिरवली. त्यामुळे तिसऱ्या निवडणुकीत भारसाखळे यांनी कुणबी समूहाला चकविले आणि विजय खेचून घेतला. परंतु आता पाटील, कुणबी आणि मुस्लिम भारसाकळे यांचे प्रभावात नाहीत. कामापुरते मानलेले सगे सोयरे आणि आपल्या कामांच्या भरोशावर आपली नैया पार लागण्याची त्यांना आशा आहे.

पण वास्तव पाहिले तर त्यांनी केलेली कामे मुळीच विकास पुरुषाच्या लायकीची नाहीत. त्यांच्या ह्या कामांची “सुधारने निकले बिगाड के बैठे” अशी गत आहे. त्याचा उहापोह निवडणूक काळात प्रचारादरम्यान होणारच आहे. त्यामुळे ह्या कामांचा त्यांना लाभ होण्याची शक्यता तशी कमीच आहे. तरीही मागील लोकसभेत नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांना आकोट मतदार संघातून मताधिक्य दिल्याचा दावा भारसाखळे यांचा आहे. त्यामुळे धोत्रेंच्या शिफारशीमुळे भाजपची उमेदवारी मिळण्याची त्यांना आशा आहे. परंतु त्यांची अनेक वैगुण्ये भाजप श्रेष्ठींकडे पाठविण्यात आलेली आहेत. एकदा तर चक्क फडणवीसांच्या सभेतच गाढ झोपण्याचा पराक्रम भारसाखळे यांनी केलेला आहे.

मजेदार म्हणजे आपण ठणठणीत असल्याची बतावणी ते नेहमी करीत असतात. तर त्यांचे विरोधक त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य वाढल्याचे सांगतात. अशा स्थितीत सभा मंचावर झोपल्याने भारसाखळे आता थकल्याचे फडणवीसंना कळून चुकले आहे. अशा स्थितीत भारसाखळे तिसऱ्यांदा विधानसभेच्या बोहल्यावर चढण्यास उत्सुक आहेत. पण अकोटकरांच्याच सुदैवाने अमित शहा यांनी महाराष्ट्रात गुजराथ पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली आहे. त्या पॅटर्नचे निकषानुसार तिसऱ्या उमेदवारी करिता भारसाखळे पूर्णतः नापास ठरतात. तर काही राजकीय पेचांमुळेही त्यांच्या उमेदवारीला सुरूंग लागलेला आहे.

त्यातील पहिला पेच आहे डॉ. रणजीत पाटील यांचा. आपल्या ह्या अंतरंग मित्राचे पुनर्वसन करणेकरिता खुद्द फडणवीस प्रयासरत आहेत. त्याकरिता आकोटचा पर्याय त्यांचे नजरेत आहे. दुसरा भाग आहे मंत्रीपदाचा. भारसाखळे यांना उमेदवारी दिल्यास आणि ते निवडून आल्यास जुना जाणता म्हणून त्यांचा मंत्रीपदावर जबर दावा राहणार आहे. पण हा दावा फडणवीसांकरिता डोकेदुखी आहे. हीच अडचण भाजप प्रदेश सचिव आमदार रणधीर सावरकर यांचीही आहे. महायुती सत्तेत आली तर त्यांनाही भारसाखळे यांची धास्ती आहे. मंत्री पदाकरता ते सावरकरांचे तगडे स्पर्धक राहणार आहेत. त्यामुळेच सावरकरांनी भारसाखळे यांच्या उमेदवारीबाबत मौन धारण केलेले आहे. मनातून त्यांनाही भारसाखळे यांची उमेदवारी नको आहे.

परंतु डॉ. रणजीत पाटील यांचे बाबतही सावरकर खार खाऊन आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास आणि ते निवडून आल्यास मंत्री पदाकरिता तेही सावरकरांना अडसर ठरू शकतात. पण गोम ही आहे कि, डॉ, रणजीत पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तरी ते बंड करणार नाहीत. परंतु उमेदवारी डावलली गेल्यास भारसाखळे मात्र अपक्ष उभे राहणार हे नि:संशय. तसे झाल्यास भारसाखळे पाटील यांना घेऊन भूईसपाट होणार आहेत. आणि असे होणे सावरकरांकरीता “सोने पे सुहागा” ठरणार आहे. भारसाखळे आणि पाटील हे त्यांचे दोन्ही स्पर्धक आपोआपच स्पर्धेतून बाद होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव अनुभवी आमदार म्हणून सावरकर यांचा दबदबा राहणार आहे. खासदार धोत्रे हे सावरकरांचे मामे बंधू. त्यामुळे या खेळीत ते सावरकरांसोबतच आहेत.

त्यांचे हे राजकारण तडीस जाण्याकरिता सावरकर यांना भारसाखळे यांची उमेदवारी नकोच आहे. तर दुसरीकडे आपल्या मित्राला स्थापित करणेकरिता फडणवीसांनाही भारसाखळे नको आहेत. त्यातच पक्षाच्या अंतर्गत सर्वेत भारसाखळे नापास झालेले आहेत. मतदारसंघातील नेते, कार्यकर्तेही त्यांचे वर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यामुळेच या लोकांमधून स्थानिक उमेदवाराचा मुद्दा उचलून धरल्या जात आहे.

अशा स्थितीत राज्यातील ओबीसींना रिझविण्याचे प्रयास भाजपकडून युद्ध स्तरावर केले जात आहेत. तोच धागा पकडून गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत चर्चिल्या गेलेले ॲड. विशाल गणगणे यांचे नाव आकोट विधानसभा उमेदवारी करिता यावेळी अव्वल स्थानी आलेले आहे. मतदारसंघातील संघ नेत्यांनीही त्यांचे नावाला भगवी झेंडी दिलेली आहे. फडणवीसांशीही त्यांचे संबंध चांगलेच घट्ट आहेत. त्याने ॲड. गणगणे यांचे पारडे चांगलेच जड झालेले आहे. त्यामुळे नगाला नग म्हणून डॉ. पाटील की ओबीसी फॅक्टर म्हणून ॲड. गणगणे एवढाच फैसला आता शिल्लक आहे. पितृपक्ष संपताच दहा-बारा ऑक्टोबर दरम्यान तो फैसलाही होणार आहे. त्यामुळे यावेळी भारसाखळे तो गयो…….

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: