नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड लोकसभा मतदारसंघांचे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांचे हैद्राबाद (तेलंगणा) येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे.
दि 26 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या पार्थिवावर नायगाव येथील हनुमान मंदिराच्या बाजूस दि. 27 ऑगस्ट रोजी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईक व गावकऱ्यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पक्षाच्या बैठकीसाठी दिल्ली, मुंबई सह जिल्ह्यातील विविध ठिकाणी जात होते. तसेच विधानसभा निवडणूकीचा भार हि त्यांच्यावर असल्यामुळे दररोज पक्षाच्या बैठका, नियोजित दौरे, जनतेच्या गाठीभेटी, विविध कार्यक्रमाला त्यांची प्रमुख उपस्थिती राहत होती.
कांही वर्षांपासून ते यकृतच्या आजाराने त्रस्त असले तरी पक्षासाठी व कार्यकर्त्यांसाठी वेळ देत होते.अशातच दैनंदिन धावपळीमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले . परंतु कमी रक्तदाबामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती.
त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारर त्यांना 13 ऑगस्ट रोजी एअर ऍम्ब्युलन्सने हैद्राबाद येथे नेण्यात आले.उपचारादरम्यान 70 वर्षीय वसंतराव चव्हाण त्यांचे 26 ऑगस्ट रोजी पहाटे निधन झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता. त्यांचे राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हि मोठे योगदान आहे.