Sunday, December 22, 2024
Homeराज्यबेरोजगारांना नोकरीचे आमिष…महिलेसह तीन आरोपी फरार…फरार महिलेचा अटकपूर्व जामीन नामंजूर…

बेरोजगारांना नोकरीचे आमिष…महिलेसह तीन आरोपी फरार…फरार महिलेचा अटकपूर्व जामीन नामंजूर…

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष देणाऱ्या आणि पोलिसांचे धाकाने फरार झालेल्या टोळक्यातील सुषमा नरेंद्र कुकडे वय ४० वर्षे रा. पाथर्डी ता. तेल्हारा या महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज आकोट न्यायालयाने नामंजूर केला असून या महिलेसह आरोपी असलेले अरुण राठोड, विलास जाधव व इतर यांचा आकोट पोलीस शोध घेत आहेत.

घटनेची पार्श्वभूमी अशी आहे कि, सौ. रुपाली शाम गवळी रा. अडगाव बुद्रुक ता. तेल्हारा ह.मु. आकोट यांचे पती सैन्य दलात नोकरी करीत आहेत. शिक्षित असल्याने घरी राहणे ऐवजी त्या नोकरीच्या शोधात होत्या. त्यांची मुलगी आकोट येथील स्वामी विवेकानंद शाळेत शिकत आहे. त्या मुलीला शाळेत ने आण करताना सौ. रुपाली यांची आरोपी सुषमा नरेंद्र कुकडे हिचेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.

अशा स्थितीत दि.१८.११.२०२२ रोजी सुषमा हिने रूपाली यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटी गार्डची जाहिरात निघाल्याचे सांगितले. आणि पंधरा दिवसात नियुक्तीची हमी देऊन कागदपत्रे आणि ७५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर सौ. रूपाली यांनी ही मागणी पूर्ण केली. परंतु त्यानंतर बरेच दिवस काहीच न झाल्याने सौ. रुपाली यांनी आपला मोठा भाऊ रोहित भोपळे रा. अडगाव बुद्रुक व विनोद भूडके रा. हिवरखेड यांचे सह सुषमा कुकडे हिची भेट घेतली.

त्या भेटीत सुषमा हिने या दोन्ही युवकांनाही नोकरीचे आमिष देऊन त्यांचेकडून प्रत्येकी ७५ हजार असे १ लक्ष ५० हजार रुपये आणि त्यांची कागदपत्रे घेतली. ही कागदपत्रे तिने आपला साथीदार अरुण हरिश्चंद्र राठोड रा. सारकिन्ही ता. बार्शीटाकळी याचेकडे पाठवून दिली आणि लवकरच तुम्हाला नियुक्तीपत्र मिळेल असे सांगितले. त्यावर दोन महिने काहीच न झाल्याने सौ. रुपाली यांनी पैशांकरिता तगादा लावला असता अरुण राठोड हा आकोटला आला. तिथे त्याने आणखी नितीन राठोड, मोहित राठोड आणि विक्रम पवार यांना गंडवून त्यांचेकडून ५ लक्ष १५ हजार रुपये मागितले. अशाप्रकारे सौ. सुषमा कुकडे व अरुण राठोड यांनी सौ.रूपाली गवळी व अन्य युवकांकडून एकूण ६ लक्ष १५ हजार रुपये उकळले.

या फसवणुकी आणखी एक साथीदार विलास जाधव रा. अमरावती हा देखील सामील होता. या तिघांनीही उपरोक्त बेरोजगारांना गंडविल्याने अखेर ८.२.२०२४ रोजी यासंदर्भात आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. तेव्हापासून सौ. सुषमा नरेंद्र कुकडे, अरुण हरिश्चंद्र राठोड आणि विलास जाधव हे तिघेही फरार झाले आहेत. त्यांचा आकोट पोलीस शोध घेत असतानाच सुषमा नरेंद्र कुकडे हिने पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याने आपणास अटकपूर्व जामीन देण्याची मागणी आकोट जिल्हा व सत्र न्यायालयास केली.

या मागणीला सरकारी वकील अजित देशमुख यांनी कडाडून विरोध केला. हे टोळके समाजाकरिता अत्यंत घातक असून त्यांची सखोल चौकशी आवश्यक असल्याने हा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्याची न्यायालयास त्यांनी विनंती केली. ॲड. अजित देशमुख यांना ॲड. सुरेश कुलकर्णी यांनी सहकार्य केले. या युक्तिवादानंतर आकोट जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपीचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आकोट शहर पोलीस फरार आरोपींना अटक करून फसविल्या गेल्या बेरोजगारांना कधी न्याय मिळवून देतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: