अमरावती: शहरातील गुन्हेगारी पुनः डोके वर काढीत असल्याचे दिसत आहे. स्थानिक पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर नसल्यानेच गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे. काल शहरातील सातुर्णा भागातील व्यंकटेश लॉननजिक रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास युवकांच्या टोळक्याने एका युवकावर तलवारीने हल्ला चढविला. त्यानंतर यशला आरोपींनी दुचाकीवर घेऊन रविनगर मार्गे अकोली-भातकुली रोडवरील कंपोस्ट डेपो परिसरात घेऊन गेले. त्यानंतर तो मेल्याची खात्री झाल्यानंतर आरोपीनी त्याला तेथील एका नालीत टाकून पळ काढला. मृत झालेल्या तरुणाचे नाव यश रोडगे असून तो गोपाल नगर येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी ६ पैकी दोन आरोपीला ताब्यात घेतले असून उर्वरित चार आरोपींचा शोध सुरु आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भातकुली मार्गावरील कंपोज डेपो परिसरात यश चा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री १०.३० च्या सुमारास यश रोडगे हा तरुण त्याच्या मित्राबरोबर सायंकाळी त्या ठिकाणी उभा असताना पाच-सहा इस्मानी येऊन त्याच्यावर त्या ठिकाणी त्याला चाकूने व धारदार हत्यारांनी सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर जखमी यशला गाडीवर घेवून रविनगर मार्गे अकोली-भातकुली रोडवरील कंपोस्ट डेपो परिसरात घेऊन गेले. तेथेही धारदार शस्त्राने मारहाण केली. मृत झाला याची खात्री करून तेथून आरोपींनी पळ काढला. या गुन्ह्यातील ६ आरोपींवर राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल असून दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत इतर आरोपींचा शोध चालू आहे