Saturday, December 21, 2024
Homeराज्यजिल्हा प्रशासन आले धावून, दुष्काळात मिळाला मुक्या जनावरांना आधार..! ‘बीजेएस’ची चारा छावणी...

जिल्हा प्रशासन आले धावून, दुष्काळात मिळाला मुक्या जनावरांना आधार..! ‘बीजेएस’ची चारा छावणी ठरली वरदान…

मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे, ह्या उन्हाळ्यात पुरंदर तालुक्यात माणसांपेक्षा जनावरांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागत होते. ना प्यायला पाणी, ना चारा. चारा-पाण्याशिवाय मुक्या जनावरांची होरपळ होत होती. महाग झालेला चारा घेणे शेतकर्‍यांना परवडत नव्हते. अशा परिस्थितीत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी ‘चारा छावणी’ उभारण्यासाठी सामाजिक संस्थांना आवाहन केले. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, भारतीय जैन संघटना (बीजेएस) या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला.

त्यानुसार यमाई शिवरी येथे दि. २८ एप्रिल, तर वाल्हे (ता. पुरंदर) येथे दि. १५ मे पासून प्रत्येकी ५०० जनावरांच्या क्षमतेची चारा छावणी उभी केली. १००० जनावरांच्या दोन चारा छावणीमुळे परिसरातील जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न तर मिटलाच, शिवाय पशुपालकांच्या चेहऱ्यावरची चिंता देखील मिटली. यामुळे खर्‍या अर्थाने शेतकरी-पशुपालकांना मोठा आधार आणि दिलासा मिळाला.

शिवरी चारा छावणीसाठी शिवरी ग्रामपंचायतीने, तर वाल्हेला ग्रामस्थ शिरीष शहा यांनी १० एकर जागा मोफत उपलब्ध करून दिली. पण छावणी उभी राहिल्यावर खरी गरज होती ती निधीची. मग जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्या पुढाकाराने एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनी सीएसआर फंड उपलब्ध करून दिला.

यासाठी बीजेएसच्या सपना सिंग, टी. जयराजन, फारूक कुरेशी यांनीही पाठपुरावा केला. छावणी सुरू झाल्यावर सुरुवातीलाच पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ संतोष पाटील, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी शिवरी छावणीची पाहणी करून आढावा घेतला, तसेच या उपक्रमाचे कौतुक केले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्हे छावणीला भेट देऊन समाधान व्यक्त केले.

या दोन्ही चारा छावणीत प्रत्येक जनावरांसाठी रजिस्टरप्रमाणे दररोज १८ किलो हिरवा-ओला किंवा ८ किलो सुका, १ किलो पशुखाद्य तसेच मुबलक पाण्याची सोय करण्यात आली होती. यामुळे जनावरे तर गुबगुबीत झालीच, शिवाय पौष्टिक खाद्यामुळे दुधात चांगली वाढ झाल्याचे पशुपालकांनी आवर्जून सांगितले. “एका दुभत्या जनावराचा महिन्याला पाच-सहा हजार चार्‍याचा खर्च होता. आमचा ७ जनावरांमागे महिन्याला ३५ हजारांचा खर्च तर वाचलाच, शिवाय एका जनावराच्या दुधात दीड-दोन लीटरने वाढ झाली.  

हा सर्वच शेतकर्‍यांना मोठा आधार झाला,” असे वाल्हेचा युवा पशुपालक प्रतीक मदने याने सांगितले. रुक्मिणी गोपाळ कदम या आजिबाईंनी आपली एक गाय वाल्हे छावणीत आणली होती. त्यांनी सांगितले, “हिरवा चारा दिल्याने दुधात निम्याने फरक पडला. एक-दीड लीटर दूध देणारी गाय, आता दोन-तीन लिटरवरवर आलीय.” इथे आलेल्या जनावरांचे मालक-शेतकरी यांनी जिल्हा प्रशासन आणि बीजेएसचे आभार मानले. एक शेतकरी म्हणाले, “बाहेरून चारा विकत घ्यायला पाच जनावरांमागे आतापर्यंत महिन्याचे २०-२५ हजार रुपये गेले असते, पण छावणीत आल्याने आम्हाला मोठा हातभार लागला.”

जूनमध्ये दुष्काळी भागांचा दौरा करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आवर्जून वाल्हे छावणीस भेट देऊन शेतकरी-पशुपालकांशी चर्चा केली. तेव्हा शेतकर्‍यांनी, चांगला पाऊस होईपर्यंत छावणी सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार पवारांनी जिल्हा प्रशासन-बीजेएस व्यवस्थापनास छावणी सुरू ठेवण्याची सूचना केली. प्रशासनाने वाल्हेची छावणी दि. २४ जुलैपर्यंत सुरू ठेवली, यामुळे पशुपालक-शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला.

या चारा छावणींचे वैशिष्ट्य म्हणजे चारा-पाण्याबरोबरच जनावरांची नियमीत घेतली जाणारी काळजी. जनावरे कोणत्याही आजारांना-रोगांना बळी पडू नये, म्हणून पुरंदरच्या पशुवैद्यकीय अधिकारी अस्मिता कुलकर्णी यांच्या टीममधील वाल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. माणिक बांगर हे प्रत्येक जनावरांची नियमित तपासणी करीत. आवश्यक असलेल्या जनावरांना औषध-पाणी देत. या दोन्ही छावण्यांचे बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांच्या मार्गदर्शनात बीजेएसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश नवलाखा यांनी चोख नियोजन ठेवले, तर अशोक पवार यांनी व्यवस्थापनाचे काम पाहिले.

चांगला पाऊस झाल्यावर दि. १९ जूनला शिवरीची आणि दि. २४ जुलैला वाल्हेची छावणी बंद करण्यात आली. तेव्हा येताना पोट खोल गेलेली, मरतुकडी होत चाललेली जनावरं, जाताना मात्र गुबगुबीत आणि टुणटुणीत होऊन गेली. जिल्हा प्रशासनानं घेतलेला निर्णय जनावरांसाठी मोठा आधार ठरला होता. मुक्या जनावरांसाठी जिल्हा प्रशासन तत्परतेने धावून आले आणि त्यांना दुष्काळात मोठा दिलासा मिळाला.

एवढेच नाही तर, ही मुकी निष्पाप जनावरे कत्तलखान्यात जाण्यापासून किंवा विक्रीपासून वाचली. आज ती जनावरे आपल्या गोठ्यात हंबरता दिसत आहेत. याचं कारण जिल्हा प्रशासनाची तत्परता, सामाजिक संस्था बीजेएसचा पुढाकार, सीएसआर फडांची योग्य साथ आणि अनेक हातांची निस्वार्थी मदत यामुळे कोणत्याही कठीण आपत्तीवर सहजतेने मात करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. 

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: