आकोट – संजय आठवले
अकोला जिल्हाध्यक्षांची मनमानी आणि आमदार प्रकाश भारसाखळे यांची हुकूमशाही ह्याने त्रस्त झालेल्या तेल्हारा तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे सादर करून पक्षांतर्गत असंतोषाला तोंड फोडले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने भाजपच्या तिबार उमेदवारी करिता गुडघ्याला बाशिंग बांधून नटलेल्या आमदार प्रकाश भारसाखळे यांना मोठा धक्का बसणार आहे. येत्या पंधरवड्यात देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी या संदर्भात आकोट मतदार संघात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्हा भाजपमध्ये गतकाही महिन्यांपूर्वी खांदेपालट होऊन किशोर मांगटे पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. त्यानंतर त्यांनी तालुका अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी तेल्हारा भाजपमध्ये बरीच चुरस निर्माण झाली. त्यावर तोडगा काढण्याकरिता वरिष्ठ पातळीवरून निरीक्षक पाठवून निवडणूक प्रक्रियेद्वारे तालुका अध्यक्ष निवडण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार तेल्हारा तालुका भाजप अध्यक्ष पदाकरिता रमेश दुतोंडे आणि केशवराव ताथोड ह्या दोघांकरिता निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीमध्ये ताथोड यांना जास्त मते पडली. त्यामुळे ह्या पदावर त्यांचा दावा पक्का झाला. मात्र यावर जिल्हाध्यक्ष आणि आमदार भारसाकळे यांचे मन खट्टू झाले. त्यामुळे निवडणुकीचा तोडगा झुगारून गजानन उंबरकर यांचे नाव घोषित करण्यात आले. या घोषणेनुसार उंबरकार यांची कारकीर्द सुरू झाली. पक्षीय कार्यप्रणालीनुसार तालुका अध्यक्षांनी त्यांची कार्यकारणी तयार करून जिल्हाध्यक्ष यांना सादर करण्याचा शिरस्ता आहे. त्यानुसार गजानन उंबरकर यांनी आपली कार्यकारिणी आणि तेल्हारा शहर अध्यक्ष पदाकरिता रवी गाडोदिया यांची नावे जिल्हाध्यक्षांकडे पाठविली. शिरस्त्यानुसार त्यावर मंजुरात मिळणे क्रमप्राप्त होते.
मात्र रवी गाडोदिया यांचे नावावर जिल्हाध्यक्ष आणि आमदार भारसाकळे यांचा आक्षेप होता. त्यामुळे गजानन उंबरकर यांनी सुचविलेल्या नावाला संमती न देता ओम सुईवाल यांची तेल्हारा तालुका अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. तालुका अध्यक्षांच्या शिफारशीला कोणतीच किंमत न दिली गेल्याने आधीच धुमसत असलेल्या असंतोषाला बळजोरीची फुंकर घातली गेली. त्यामुळे ह्या असंतोषाचा भडाग्नी धडाक्यात पेटला आणि पक्षीय शिस्त मोडून वर्तन करणारे जिल्हाध्यक्ष आणि आमदार भारसाकळे यांचे विरोधात तेल्हारा तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटले
परिणामी विद्यमान तालुका अध्यक्ष, दोन जिल्हा माजी सरचिटणीस, दोन माजी नगरपरिषद अध्यक्ष, माजी नगरसेवक, शहर उपाध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख, व्यापारी, सहकार, वैद्यकीय आघाड्यांचे पदाधिकारी, जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष, माजी शहर सरचिटणीस, तालुका सरचिटणीस, युवा मोर्चा अध्यक्ष, शहर बूथ प्रमुख या मान्यवरांनी आपले सामूहिक राजीनामे वरिष्ठांना पाठविले. या राजीनाम्यामध्ये पक्षशिस्त मोडीत काढून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेण्यात आल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष यांचेवर लावण्यात आला आहे.
ह्या पत्राच्या प्रती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, रणधिर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांना पाठविण्यात आल्या आहेत. या सामूहिक राजीनाम्यामुळे आकोट मतदार संघात मोठी खळबळ उडाली असून आमदार प्रकाश भारसाखळे यांचे एककल्ली कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत आमदार भारसाखळे यांनी आकोट आणि तेल्हारा भाजपवर मोठी कमांड ठेवलेली होती. आपल्या कारकिर्दीत आपल्या मतदारसंघातील भाजपमध्ये सर्व काही ऑलवेल असल्याची हुशारकी ते वरिष्ठांकडे मारीत होते. परंतु या सामूहिक राजीनाम्याने त्यांचे पितळ उघडकीस आले असून त्याची लागण आकोट तालुक्यातही होण्याचे दाट संकेत प्राप्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत मोठा खेला होण्याची शक्यता वर्तवीली जात आहे.