आकोट – संजय आठवले
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथील ६५ वर्षीय रामदास रामराव ढोले ह्या इसमाने आपला मुलगा गजानन याचे मदतीने आपल्याच सुनेला शेतीचे वादातून जीवनातून संपविल्याने हिवरखेड पोलिसांच्या कारवाईनंतर दोन्ही आरोपींना अकोला कारागृहात बंदिस्त करण्यात आले आहे. त्यांनी जामीनाकरिता केलेली याचिका आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
फिर्यादी ऋत्विक संजय रोहणकर रा. दनोरी तालुका आकोट याने हिवरखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानुसार घटनेची हकिगत अशी कि, सदर फिर्यादी हा दि. १७.६.२०२४ रोजी सकाळी दहा वाजता चे सुमारास आरोपीची सुन रेणुका हीचे सोबत शेतीचे काम करण्या करीता आले. त्यावेळी मृतक रेणुकाचा पती गजानन रामदास ढोले हा अचानक पाठीमागुन आला. त्याने त्याची पत्नी रेणुका ढोले हिच्या डोक्यावर कुन्हाडीने वार केला. त्यावेळेस फिर्यादीने गजानन यास पाठीमागुन पकडले आणि तिला मारू नका. आम्ही परत जातो असे म्हटले.
त्यावर आरोपी गजाननने फिर्यादीचे उजव्या हातावर व डाव्या हातावर चावा घेतला. तरी सुध्दा फिर्यादीने गजानन ढोले यास सोडले नाही. म्हणून पाठीमागुन गजानन ढोले याचा पिता रामदास ढोले याने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यावर लाकडी काठीने मारले. आणि त्याची ३५ वर्षीय सुन रेणुका हिचे केस धरून ओढून तिला खाली पाडले. रेणुका ही खाली पडल्यानंतर आरोपी गजानन ढोले याने तिच्या मानेवर व शरीरावर इतर ठिकाणी सुध्दा कुन्हाडीने वार केले. अशा प्रकारे गजानन व रामदास या बापलेकांनी सौ. रेणुका हिला जिवाने ठार मारले.
अशा फिर्यादी वरून तपास अधिकारी हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोवींद पांडव यांनी वरील प्रमाणे दोन्ही आरोपों विरूध्द गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणात गुन्हयात वापरलेली कुऱ्हाड व काठी जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींना आकोट न्यायालयात हजर केले असता आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांचीही रवानगी अकोला जिल्हा कारागृहात केली. तेथे बंदिस्त अवस्थेत असतानाच या दोघांनीही आकोट जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळणेकरिता याचिका दाखल केली.
ह्या याचिकेस सरकारी वकील अजित देशमुख यांनी कडाडून विरोध केला. आपल्या युक्तिवादात त्यांनी संपूर्ण घटना विषद करून न्यायालयास सांगितले कि, खुनासारखा गंभीर अपराध दोन्ही आरोपींनी केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे तळेगाव परीसरात दहशत निर्माण झाली आहे. अशा परीस्थितीत कोणीही साक्षीदार साक्ष देण्याकामी पुढे येत नाही. तसेच जे साक्षीदार पुढे आले आहेत ते हिवरखेडचें रहीवासी असून आरोपी जामीनावर सुटल्यास त्यांचेवर दबाव निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. सदर प्रकरणामध्ये मृतक रेणुकाचा शवविच्छेदन अहवाल इत्यादी महत्वपुर्ण पुरावे प्राप्त झालेले आहेत.
विशेष म्हणजे खुनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच दि.१६.०६.२०२४ रोजी गजानन व रेणुका यांचेत शेतीच्या वादावरून भांडण झाल्याची नोंद हिवरखेड पोलीस स्टेशनला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. १७.०६.२०२४ रोजी रेणुकाचा खुन झालेला आहे. आरोपी रामदासचे वय जरी ६५ असले तरी, त्याचेवर त्याने सुनेचा खुन स्वतःच्या मुलाच्या मदतीने संगनमताने केल्याचा आरोप आहे. खुनासारख्या गुन्हयामध्ये फाशी व जन्मठेपेची तरतूद आहे.
आरोपी रामदासचे वय जरी जास्त असले तरी कारागृहामध्ये त्याच्या प्रकृतिची योग्य ती काळजी नियमाप्रमाणे घेतली जाते. आरोपी विरूध्द आणखी सबळ पुरावा प्राप्त करून सखोल तपासाअंती दोषारोपपत्र दाखल करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर करावा. असा युक्तीवाद जमानत अर्जाला विरोध करतांना सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला, यावर दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर केला.