Sunday, December 22, 2024
Homeराज्यमराठी विभाग : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध...

मराठी विभाग : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध…

अमरावती – दुर्वास रोकडे

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रातील एक क्रियाशील शैक्षणिक विभाग आहे.मागील तीस वर्षांपासून सातत्यपूर्ण प्रयत्नांनी व नावीन्यपूर्ण उपक्रमांनी या विभागाने शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाची वाटचाल अतिशय व्रतस्थपणे सुरू आहे. मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता, स्त्रीवादी साहित्याच्या अभ्यासक, समीक्षक, विभागप्रमुख प्रा.डॉ.मोना चिमोटे यांच्या नेतृत्वात विभाग आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे.

मराठी विभाग हा आचार्य पदवीसाठीचे अधिकृत संशोधन केंद्र म्हणून कार्यरत आहे. आचार्य पदवी कोर्स वर्क येथे यशस्वीपणे पार पाडल्या जातो. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या जेआरएफ तसेच राज्य शासनाच्या विविध संस्थांद्वारे देण्यात येत असलेल्या अधिछात्रवृत्ती अंतर्गत संशोधन करणाऱ्यांसाठी संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून या विभागाची ओळख आहे. उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या सर्व आधुनिक सोई सुविधा या विभागात उपलब्ध आहेत.

तसेच या विभागातील शिक्षकांनी आपल्या वैयक्तिक योगदानातून विद्यार्थ्यांसाठी अद्यावत संदर्भग्रंथांनी समृद्ध असलेले दालन विभागात तयार केले आहे.विभागाची पूर्वपरंपरा कायम राखत नव्या व्यावसायिक गरजा ओळखून विविध रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. नवीन शैक्षणिक धोरण -२०२० मध्ये अपेक्षित असलेल्या कौशल्याधारित बदलांसह मागील शैक्षणिक वर्षापासून नव्या अभ्यासक्रमासह एम.ए. मराठी भाग १ चे नियमित प्रवेश विभागात सुरू झाले आहेत.

विद्यार्थ्यांना जीवन व्यवहारांच्या विविध क्षेत्रांतील आंतरसंबंधाचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी व वैश्विक मानवतेच्या व्यापक पटावर जीवनाचे आकलन करून देणारी दृष्टी त्यांना प्राप्त व्हावी, यासाठी विभागातील अध्यापक सातत्याने प्रयत्नशील असतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत नव्याने सुरू झालेल्या अभ्यासक्रमात जीवनोपयोगी कौशल्यांवर भर देणाऱ्या, व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असलेल्या तसेच विविध स्पर्धापरीक्षांना उपयोगी ठरणाऱ्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विभागाच्या वतीने सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्यासेट,नेट परीक्षांसाह केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोग इत्यादी परीक्षांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असणाऱ्या ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने विभागाच्या वतीने विविध कार्यशाळांचे व अनौपचारिक मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात येत असते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, विदर्भ साहित्य संघ, साहित्य अकादमी यांसारख्या शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत असते. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत विभागाच्या वतीने दरवर्षी विविध परिसंवाद, नामवंत वक्त्यांची व्याख्याने, स्पर्धा, कार्यशाळांचे आयोजन, ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन, काव्य वाचन असे नावीन्यपूर्ण आयोजित केले जातात.

विभागात एम. ए. मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असणाऱ्या सर्व पत्रिकांचे अध्यापन येथे केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यायांपैकी आपल्या आवडीचा पर्याय निवडण्याची संधी मिळते. विभागाच्या स्थापनेपासूनच विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळविण्याची परंपरा विभागाच्या अनेक विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.विभागाचे अनेक माजी विद्यार्थी विविध महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये उच्चपदस्थ स्थानांवर कार्यरत आहेत . पत्रकारिता, आकाशवाणी, दूरदर्शन , शासकीय कार्यालये आणि शाळा – अशाही ठिकाणी या विभागाचे विद्यार्थी यशस्वीपणे वावरत आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती, जिज्ञासूपणा आणि ज्ञानलालसा वाढीस लागण्याच्या हेतूने व प्राप्त ज्ञानाचे व्यावहारिक उपयोजन करण्याचे कौशल्य आत्मसात होण्यासाठी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक आणि तुलनात्मक अभ्यास दृष्टीचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच जीवनातील सैद्धान्तिक आणि प्रायोगिक पातळीवरील समस्यांचे कालसापेक्ष भान निर्माण होऊन सर्जनशील पर्याय देण्याची प्रक्रिया त्यांच्यामध्ये विकसित होईल. माहिती व तंत्रज्ञानाची कौशल्ये विकसित करून रोजगाराच्या नवनवीन संधी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

रोजगाराच्या संधी:

मराठी विषयात एम. ए. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या विविध संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होतील. त्यातील काही महत्त्वाच्या संधी पुढीलप्रमाणे आहेत. पदव्युत्तर मराठीचा विद्यार्थी हा शिक्षक या पदांच्या नोकरीसाठी पात्र ठरेल, सहायक प्राध्यापक होण्याची पूर्वअट तो पूर्ण करू शकेल, राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी सदर अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल, विविध सरकारी कार्यालये, एल.आय.सी., बँक, सरकारी सेवा आदी कार्यक्षेत्रांत रोजगार उपलब्ध होतील, पत्रकारिता, दूरचित्रवाणी, आकाशवाणी आदी क्षेत्रांत लेखन आणि निवेदन असे क्षेत्र निवडला येईल, भाषांतर /अनुवाद क्षेत्रात मोठी संधी मिळेल,भाषाविज्ञान, ग्रंथालयशास्त्र, सर्जनशील लेखन, नाट्यक्षेत्र इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करता येईल,

मुद्रित शोधन, संपादकीय व प्रकाशन व्यवसाय आदी क्षेत्रांत रोजगार मिळू शकेल, प्रवक्ता, निवेदक, भाष्यकार, सूत्रसंचालक, व्याख्याता म्हणून ओळख निर्माण करता येईल, दाखले, उदाहरणे, कोट्या, विनोद, म्हणी, वाक्प्रचार, कविता, गझल यांचा प्रभावीपणे वापर करून उत्तम वक्ता होता येईल,भाषिक कौशल्ये व सर्जनशीलतेचा विकास होऊन लेखक म्हणून प्रस्थापित होता येईल.

तसेच विद्यार्थ्यालासंशोधक, विश्लेषक, तुलनाकार, टीकाकार, भाष्यकार म्हणून कार्य करता येईल, कंटेंट रायटर, संपादक, वृत्त निवेदक, सोशल मिडिया मॅनेजर इत्यादी क्षेत्रांत देखील तो रोजगार मिळवू शकेल. विद्यार्थ्यालाऑनलाईन टयूटर प्रशिक्षक, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शक, युट्यूबवरून व्याकरणाच्या अध्यापनाचेव्हिडिओ प्रसारित करून रोजगार मिळवता येईल, चित्रपट व मालिका पटकथालेखन, माहितीपत्राचे लेखन, ब्लॉग रायटर, गीतकार म्हणून लौकिक व रोजगार प्राप्त करता येईल, माहितीपर लेखन, अहवाल लेखन, वृत्तांत व इतिवृत्त लेखन, माहिती पुस्तिका, माहिती पत्रक, स्मरणिका, गौरविका, मानपत्र, पत्र, पत्रिका आदींचे लेखन करता येईल, विविध समाजमाध्यमातील जाहिरात लेखनाची कौशल्ये विकसित होतील,संकेतस्थळांना हाताळण्याची व माहितीच्या विश्वासार्हतेची शहानिशा करता येईल.

अशा गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या पदव्युत्तर मराठी विभागाची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ एम.ए. प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एन. इ. पी.) अनुषंगाने मागील शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना http://admission.sgbau.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येईल.

प्रवेश अर्ज भरून त्याची एक प्रत पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडे विहित मुदतीच्या आत सादर करावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेविषयीचे वेळापत्रक संकेतस्थळावर दिलेले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मराठी विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे (९४२२१५५०८८) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. माधव पुटवाड ( ९४२३३७५०६०२),डॉ. प्रणव कोलते ( ९८५०४८८२२२) यांच्याशी विभागात प्रत्यक्ष संपर्क साधता येईल.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: