अमरावती – दुर्वास रोकडे
अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोदी घरकुल आवास योजना अंतर्गत सुमारे 14,178 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली. मात्र, यापैकी अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे हप्तेच मिळालेले नाहीत. सरकार केवळ घोषणा करीत असून प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना वाऱ्यावर सोडत आहे असा आरोप करीत सरकारच्या या गलथान कारभाराबाबत आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत 2023 – 24 या वर्षासाठी सुमारे 14,178 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आली. त्यापैकी प्रत्यक्षात 13,1 94 लाभार्थ्यांना योजनेचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. मात्र सुमारे 264 लाभार्थ्यांना अद्याप पहिला हप्ताही मिळालेला नाही. तर या योजनेतील 6798 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आलेला नाही. तसेच 3438 लाभार्थ्यांना सरकारने तिसरा हप्ताही दिलेला नाही.
वास्तविक ग्रामीण भागातील अत्यंत गरजू आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी ही योजना राबविण्यात येत असून या योजनेच्या बांधकामा करिता लाभार्थ्यांनी खाजगी कर्ज काढली आहेत, नातेवाईकांकडून उसनवार केली आहे, आपले सोने गहाण ठेवून उधारीवर सिमेंट, लोखंड, विटा, रेती विकत घेऊन घरकुलांची काम पूर्ण केली आहेत. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून हातावर पोट असलेल्या या लोकांनी आपलं घर व्हावे यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. आता त्यांनी काढलेल्या कर्जाच्या किंवा उधारीच्यासाठी त्यांच्यावर तगादा येत असून हे लाभार्थी अत्यंत अडचणीत सापडलेले आहेत, असे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन
अमरावती जिल्ह्यातील मोदी आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांना त्यांनी बांधलेल्या घरकुलाचा पहिला, दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याची रक्कम येत्या सात दिवसाच्या आत देण्यात यावी. अशी मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे. जर सात दिवसाच्या आत ही रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा झाली नाही तर रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करू, त्यावेळी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा आमदार ॲड.ठाकूर यांनी दिला आहे.