Friday, November 15, 2024
Homeराज्यआमदार भारसाखळे यांचे विरोधात महिलाही सरसावल्या….दुखावलेल्या सोबत्यांनीही आपल्या अस्तन्या चढवल्या…

आमदार भारसाखळे यांचे विरोधात महिलाही सरसावल्या….दुखावलेल्या सोबत्यांनीही आपल्या अस्तन्या चढवल्या…

आकोट – संजय आठवले

विकास पुरुष म्हणून स्वतःची पाठ स्वतः थोपटणाऱ्या भारसाखळे यांची विरोधात आता स्वपक्षातूनच विरोधी सूर उमटू लागले असून यावेळी स्थानिकच उमेदवार हवा ही मागणी जोर धरू लागली आहे. सोबतच आकोट उमेदवारी करिता महिलांनीही कंबरेला पदर खोचला असून दुसरीकडे भारसाखळे यांचेकडून या ना त्या कारणाने दुखावलेले सोबतीही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणेकरीता अस्तन्या चढवू लागले आहेत. त्यातच संघानेही भारसाखळे यांचे बाबत नाक मुरडून त्यांना वाळीत टाकल्याने त्यांच्या तिबार उमेदवारी करिता पक्षश्रेष्ठही पेचात पडणार असल्याचे संकेत आहेत. त्यात २२ जुलै रोजी नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस अभिष्टचिंतनाकरिता आकोट तेल्हारा येथून बरीच मंडळी जात आहेत. त्यावेळी होणाऱ्या चिंतनातून भारसाखळेंबाबत बराच खुलासा होण्याची शक्यता आहे.

गत दहा वर्षात आकोट तेल्हारा भाजपवर एक छत्री पकड ठेवण्यात आमदार भारसाखळे चांगलेच यशस्वी झाले. परंतु अंतर्गत कुरबुर सुरू असल्याचेही त्यांना पूरते ज्ञात होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बारीक सारीक हालचालीवर त्यांनी घारीची नजर ठेवली होती. कार्यकर्तेही हे पूर्णपणे जाणून होते. त्यामुळे ते भारसाखळे यांच्या नजरेत येणार नाही अशा रीतीने मुंबई नागपूर येथे जात येत होते. अशातच अकस्मात पणे एखादा कार्यकर्ता मुंबई येथे आढळला कि भारसाखळे हटकून त्या कार्यकर्त्याला टोमणा मारून त्याची मुंबई वारी आपणास ठाऊक असल्याची जाणीव त्याला करवून देत होते. त्यामुळे भाजप कार्यकर्ते कजाग सासूच्या जरबेत असणाऱ्या सहनशील सुनेसारखे जपून राहत होते.

परंतु आता मात्र कार्यकर्त्यांनी ते जोखड झुगारून दिल्याचे चित्र दृष्टिगोचर होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून यावेळी आकोट उमेदवारी करिता महिलाही ईरेला पेटल्या आहेत. त्यात महत्त्वाचे नाव आहे तेल्हारा नगरपरिषद अध्यक्षा सौ. जयश्री फुंडकर यांचे. भारसाखळे स्वतःला विकास पुरुष म्हणून घेत असले तरी त्यांनी सौ. पुंडकर यांना पालिकेतील कामे करण्याकरिता चांगलेच छळले आहे. त्यांना या कामांचे श्रेय मिळू नये म्हणून त्यांचे कामात बरेच अडसर निर्माण केले आहेत. परंतु सौ. पुंडकर ह्या सुशिक्षित आणि राजकीय वारसा प्राप्त असल्याने त्या भारसाखळे यांना पुरून उरल्या.

त्यांच्या पतीचे भाजप पक्षांतर्गत मोठे योगदान असल्याने त्यांचा वर पर्यंत प्रभाव आहे. हा प्रभाव आणि सौ पुंडकर यांची कामे या भरवशावर त्यांनी यावेळी आकोट मतदार संघाची उमेदवारी मागितली आहे. त्याकरिता हे पती-पत्नी थेट गडकरी यांचे संपर्कात आहेत. त्यातच नगाला नग असल्याने आमदार भारसाखळे (पाटील) यांचे समोर पुंडकर यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. सोबतच आकोट मधून सौ. शोभा केशवराव बोडखे यांनीही एल्गार पुकारला आहे. त्यांचे सासरे दिवंगत महादेवराव बोडखे हे कर्मठ संघनिष्ठ असून ते जनसंघापासून भाजपमध्ये सक्रिय राहिले होते. त्यांचे पश्चात त्यांचे सुपुत्र केशवराव बोडखे आणि त्यांच्या भार्या सौ.शोभाताई यांचे भाजपात महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.

त्यांचा बारी समूह सातत्याने भाजपची पाठराखण करीत राहिलेला आहे. त्यामुळेच आता बारी समाजाच्या बैठकीमधून दिवंगत महादेवराव बोडखे यांचे परिवारातून भाजपने उमेदवारी द्यावी असा सूर उमटला आहे. तर या संघ आणि भाजपनिष्ठ परिवाराने उमेदवारी करिता सौ. शोभाताई केशवराव बोडखे यांचे नाव समोर केले आहे. अशाच संघ आणि भाजप निष्ठ परिवारातील श्रीमती स्मिताताई राजनकर यांचेही नाव समोर आले आहे. माळी समाजाचे नेते दिवंगत पंडितराव राजनकर यांच्या त्या स्नुषा. तर अकोट मतदार संघातील धडाडीचे व्यक्तिमत्व दिवंगत राजाभाऊ राजनकर यांच्या त्या भार्या आहेत. हा परिवारही संघनिष्ठ असून जनसंघापासून पक्षाचे कार्य करीत आहे. त्यामुळे भाजपने यावेळी या परिवारास मोका द्यावा अशी कार्यकर्त्यांची मनीषा आहे.

जनमानसात चर्चा असलेले आणखी एक नाव आहे ॲड. विशाल गणगणे यांचे. राज्याच्या राजकारणात आपली विशेष छाप पाडणारे माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांचे हे पुतणे. तर समाजातील सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे दिवंगत प्रभाकरराव गणगणे यांचे हे सुपुत्र. वास्तविक सुधाकरराव हे कडवे काँग्रेसी म्हणून राज्याला सुपरचित आहेत. परंतु नागपूर येथे कायदेविषयक शिक्षण घेताना देवेंद्र फडणवीस यांचेशी जवळीक आल्याने ॲड. विशाल भाजपवासी झाले. २०१९ मध्ये आकोटच्या उमेदवारी करिता आणि २०२४ च्या लोकसभा उमेदवारी करिता त्यांचे नावाची जोरदार चर्चा होती. परंतु राजकीय समीकरणांमुळे त्यांची वर्णी लागू शकली नाही. आता मात्र त्यांनी पुन्हा उसळी घेतली असून आकोटच्या उमेदवारी करिता ते सज्ज झाले आहेत.

या धामधुमीतच आतापर्यंत आमदार भारसाकळे यांची पाठराखण करणारेही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणे करिता मोका पाहून चौका मारण्यास सज्ज झाले आहेत. ही नावे जनमानसास चकित करणारी आहेत. त्यातील एक नाव आहे रमेश दुतोंडे यांचे. हे हिवरखेड येथील रहिवासी असून तेल्हारा तालुक्यात त्यांना भारसाखळे यांची सावली म्हणून संबोधले जाते. ते कुणबी समाजाचे नेतृत्व करतात. यावेळी त्यांनीही उचल खाऊन आमदार होण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या या तयारीचा धूरिण शेजारच्या जिल्ह्यातील एक भाजप आमदार असल्याची कुणकुण आहे.

यासोबतच भारसाखळे यांच्या उमेदवारीला आव्हान देणारे एक नाव आहे आकोट तालुक्यातील. प्रा. राजेंद्र पुंडकर यांचे. हे सेवानिवृत्त शिक्षक असून बांधकाम क्षेत्रात त्यांचा चांगला बोलबाला आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या पुंडकर यांनी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत भारसाखळे यांची आर्थिक बाजू सांभाळली होती. त्यांच्याच सल्ल्याने भारसाखळे यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या होत्या. त्यामुळे प्रा. पुंडकर यांना भासाकळेंच्या अनेक खाचाखोचा, चोर वाटा मुखपाठ आहेत. सोबतच त्यांचा आकोट मतदार संघाचा अभ्यास सखोल आणि विकासात्मक आहे. सद्यस्थितीत ते भाजपच्या किसान आघाडीचे राज्य उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे आणि भारसाखळे यांचे वरील रोषामुळे भारसाखळे यांचे उमेदवारीस पुंडकरांकडून तगडा खोडा निर्माण होऊ शकतो.

पुरुषोत्तम चौखंडे हे आकोट पालिकेचे माजी नगराध्यक्ष. हे आधी शिवसेनेत होते. परंतु भारसाखळे यांचे भाजप प्रवेशानंतर चौखंडेही भाजपात आले. त्यांनी स्वतःला कधीच नजरेत भरण्याजोगे प्रकट केले नाही. परंतु आता त्यांच्या आशा पल्लवीत झाल्याने त्यांनी स्वतःला पक्षीय कामांशी प्रकटपणे जोडणे सुरू केले आहे. ना. गडकरी यांचेशी बरीच घसट असलेल्या एका व्यापारी राजकारण्याचे माध्यमातून थेट गडकरी यांचेशी संधान साधण्यात चौखंडे यशस्वी झाले आहेत.

भारसाखळे यांचे मुठीत कायम राहून सावज टप्प्यात येण्याच्या प्रतीक्षात असलेल्या माजी पालिकाध्यक्ष हरिनारायण माकोडे यांचाही आमदार होण्याचा निखारा प्रज्वलित झाला आहे. संघ आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजात ओळख आहे. २०१९ च्या निवडणुकीतही आमदार होण्याची त्यांची सूप्त मनीषा चुळबुळ करीत होती. परंतु भारसाखळे यांच्या कावेबाज आणि करड्या नजरेने त्यांनी आपल्या भावना उमटू दिल्या नाहीत. पण आता मात्र त्यांचीही सुप्तेच्छा अनावर झाली आहे. त्यामुळे आकोट उमेदवारी करिता त्यांनीही मंद स्वरात शड्डू ठोकले आहेत.

आकोट मतदार संघात वेगवेगळे प्रयोग करणारे कुणबी नेते प्रभाकरराव मानकर यांनाही भाजपचे माध्यमातून विधानसभेत जाण्याची स्वप्न पडू लागली आहेत. वंचित आघाडीत असलेल्या मानकरांना भारसाखळे यांनीच भाजपात घेतले. २०१९ मध्ये पाटील समूहाने तोंड वेंगाडल्याने भारसाखळे यांनी मानकरांचे माध्यमातूनच कुणबी समूहात पाय रोवले होते. त्यामुळे बाहेरून येऊन आपल्याच सहकार्याने भारसाखळे आपल्यावरच हुकूमत करीत आहेत याचे भान मानकरांना झाले. आणि त्यापेक्षा आपणच का आमदार होऊ नये? अशा महत्त्वाकांक्षेपोटी मानकरांनीही आकोटच्या उमेदवारी करिता आपली मागणी प्रकट केली आहे.

दिवंगत डॉ. नागमते हे संघ आणि भाजपचे कडवे समर्थक. अतिशय परखड आणि स्पष्टवक्ता म्हणून त्यांचा लौकिक. खुद्द दिवंगत अटल बिहारी आणि प्रमोद महाजन यांनी डॉ. नागमते यांचे निवासस्थान पुनीत केलेले आहे. त्या तालमीत राजकारणाचे बाळकडू प्राशन केलेले डाॅ.राजेश नागमते हे सुद्धा आकोटच्या उमेदवारी करिता उद्युक्त झालेले आहेत. संघ आणि भाजपात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते आमदार रणधीर सावरकरांचे मर्जी प्राप्त आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अकोला पूर्व मतदार संघात भरीव कामगिरी केलेली आहे. परंतु असे असले तरी बाहेरून आलेल्या भारसाखळे यांनी डॉ. राजेश नागमते यांना सर्वाधिक टोमणे मारून हैराण केलेले आहे. त्यामुळे आता बाहेरच्या व्यक्तीला मोठे करण्याऐवजी आपणच आमदार होण्याचा साक्षात्कार झाल्याने त्यांचेही नाव आकोट करिता इच्छुक उमेदवारांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

योग प्रशिक्षण वर्ग, अनेक सामाजिक कार्यात सहभाग ठेवून सेवानिवृत्त कॅप्टन सुनील डोबाळे यांनीही आकोट उमेदवारी करिता जबर मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्याकरिता त्यांनी भाजप श्रेष्ठींची जवळीकही साधली आहे. “नागरिक फिट तर देश आणि राज्य नीट” हा संदेश घेऊन ते मतदारसंघात फिरत आहेत. अर्धे आयुष्य देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात गेले. आता देशांतर्गत राजकारण सुरक्षित करण्याचा त्यांचा मानस आहे. भाजपाचे माजी शहराध्यक्ष कनक कोटक यांनीही उमेदवारी करिता कंबर कसली आहे. भारसाखळे यांचेकडून त्यांना कायम उपेक्षा सहन करावी लागली आहे. अतिशय मितभाषी आणि मृदूभाषी असल्याने त्यांचा चाहता वर्ग ही मोठा आहे. संघ आणि भाजपाचे अतिशय एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख आहे.

संघ आणि भाजपाचे कट्टर समर्थक. कमी वयात राजकीय डावपेचांची ऊत्तम जाण आणि पक्षकार्यात झोकून देण्याची तयारी या भरवशावर तरणा नेता म्हणून मयूर आसरकर यांनीही आकोट करिता आपली उमेदवारी पेश केली आहे. नेहमी मदतीस तयार आणि समोरच्याला आपल्या बोलांनी मोहात पाडणाऱ्या स्वभावाने तरुण वर्गात त्यांची चांगली छाप आहे. अकोला जिल्हा संघचालक मोहनराव आसरकर यांचा मयूर पुतण्या आहे. परंतु तरीही आमदार भारसाखळे यांनी अनेकांसह मयुर आसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कायम उपेक्षा केली आहे. पक्ष कार्यातून या लोकांना नेहमी बाद करण्याचा प्रयास केलेला आहे.

आकोट मतदार संघाकरिता इच्छुक वरील लोकांची नावे पाहता एक बाब प्रकर्षाने ध्यानात येते कि, आमदार भारसाकळे यांनी या लोकांना नेहमी जरबे खाली ठेवून हतोत्साहित आणि नाउमेद करण्याचाच प्रयास केला आहे. खाजगी बैठकीत भारसाखळे सर्व भाजप कार्यकर्त्यांना नेहमी हिनवित आले आहेत. “आकोट मतदार संघात मी आल्यानेच भाजपची भरभराट झाली आहे. माझ्यापूर्वी आकोट मतदार संघात भाजप नामशेष झाली होती.” ही त्यांची आवडती वाक्ये संघ भाजप कार्यकर्त्यांनी अनेकदा ऐकलेली आहेत. यावरून भारसाखळे संघ, भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काडीचीही इज्जत देत नाहीत, पक्षश्रेष्ठींचेही योगदान मानत नाहीत हे अधोरेखित होते.

२२ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त अभिष्टचिंतन करण्याकरिता आकोट तेल्हारा येथून अनेक कार्यकर्ते नागपूर येथे जात आहेत. भारसाखळेही फडणवीस यांना मुजरा करण्याची ही नामी संधी सोडणार नाहीत. त्याप्रसंगी होणाऱ्या चिंतनात भारसाखरळेंचा मुद्दाही असणार आहे. त्या चर्चेतून भारसाखळेंच्या भवितव्याचा बराच अंदाज लागणार आहे. परंतु आतील गोम ही आहे कि, भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याची जाणीव ठेवून भारसाखळे यांनी लोकसभेच्या निमित्त्याने आपल्या अपक्ष लढण्याच्या तयारीची पायभरणी केलेली आहे. परंतु त्यांना मतदार, विरोधी कार्यकर्ते, नेते आणि पक्षांतर्गत वाढता विरोध पाहता ते निवडणुकीचे अग्निदिव्य कसे पार पाडतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: