गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया – स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आज जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजयसिंह टेंभरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत योजनांचा लाभ लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश बांधकाम सभापती यांनी दिली. यावेळी खंडविकास अधिकारी पिंगळे, पंचायत समिति सभापती मुनेश्वर रहांगडाले व विनोद बिसेन आदी उपस्थित होते.
पंचायत समिती अंतर्गत येणार्या विविध योजनांचा आढावा या प्रसंगी घेण्यात आला. दरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्या निर्देशनास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ता खडीकरण, सिंचन विहिर, भात खाचरे, सिमेंट नाली बांधकाम,सिमेंट रस्ता, पांदन रस्ता, नाला सरळीकरण, तलावातील गाळ काढणे, मैदान सपाटीकरण, गुर्हांचा गोठा, घरकुल बांधकाम, वृक्ष लागवड, कंपाउंड वॉल, सेंद्रिय खतटाकी बांधकाम, गोदाम बांधकाम आदी कामांची माहिती जाणून घेत कामाची संख्या, एकूण ग्रामपंचायत तसेच सुरू असलेले कामे व सेल्फ वरील मंजुर कामे यांचा आवाढा घेण्यात आला.
दरम्यान तालुक्यातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात यावा तसेच मंजुर कामे त्वरित मार्गी लावण्यात यावी व जी कामे प्रस्तावित आहेत त्या योजनांना गती देण्यात यावी असे निर्देश सभापती टेंभरे यांना दिले. आयोजित आढावा बैठकीला पंचायत समिति चे सर्व अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.