‘एक-शून्य-आठ’ रूग्णवाहिका सेवेची दहा वर्षे
अकोला – संतोषकुमार गवई
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 108 रूग्णवाहिका सेवेचा राज्यात 1 कोटींहून अधिक व्यक्तींना लाभ झाला असून, गत दशकात अकोला जिल्ह्यातील 1 लक्ष 78 हजार व्यक्तींना लाभ मिळाला आहे. आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ‘एक-शून्य-आठ’ हा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा अव्याहतपणे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सेवेची सुरूवात जानेवारी 2014 मध्ये झाली. राज्यात 937 रूग्णवाहिका असून, त्यातील 233 रूग्णवाहिकांत ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’ सुविधा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात 16 ठिकाणी उपलब्ध ‘बीव्हीजी’चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. शरद भटकर म्हणाले की, जिल्ह्यात 16 ठिकाणी 108 रूग्णवाहिका उपलब्ध आहेत.
त्यात जिल्हा रूग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, मूर्तिजापूर उपजिल्हा रूग्णालय, बाळापूर, अकोट, बार्शिटाकळी व तेल्हारा ग्रामीण रूग्णालय, वाडेगाव, आलेगाव, पातूर, पिंजर, माना, उरळ, पोपटखेड व हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गांधीग्राम उपकेंद्राचा समावेश आहे. जिल्हा शासकीय रूग्णालय, तसेच अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर येथील रूग्णवाहिकेत ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’ सुविधा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात रूग्णवाहिकेद्वारे अपघात, घातक हल्ल्यात जखमी, जळित, हृदयविकाराचा झटका, विषबाधा, इतर अनेक आजारांच्या रूग्णांना सेवा देण्यात आली आहे. याद्वारे हजारो रूग्णांना वेळेवर रूग्णालयात पोहोचविल्याने जीवनदान मिळाले. या रूग्णवाहिकांनी कोरोना काळातही महत्वपूर्ण सेवा बजावली आहे. तातडीच्या प्रसंगी गरजूंना या सेवेचा लाभ मिळावा यासाठी ही माहिती सर्वदूर पोहोचविण्यात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले.