छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती शिबिर उत्साहात संपन्न…
वाशिम – चंद्रकांत गायकवाड
आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकवायचं असेल तर अभ्यास, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम घेतल्या शिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविण्यपूर्ण विभाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन २५ जून रोजी करण्यात आले.
त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, आज तुम्ही शैक्षणिक प्रवाहात आहात. कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत आहात, आयुष्याला कलाटणी देणारी ही सुवर्णसंधी आहे. तीचं सोनं करा. सोशल मिडियावर अमूल्य वेळ न घालवता पुस्तकांचं वाचन करा. मोबाईलचा वापर नवनवीन माहिती घेण्यासाठी करा.असेही त्या यावेळी म्हणाल्या.
छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी महत्वाचा उपक्रम असून तरूणाईतून उद्योजक, तसेच कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी अनेकविध योजना- उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन व दिशा देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर हे महत्वाचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन आ. किरणराव सरनाईक यांनी आज उद्घाटनाप्रसंगी केले.
विद्याभारती करीअर अकॅडमीचे संचालक प्रा.दिलीप जोशी यांनी करिअर शिबिरांच्या निमित्ताने आपल्या समोर येणारे नवकौशल्य, दर्जेदार शिक्षण- प्रशिक्षण आणि रोजगार संधी याचा तरुणाईने लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ते मार्गदर्शनात म्हणाले की, युवकांनी स्व:तामधील क्षमता ओळखून ध्येय निश्चित करावे. याकरिता योग्य नियोजन व कठोर परिश्रमाने स्पर्धेत स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे.
यावेळी एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी गौरव इंगळे, युवा उद्योजक श्री.घुणागे, इस्माईल पठाण यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश जयस्वाल यांनी ध्येय गाठण्यासाठी योग्य दिशा देण्याचे काम आजच्या करिअर शिबिर आयोजनातून घडत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्री नखाते यांनी तर संचालन शिल्पनिदेशक एस.व्ही काकडे यांनी केले. उपस्थितांचे आभार पंजाबराव चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, कर्मचारी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी – कर्मचारी,विद्यार्थी, पालक, युवक – युवतींची उपस्थिती होती.