- रात्री साडेदहा दरम्यानची घटना
- दोन अडीच तास निघाल्या अग्नीच्या ज्वाला
- फिनिशिंग विभागातील ‘करोडोंची मशीन व शेड जळाले
- रामटेक – राजु कापसे
- मौदा मार्गारील नगरधन येथील प्रख्यात सुर्यलक्ष्मी कॉटन मिलमधील फिनिशिंग विभागात काल दि.२३ मे च्या रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात या विभागातील एक करोडो रुपयाची मशीन जळाल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जाते. सुदैवाने यात जिवीत हाणी झाली नाही. नगरधन येथील सुर्यलक्ष्मी कॉटन मिल ही परीसरातील सर्वात मोठी कंपनी गणल्या जाते. येथे जवळपास पाच हजार कामगार काम करीत असतात.
कामगारांकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार काल दि. २३ मे ला रात्री साडेदहा दरम्यान येथील फिनीशींग विभागातील स्टेंटर मशीनला अचानकपणे आग लागली. क्षणार्धात या आगीने रौद्र रूप धारण करीत मशीनसह शेड ला विळखा घातला. यावेळी शेड बाहेर उपस्थित कामगारांना शेड मधुन लख्ख प्रकाश येतांना दिसला. लागलीच त्यांनी शेड कडे धाव घेतली असता त्यांना अग्नीचे रौद्र रूप दिसुन आले. कामगारांनी आरडा ओरड करीत लगेच वरिष्ठांना माहिती दिली व आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
आगीचे रौद्र रूप पहाता रामटेक तथा कामठी वरून अग्नीशमन वाहने बोलविण्यात आले. शर्तीच्या प्रयत्नानंतर एक तासात आग आटोक्यात आली तर दोन तासात विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत येथील करोडो रुपयांची स्टेंटर मशीन तथा शेड चे मोठे नुकसान झाले होते. या मशीनवर दोन कॉईल च्या मध्ये जिन्स कापड हिट होत असतो तेव्हा येथे अगोदरच खुप उष्णता निर्माण झालेली असते त्यात भर म्हणजे सध्याचे उष्ण तापमान यामुळे आग लागली असावी अशी माहिती येथील कामगारांनी संवादाद्वारे दिली.
- आग लागण्याचे कारण निष्पन्न झाले नाही – व्यवस्थापक थोरात
या घटनेबाबत सूर्य लक्ष्मी कॉटन मिल चे व्यवस्थापक श्री. थोरात यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून विचारणा केली असता काल रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास कंपनीच्या फिनिशिंग वॉर्ड मधील स्टेंटर मशीन ला अचानकपणे आग लागली आग विझवण्यासाठी रामटेक तथा कामठीवरून अग्निशमन वाहने बोलविण्यात आली दरम्यान एक तासांमध्ये आग आटोक्यात आली तर दोन तासांमध्ये ती पूर्णपणे विझवण्यात आली. मशीन आणि शेड धरून जवळपास दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती थोरात यांनी दिली. आग लागण्याचे नेमके कारण अजूनही कळाले नसून आम्ही संबंधित मेकॅनिकल यांना बोलविले आहे ते आल्यावरच आग कशी लागल्याचे कारण पुढे येईल असेही थोरात यांनी सांगीतले.