निशांत गवई, पातूर
पातुर- तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील एका महिलेला चान्नी पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदाराने शरीर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाखल केलेली आहे. या घटनेने पोलीस प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की ती चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील गेल्या 14 एप्रिल रोजी या महिलेच्या कुटुंबाचे गावातीलच एका इसमासोबत भांडण झाले. या भांडणाची तक्रार देण्याकरिता संबंधित महिला आपल्या पतीसह चान्नी पोलीस स्टेशन येथे गेली होती. तक्रार दाखल केल्यानंतर परत येत असतांना चान्नी पोलीस स्टेशन चा हवालदार बाळकृष्ण येवले याने दोघा पती-पत्नींना फाटकाजवळ थांबवून महिलेच्या पतीला बाजूला थांबायला सांगितले व तो महिलेसोबत एकट्यात बोलला की तू मला आवडते पुढे काय करायचे ते मी सांगतो. त्यानंतर येवले हवालदाराने सदर महिलेच्या मोबाईल क्रमांकावर अनेक वेळा फोन केले. 22 एप्रिल रोजी दोघा पती-पत्नींना पोलीस स्टेशनला बोलावून सीआरपीसी नुसार कार्यवाहीचे पत्र त्यांच्या हाती दिले. त्यानंतर पुन्हा हवालदार येवले महिलेसोबत मोबाईलवर आक्षेपार्ह पद्धतीने बोलत राहिला. 23 एप्रिल रोजी येवलेने महिलेला पुन्हा फोन केला व दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास येवले संबंधित महिलेच्या घरी पोहोचून व महिलेच्या घरात शिरून महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन करून विनयभंग केला. त्याने महिलेला शरीर सुखाची मागणी केली.
यावेळी महिलेने आरडाओरड केल्याने हवालदार येवले घरातून बाहेर पडला व फाटकाजवळ जाऊन उभा राहिला. तेथून त्याने कोणाला काही सांगायचे नाही, सांगितल्यास महिलेच्या पतीला अडकविण्याची धमकी दिली, असे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. 24 एप्रिल रोजी हवालदार येवलेने सदर महिलेला पुन्हा मोबाईलवर फोन केले. त्यानंतर 30 एप्रिल रोजी महिला आपल्या पतीसह तहसील कार्यालय येथे जमानत घेण्याकरिता गेली होती ते काम पूर्ण झाल्यानंतर तहसील बाहेर दोघे पती-पत्नी उभे असतांना हवालदार बाळकृष्ण येवले तेथे आला व त्याने कुणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संबंधित महिलेने झालेला सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. याप्रकरणी दोघे पती-पत्नी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेले असता तेथे हवालदार येवले आधीच हजर असल्याने शेवटी संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 6 मे रोजी तिच्यासोबत घडलेल्या सर्व आपबीतीची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या घटनेने पोलीस प्रशासनासह संपूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण झाली असून या प्रकाराने नागरिकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. ज्यांच्यावर महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तेच जर असे प्रकार करत असतील तर महिलांनी संरक्षणाची अपेक्षा करायची कुणाकडून असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे