अकोला : लोकसभेसाठीच्या उमेदवारीवरून भाजप पक्षश्रेष्ठींचा सध्या ‘केमिकल लोचा’ झाल्याचं चित्र आहे. एकीकडे देशभरात मोदी-शहांच्या जोडीने ‘परिवारवादा’विरोधात रणशिंग फुंकलं आहे. मात्र, अकोल्यात याच ‘परिवारवादा’चं भूत भाजपाच्या मानगुटीवर बसलं आहे. संजय धोत्रे आजारी असल्याने त्यांचा मुलगा अनुप, पत्नी सुहासिनीताई, भाचे आमदार रणधीर सावरकर आणि जवळचे नातेवाईक डॉ. रणजीत सपकाळ उमेदवारीसाठीच्या ‘रेस’मध्ये आहे. त्यामूळे अकोल्यात भाजप ‘धोत्रें’च्या परिवारवादातून बाहेर पडणार का?, याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
अकोल्यात बऱ्याच इच्छुकांची तयारी असून भाजपच्या दुसऱ्या ‘लिस्ट’मध्ये आपलं नाव येईल अशी अपेक्षा बाळगून काही भावी खासदारांचा प्रचार सुरू आहे. मात्र, जिल्ह्याबाहेरील पार्सल येणार असल्याची बातम्यांनी भावी खासदारांची झोप उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या वाढीसाठी जिल्ह्यात जीवाचे रान करणारे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते डावलले जाणार की नाही, याचं कोणतंही सोयरसुतक या भावी खासदारांना नाही. तर वंचित महाविकास आघाडी सोबत गेली तर वंचितचे पारडे जड होणार म्हणून भाजप त्या जोडीचा उमेदवार देणार असल्याचे समजते.
अकोला भाजपमध्ये दोन गट आहेत. भाजपचा दुसरा गटही मैदानात उतरला असून तोही तिकिटाच्या रेस मध्ये असल्याचे समजते. एकमेकांना तिकीट मिळू नये यासाठी दोन्ही गट प्रयत्न करतीलच या दोघांच्या भांडणात तिसऱ्याच्या फायदा होणार काय?. तर दुसरीकडे या मतदार संघात बाहेरील पार्सल येणार असल्याची चर्चा सुरु आहे मात्र ती केवळ अफवा असल्याचे समजते.