फळे, भाजीपाला व फुलवर्गीय पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी शासन कटिबद्ध – डॉ. कैलास मोते
उद्यानिकी क्षेत्रात शाश्वत शेती व्यवसायाचा मुलमंत्र – कुलगुरू डॉ. शरद गडाख
अकोला – संतोषकुमार गवई
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या युद्धजन्य घडामोडी भविष्यातील आव्हानांची नांदी ठरत असतांना पुढील लढा पाण्यासाठी झाल्यास सर्वाधिक लोकसंख्यांक आपल्या देशातील परिस्थितीबद्दल विचार अस्वस्थ करणारा असल्याचे चिंताजनक प्रतिपादन करताना महाराष्ट्र राज्य जलसंधारण परिषदेचे माजी अध्यक्ष सुप्रसिद्ध जलतज्ञ विजयआण्णा बोराडे यांनी उपस्थित संशोधक शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाला जलसंवर्धनाचे महत्त्व विषद केले.
उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर आयोजित दोन दिवसीय शिवार फेरी तथा चर्चासत्र आणि प्रशिक्षण वर्गाचे समारोप प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून संबोधनात ते उपस्थित शेतकरी बंधू-भगिनी युवक युवतींसोबत संवाद साधताना बोलत होते.
तर शेतीप्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या भारत देशातील शेती व्यवसायाला विशेषतः जिरायती क्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या त्यातही युवा वर्गाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थैर्यासाठी केवळ अन्नधान्य उत्पादनावर अवलंबून न राहता फळे, भाजीपाला आणि फुल पिकांच्या लागवड तंत्रज्ञानासह प्रक्रिया आणि विपणनातूनच खरी समृद्धी लाभणार असल्याचे आश्वासक प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे संचालक फलोत्पादन डॉ. कैलास मोते यांनी करतांना फळे भाजीपाला क्षेत्र वाढीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र सरकारच्या कृषी तथा उद्यानिकी विभागाच्या माध्यमातून विविध योजना विषयी माहिती देताना डॉ. मोते यांनी युवा वर्गाने पुढे येण्याचे आवाहन केले. उद्यानिकी क्षेत्रात शाश्वत शेती व्यवसायाचा मुलमंत्र असल्याचे सांगताना कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी दिवसे गणिक वाढत जाणारी लोकसंख्या आणि घटत जाणाऱ्या नोकऱ्याचे प्रमाण लक्षात घेता शेतकरी कुटुंबातील युवकांनी भविष्याचा अंदाज घेऊन कौशल्याधारित स्वयंरोजगाराच्या वाटा शोधा शोधण्याचे आवाहन करतांना कृषि आधारित रोजगार व स्वयंरोजगार विषयक अनेकानेक संधीना आपल्या अध्यक्षीय संबोधनात उलगडत कुठल्याही क्षेत्रातील पदवीधराला कृषी आधारित प्रक्रिया तथा तत्सम संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.
शाश्वत शेतीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या दोन दिवसीय शिवार फेरीची आज उत्साहात सांगता झाली या कार्यक्रमाचे समारोपीय सत्राचे प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, यांचे सह विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, यांचे सह उद्यान विद्या महाविद्यालयाचे विभाग प्रमुख सर्वश्री डॉ. शशांक भराड, डॉ. अरविंद सोनकांबळे, प्रा. नितीन गुप्ता आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
समारोप सत्र कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्यान विद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांनी केले, सूत्रसंचालन जेष्ठ भाजीपाला तज्ञ डॉ. विजय काळे यांनी केले तर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा महत्वाकांक्षी उपक्रमाचे प्रसंगी सर्वप्रथम पाहुण्यांनी फुल पिके फळपिके तथा भाजीपाला पिकांच्या विविध प्रजातींना भेटी देत शास्त्रज्ञांचे कौतुक केले.
विदर्भातील शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यांचा लाभ घेत अनेकानेक शेतकरी कुटुंब आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया सक्षम होत आहेत. शेतातून प्रयोगशाळेकडे या तत्वाने अग्रेसीत या विद्यापीठाने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अनुभवी मार्गदर्शनात कृषि विस्तार कार्यावर भर दिला असून आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग व प्रात्यक्षिके याची देही याची डोळा बघण्यासाठी उपलब्ध केले आहे. केवळ अवलोकन नव्हे तर लागवडी पासून प्रक्रिया सहित बाजारपेठेतील विपणनाचे बरकावे आदींची तांत्रिक दृष्ट्या सांगड घालण्याचे कसब देखील या निमित्ताने शेतकरी बंधू भगिनींना आत्मसात करायला मिळत आहे.
याच शृंखलेत विदर्भातील वातावरणात उत्पादित होणारे व बाजारपेठेत चांगली मागणी असणारे फळे, भाजीपाला व फुल पिकांचे जिवंत प्रात्यक्षिके याची देही याची डोळा पाहण्याची व शास्त्रज्ञांकडून लागवड तंत्रज्ञान जाणून घेण्याची सुवर्णसंधी शेतकरी बंधू भगिनींना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्माचे सहयोगाने “उद्यानविद्या महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त” दिनांक 21 व 22 फेब्रुवारी 2024 रोजी उपलब्ध करून दिली होती.
यामध्ये 21 विविध भाजीपाला पिकांचे 34 वाण 20 एकर क्षेत्रावर तसेच 17 विविध फळ पिकांचे 34 वाण 170 एकर क्षेत्रावर आणि 23 विविध फुल पिकांचे 315 शोभिवंत झाडे दहा एकर क्षेत्रावर असे एकूण 200 एकर क्षेत्रावर उद्यानविद्या विषयक 58 पिकांचे 383 पीक प्रात्यक्षिके सर्व तंत्रज्ञानासह प्रत्यक्ष पाहणीस उपलब्ध करून दिली आहेत.
सदर दोन दिवसीय उद्यानविद्या विषयक शिवार फेरी व चर्चासत्र कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता तथापि ज्या शेतकरी बंधू भगिनींनी या अद्वितीय संधीचा लाभ घेता आला नाही त्यांनी उद्या शुक्रवारी भेट द्यावी जाहीर कार्यक्रम नसला तरीही शिवार फेरी साठी प्रक्षेत्र उपलब्ध राहिल असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे तथा उद्यान विद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई यांनी कळविले आहे.
(संतोषकुमार गवई सहसंपादक अकोला ९६८९१४२९७३)