मुंबई – गणेश तळेकर
अनेक हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये खलनायक म्हणून झळकलेले अभिनेते राहुल देव आता आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात ‘काकर खान’ ही खलनायकी व्यक्त्तिरेखा साकारणार आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिक पट रुपेरी पडद्यावर उलगडणारा ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
औरंगजेबाने बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकर खान या अनुभवी सरदारावर सोपविली होती. लोकांवर जिझिया कर लावत काकर खानने जनतेस वेठीस धरले होते. काकरखानच्या अन्यायी राजवटीपासून छत्रपती संभाजी महाराजांनी रयतेची सुटका केली होती.
आपल्या या भूमिकेविषयी बोलताना राहुल देव सांगतात की, ‘आजवरच्या अभिनय कारकिर्दीत अनेक खलनायकी भूमिका साकारल्या असल्या तरी क्रूरकर्मा ‘काकर खान’ ही ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. एखादी विशेष भूमिका वठवताना अगदी भाषेपासून चालण्या बोलण्याच्या सवयी पर्यंतचे बदल करावे लागतात. काकरखान खानची भूमिका असल्याने उर्दू भाषा आत्मसात करणं मला गरजेचं होत. प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा लहेजा असतो, तो लहेजा लक्षात घेत ही भाषा मी शिकून घेतली. भाषेनंतर प्रश्न होता तो लुक्सचा. त्यामुळे देहबोलीही तितकीच बोलकी असण्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी माझ्या अभिनयातून केली असल्याचे राहुल सांगतात.
मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. कार्यकारी निर्माता प्रखर मोदी आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए.फिल्म्स सांभाळत आहे.