आकोट – संजय आठवले
नवीन महसूल कार्यालय लोकार्पण सोहळ्याचे निमित्त्याने आमदार भारसाखळे यांचे वतीने जल्लोष साजरा होत असून त्याकरिता पालिकेचा भरणा चोरून व पालिकेची परवानगी न घेता अख्या आकोट शहरभर मोठमोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. हा उपद्रव कमी म्हणून की काय हे बॅनर शासकीय मालमत्तेवरही लावण्यात आले आहेत.
अन्य वेळी अशा बेकायदा बॅनर्स लावल्याने कार्यप्रवण होणार्या पालिका व पोलीस प्रशासनाने मात्र या बॅनर्स संदर्भात मौन धारण केले आहे. त्यामुळे आकोट शहर आमदार भारसाखळे यांनी विकत घेतले आहे की काय? असा संतप्त प्रश्न विचारल्या जात आहे.
आकोट शहरात नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा ऊद्या दि.१०फेब्रुवारी रोजी होऊ घातला आहे. त्याकरिता बॅनर्स वर लिहल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत या मान्यवरांचे शहरात आगमन होत आहे.
परंतु अर्धवट कामांचाच हा सोहळा असल्याने या सोहळ्याला अर्ध्यापेक्षा अधिक मान्यवर पाहुणे दांडी मारणार आहेत. शिंदे, फडणवीस, पवार, सावंत हे सोहळ्याला येणारच नाहीत. राज्याचे महसूल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने केवळ नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेच हजेरी लावणार आहेत. तरीही अख्ख्या शहरात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे लहान लहान फोटो असलेले मोठमोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत.
या सोहळ्याकडे त्यांच्या अशा पाठ फिरविण्यामुळे आमदार भारसाखळे यांचे मंत्रिमंडळात कसे वजन आहे ते अधोरेखित झाले आहे. भारसाकळे यांचे करिता तो मोठा झटका आहे. या झटक्याने त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेतही मिळाले आहेत. त्यामुळे ते मनातून खट्टू आहेत. परंतु त्या वेदनांवर फुंकर घालणेकरिता त्यांनी शहरभर बॅनर्स लावण्याचा धुमधडाका लावला आहे. त्याद्वारे मतदारसंघात आपला दरारा दाखवण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र या बॅनर्समुळे शहरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
त्याला कारणेही तशीच आहेत. भारसाखळे आमदार आहेत. त्यामुळे शासकीय नियम बंधनांचे पालन करणे त्यांना अनिवार्य आहे. शासनाच्या कोणत्याही घटकाचे आर्थिक नुकसान होऊ न देणे ही आमदार म्हणून त्यांची जबाबदारी आहे. मात्र अहंकारात प्रधानमंत्री मोदींपेक्षा कणभरही कमी नसलेल्या आमदार भारसाखळे यांचे तर्फे लावण्यात आलेल्या एकाही बॅनरची परवानगी घेण्यात आलेली नाही. हे सारे बॅनर्स विनापरवाना लावण्यात आलेले आहेत. त्यातच धक्कादायक म्हणजे या हजारो बॅनर्सच्या लक्षावधी रुपयांचा भरणाही चोरण्यात आलेला आहे. एकाही बॅनर चे पालिका शुल्क अदा करण्यात आलेले नाही.
त्यातच कहर म्हणजे भारसाखळे यांचे तर्फे हे बॅनर चक्क आकोट अकोला मार्गावरील रेल्वे पुलावर लावण्यात आले आहे. वास्तविक हा पूल रेल्वे प्रशासनाचे मालकीचा आहे. त्यावरून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने रस्त्याची मालकी राज्य महामार्ग विभागाकडे आहे. त्यामुळे नियमानुसार मुळात हे बॅनर तिथे बांधताच येत नाही.
कारण मार्गाचे मधोमध असलेल्या अशा बॅनर्समुळे वाहन चालकाचे लक्ष विचलित होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्त्यातील पुलाच्या मधोमध असे बॅनर लावण्यास सक्त मनाई आहे. परंतु आपण आमदार नव्हे तर आकोटचे मालक आहोत अशी धारणा झालेल्या भारसाखळे यांचे सूचनेनुसार या रेल्वे पुलावर स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे.
यासोबतच या पुलाच्या दोन्ही बाजूंनी भाजप पक्षाचे झेंडेही बांधण्यात आले आहेत. येथे उल्लेखनीय आहे कि, एका कार्यक्रमाचे अनुषंगाने याच पुलावर असाच प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळेस पोलीस प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून येथील बॅनर्स व झेंडे हटविले होते. मात्र आज जणू हा पूल आमदार भासाकळे यांची खाजगी मालमत्ता आहे असे समजून या बॅनर व झेंड्याबाबत पोलीस प्रशासनाने मौन धारण केले आहे.
दुसरीकडे वाढदिवसाच्या निमित्याने कुणी एखादे बॅनर लावल्यास शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची दवंडी पिटित पालिका प्रशासन ते बॅनर्स त्वरित काढून टाकते. परंतु ह्या बॅनरबाबत मात्र पालिकेनेही मूग गिळून घेतलेले आहेत. परंतु शहरातील व रेल्वे पुलावरील बॅनरबाबत योग्य ती कारवाई होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यात या घटनेचा दाखला देऊन बॅनर लावले जातील त्यावेळी पालिका व पोलीस प्रशासनाकडे उत्तर नसेल.
त्यामुळे कायद्याचा अमल जारी होणेकरिता याबाबतीत कारवाई होणे अनिवार्य आहे. महत्त्वाचे म्हणजे या साऱ्या बाबी आकोटकरांच्या ध्यानात आलेल्या आहेत. त्यातीलच एका सामान्य आकोटकराची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी व विचारप्रवण करणारी आहे.
तो म्हणाला, “अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरचा माणूस आकोटात येऊन विनापरवाना बॅनर्स लावतो. पालिकेचा भरणाही चोरतो. तरी त्याचे कुणी काही करीत नाही. पण आम्ही आकोटचेच असल्यावरही विनापरवाना एकही बॅनर लावू शकत नाही. म्हणजे आकोट आमदार भारसाखळे यांच्या मालकीचे आहे? भात शिजला हे तपासण्याकरिता जशी शितावरून भाताची परीक्षा केली जाते, अगदी तशीच आकोटकरांच्या मनातील भावनांची परीक्षा या एका प्रतिक्रियेने झाली आहे.