आकोट – संजय आठवले
गत आठ वर्षांपासून आकोट परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाचे काम करणाऱ्या व सद्यस्थितीत आकोट शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या सागर ऊकंडे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा त्याग केला आहे. प्रहार पक्षांतर्गत होणारी गटबाजी, कलह तथा वरिष्ठांची मनमानी ह्याला कंटाळून आपण प्रहारची काडीमोड घेत असल्याचे त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
येथे उल्लेखनीय आहे कि, आकोट मतदार संघात प्रहारचा प्रवेश सागर उकंडे आणि विशाल (गोलू) भगत या दोन धडपड्या युवकांचे माध्यमातून झाला. सुरुवातीच्या काळात अनेक समाजोपयोगी कार्य करून या दोघांनी आकोटात युवकांची फळी उभी केली. त्यांचे सहकार्याने या जोडीने खकोटात प्रहारला दखलपात्र दर्जा प्राप्त करून दिला. त्यांचेच माध्यमातून स्व. तुषार पुंडकर हा महत्त्वाकांक्षी युवक प्रहार मध्ये सामील झाला होता. थोड्याच दिवसात चित्र पालटले आणि हळूहळू आकोटची सारी सूत्रे तुषार ने आपले हाती घेतली.
त्यानंतर आकोट तालुक्यात विविध आंदोलने केल्याने प्रहारकडे लोकांच्या नजरा वळल्या. परंतु सागर उकंडे आणि विशाल भगत हे दोघेही हळूहळू दुय्यम स्थानी आले. तरीही त्यांचे कार्यात मात्र कुठेही खंड पडला नाही. त्याची परिणीती सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आकोट मतदार संघात प्रहारचा उमेदवार उभा करण्यात झाली. या निवडणुकीत प्रहारने सर्वच पक्षीय दिग्गजांचे डोळे विस्फारण्या इतपत मते घेऊन या दिग्गजांना प्रहारची दखल घेण्यास भाग पाडले. या साऱ्या प्रक्रियेत सागर उकंडे आणि विशाल भगत यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतरच्या काळात तुषार पुंडकरवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात येवून त्याचा खून केला गेला.
या घटनेने हादरलेली प्रहार काही काळ सैरभर झाली. त्याच मोक्यावर अनिल गावंडे यांचा प्रहार मध्ये प्रवेश झाला. त्यांचेकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पद सोपविण्यात आले. मात्र स्व. तुषार पुंडकरचा गट या नवीन नेतृत्वाला स्वीकारण्यास कमालीचा नाखुश होता. तरी बच्चू कडू यांनी अनिल गावंडे यांचेवर विश्वास दर्शविला. त्यामुळे अनिल गावंडे यांनी आपल्या पद्धतीने अकोला जिल्ह्यात प्रहारची नवरचना केली. परंतु प्रहार चे जुने कार्यकर्ते आणि गावंडे यांचेतील दुरावा मात्र कायमच राहिला.
अशातच जुना जाणता कार्यकर्ता म्हणून सागर उकंडे याचे कडे आकोट शहर अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. परंतु अल्पावधीतच सागरची प्रहार मध्ये उपेक्षा होऊ लागली. हे सारे असह्य होऊन अखेरीस त्याने आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अतिशय व्यथित होऊन त्याने दिलेल्या राजीनामात म्हटले कि, मी बच्चू कडू ह्यांनी स्थापन केलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचा आकोट शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
मागील ८ वर्षे मी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्य तनमनधनाने करीत आहे. बच्चू कडू ह्यांचे कार्य, विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे, तसेच प्रहार जनशक्ती पक्ष हा गावपातळी पर्यंत पोहचविण्याचे कार्य आजतगायत सुरु होते. त्यातून खूप काही शिकण्याची संधी मिळाली. रुग्णसेवा असो कि अपंग बांधवांची सेवा असो, त्यात खुप समाधान मिळाले. आजवर जनसामान्याचे प्रश्न सोडविताना माझेवर अनेक शासकीय गुन्हे नोंदविले गेले. तरीही त्याचा मला अभिमान वाटतो.
पण मागील दोन वर्षांपासून प्रहार जनशक्ती पक्षात स्थानिक पातळीवर डावपेच, कलह निर्माण होत आहेत. गटबाजी, वरिष्ठ पदाधीकारी ह्यांची मनमानी व शिष्टाचाराचे उल्लंघन अश्या विविध बार्बीमुळे सध्या पक्षात काम करणे कठीण झाले आहे. सध्याचा आकोट शहरातील प्रहार पक्ष हा बच्चू कडूंच्या विचारांच्या विरुद्ध दिशेने जात आहे. त्यामुळे आणि वेळोवेळी त्याची माहिती बच्चू कडू यांना देऊनही त्यांनी त्याची दखल न घेतल्याने मी आकोट शहर अध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे