Monday, November 25, 2024
Homeराज्यरामटेक साहित्य विश्वातले दोन तळपते तारे प्रा.डॉ.श्री गिरीश सपाटे आणि प्रा.डॉ.श्री मिलिंद...

रामटेक साहित्य विश्वातले दोन तळपते तारे प्रा.डॉ.श्री गिरीश सपाटे आणि प्रा.डॉ.श्री मिलिंद चोपकर…

रामटेक – राजु कापसे

विदर्भ साहित्य संघाचा १०१ वा वर्धापन दिन आणि वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते नागपुरात पार पडला. आपल्या रामटेकरांसाठी अभिमानाची गोष्ट ही की, आमच्या रामटेकचे सुपुत्र प्रा.डॉ.गिरीश सपाटे यांना मा. गो. देशमुख स्मृती संत साहित्य लेखन पुरस्कार आणि मिलिंद चोपकरांना कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.

दोघांचेही मनापासून खूप खूप अभिनंदन. वारकरी संप्रदायातील अलक्षित संतांच्या साहित्यावर अभ्यास करून त्यांना प्रकाशात आणण्याचं मौलिक कार्य श्री सपाटे सरांनी केलं. भागवत धर्मातील अलक्षित संत कवी’ या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तर श्री चोपकर सरांनी ‘मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर, शरदिनी डहाणूकर, अतुल धामणकर आणि कृष्णमेघ कुंटे’ या लेखकांच्या वन साहित्याचे अध्ययन समीक्षण करून आपली पीएच.डी. प्राप्त केलेली आहे. वन साहित्य: आस्वादाची अक्षरे’ या विषयावर आपला ग्रंथ सिद्ध केलेला आहे.

या ग्रंथासाठी सरांना गौरविण्यात आले. चोपकर सरांनी बहुतेक सर्व प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रातून साहित्यावर लेखन केलेलं आहे. अनेक दिवाळी अंकातून सुद्धा त्यांच्या साहित्याचे प्रकाशन झालेले आहे. विशेष म्हणजे आपल्या रामटेकचे भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे त्यांचे पंधराच्या वर लेख वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेले आहेत. आकाशवाणीच्या श्रोत्यांना सुद्धा त्यांच्या वनसाहित्याने भुरळ घातलेली आहे.

चोपकर सर आणि सपाटे सर दोघेही स्वांत सुखाय लिखाण करणारे सच्चे साहित्यिक आहेत. रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यास मंडळाचे सदस्य असलेल्या सपाटे सरांचे, मर्मबंध’, ‘काळोख गडद होत चाललाय ‘ हे कवितासंग्रह सुप्रसिद्ध आहेत. सपाटे सरांनी त्यांचे गुरु कृष्णा चौधरी यांच्या समग्र साहित्याचे समीक्षण करून ‘वाटा आणि वळणे’ हा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे.

नागपूर विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांचे पीएच. डी. साठी ते मार्गदर्शक आहेत. अग्निपंख ही व्याख्यानमाला रामटेकरांसाठी त्यांनी काही काळ चालवली. ‘अग्निपंख’ या दर्जेदार अनियतकालिका चे संपादक म्हणून काम पाहतात .’संत साहित्यातील सौंदर्य संबोध ‘ या सुंदर ग्रथाचे संपादन त्यांचेच. त्यांचा ‘प्रतीतीच्या पाऊलखुणा’ हा लेखसंग्रह मराठी साहित्य विश्वात सुप्रसिद्ध ठरला.

अनेक कवी संमेलन गाजविणारे सपाटे सर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विशेष आमंत्रित कवी असतात. सरांच्या मराठी गीतांचा सांज खुलली नभात ‘ हा सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांनी गायलेला अल्बम आलेला आहे. हा माणूस रामटेक मधून फिरतो तेव्हा यांचे सर्वसाधारण राहणीमान पाहून कोणी विश्वास ठेवणार नाही यांना इतका मोठा मानमरातब साहित्य क्षेत्रात आहे. अनेक जुन्या नामवंत कवींच्या कविता सरांना मुखोद्गत आहेत.

प्रचंड वाचन तसेच रामटेक मध्ये तरी यांच्या इतकी मोठी वैयक्तिक लायब्ररी खचितच कोणाची असेल.रामटेक मध्ये जगप्रसिद्ध कालिदास स्मारक आहे. पण कालिदास दिनी शासन उदासीन आणि स्मारक अंधारातच. काही वर्षांपूर्वी मी, आमचे दीपकराव गिरिधर सर, सपाटे सर, डामरेसर, अनिल भाऊ वाघमारे आणि अजून एकदोन कवी मित्र (माफ करा नावं आठवत नाहीत) असे सात आठ जणांनी ठरवलं ‘आषाढस्य प्रथम दिने’ कालिदास दिनी स्मारकात जाऊन आपापल्या कवितांचं वाचन करायचं. मी काही कवी नाही पण कालिदासाचे चरित्र मी मांडले होते.

आता हा कार्यक्रम नियमित आणि व्यापक स्वरूपात सुरू आहे. अशा अनेक चांगल्या कामाची सुरुवात सपाटे सरांनी केलेली आहे. रामटेककरांना मात्र या हिऱ्याची अजूनही किंमत कळलेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. मिलींदभाऊंनी मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला आणि हळूहळू शाळेचं रुपडं पालटायला सुरूवात झाली. सहकारी शिक्षकांचे सहकार्य मिळवले.

त्यांचा विश्वास जिंकला‌. मी स्वतः पाहिलं आहे, त्याच्या सहकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत जागून शाळा बोलकी केली. शिक्षकांनी स्वतः रंग काम केलं. एकमेकांच्या सुख दुःखात धाऊन जाणारी टीम, सहकाऱ्यांचा एक परिवार त्या शाळेत तयार झाला. विद्यार्थी हिताचे कल्पक उपक्रम राबविण्यात हे स्वतः पुढे. भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्वच्छता मोहीम, सामान्य ज्ञान परीक्षा असे सगळे उपक्रम शाळेत राबविले जातात.

रामटेक मधली पहिली ‘अटल टिंकरीक लॅब’ सरांच्या प्रयत्नाने शाळेत उभी राहिली. रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटींग सारखे अनुभव विद्यार्थ्यांना घेता येऊ लागले. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात, चित्र विचित्र पेहराव केलेले आणि बेशिस्त विद्यार्थी. खरं नं? पण काही वर्षांपूर्वी सपाटे सरांच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलनात मला बोलावलं होतं तेव्हाचे चित्र पाहून मी अक्षरशः स्तब्ध झालो होतो.

एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. विद्यार्थी, विद्यार्थ्यींनी सगळे एकदम शिस्तबद्ध. डान्स झाल्यावर टाळ्यासुद्धा मोजून मापून. असा सरांचा शिरस्ता. आभाळाला गवसणी घालणारी ही दोन्ही माणसं पण दोघहीं तेव्हढीच विनयी. प्रत्येक वेळी यांच्याशी बोलतांना मी काहीतरी शिकत असतो. साहित्य सागरात विचरण करणारे हे दोन्ही ‘राजहंस’ आम्हा रामटेकरांसाठी भुषण आहेत. अशीच सकस, दर्जेदार साहित्य सेवा या दोहोंकडून घडावी हिच हंसवाहीनी, विद्यादायीनी चरणी प्रार्थना…

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: