Sunday, December 22, 2024
Homeराज्यआत्म शक्ती जागृत होऊन चांगल्या समाजाची निर्मितीचा संकल्प महिला करतील तेव्हाच महिलांची...

आत्म शक्ती जागृत होऊन चांगल्या समाजाची निर्मितीचा संकल्प महिला करतील तेव्हाच महिलांची उन्नती होणार…

राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहीका अन्नदानम सीतागायत्री यांचे प्रतिपादन..

अहेरी – मिलिंद खोंड

महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचे आर्थिक स्वावलंबन नसून आत्म शक्ती जागृत होऊन चांगल्या समाजाची निर्मितीचा संकल्प महिला करतील तेव्हाच महिलांची उन्नती होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहीका अन्नदानम सीता गायत्री जी यांनी आल्लापल्ली येथील ग्रीनलँड शाळेत आयोजित मातृशक्ती संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना केले.

तीन सत्रात झालेल्या या महिला संमेलनाला अहेरी उपविभागातील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. उद्घाटन सत्रात मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भामरागडच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषणा चव्हाण, अंजली हिरूरकर यांची उपस्थिती होती. दीप प्रज्वलन व भारतमातेचे पूजन करून संमेलनाला सुरुवात करण्यात आली.

रेला नृत्य व भजन यामुळे महिलांना खिळवून ठेवले होते. सत्राच्या मध्ये महिलांनी आकर्षक नृत्य सादर केले. संमेलन स्थळी शुभांगी नागपूरवार, भरटकर व ठाकरे यांनी काढलेल्या महिला नारीशक्तीच्या रांगोळी लक्ष वेधून घेतले होते.

पुढे बोलताना सीता गायत्री जी म्हणाल्या भारतीय चिंतनात महिलांना अन्य साधारण महत्त्व आहे मात्र महिला हजार वर्षाच्या गुलामगिरीत आपले सत्व विसरले त्यामुळे क्षात्रतेज लोप पावले. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात विविध महिलांनी समाजात जनजागृती करून समाजातील परिस्थिती बदलण्यासाठी क्षात्रतेज व ब्रह्मतेज जागवून समाजा चैतन्य निर्माण केले होते आजच्या महिलांनी हे लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यासाठी भारताची मातृशक्ती संघटित होणे गरजेचे आहे पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आजचा समाज हा धर्म आणि संस्कृतीला विसरत चालला आहे त्यामुळे धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम महिलाच करू शकतात.

आजच्या काळात टीव्ही चॅनलवर , वर्तमानपत्रात महिलांवर ठिकठिकाणी अत्याचार झाल्याच्या बातम्या येत असतात त्यामुळे महिलांची सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न आहे सरकार यासंदर्भात निर्भया सारखे कडक कायदे करीत आहे मात्र कायद्याने हा प्रश्न सुटण्यासारखा नाही जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत महिला समाजात सुरक्षित नाही.

त्यासाठी दोन गोष्टी करणे गरजेचे आहे महिलांनी आपले आत्मबल जागवुन कायम राखने गरजेचे आहे त्यासोबतच मुलांना चांगले शिक्षण व संस्कार,महिलेप्रति सन्मान शिकवण्याची आवश्यकता आहे त्यासोबत पुरुषांची महिलेप्रती मानसिकता व दृष्टी बदलण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. भारतीय संस्कृतीत महिलेला नारायणी म्हटले आहे मात्र आजच्या समाजात महिलांचे शोषण होत आहे कारण महिलेप्रति दृष्टी व भावना बरोबर नसल्याने होत आहे.

भारतीय चिंतनात महिलांना सर्वोच्च स्थान दिले आहे महिला सक्षमीकरणासाठी देशभरात विविध गैर सामाजिक संघटना काम करतात आर्थिक स्वावलंबन म्हणजे महिलांचे सक्षमीकरण ही मांडणी चुकीची असून या सोबतच जोपर्यंत महिला स्वतः आपली आतली ताकद ओळखून समाजाच्या हितासाठी काम करत नाही तेव्हापर्यंत महिला सक्षमीकरण होणार नाही. चांगल्या समाजाच्या निर्मितीचा संकल्प करण्याची क्षमता भारतीय महिलेत नक्कीच आहे.

सहायक प्रकल्प अधिकारी रोशना चव्हाण यांनी आदिवासी समाजात मातृसत्ताक पद्धती असून आदिवासीचे विचार पुढारले असल्याचे म्हटले त्यासोबतच आदिवासींच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविधी योजना विषयी माहिती दिली.

त्यासोबतच महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी संबोधित करताना सांगितले. प्रथम सत्रात प्रस्ताविक महिला संमेलनाच्या संयोजीका जयश्री नालमवार यांनी केले तर सांघिक गीत सरस्वती भजन ग्रुप आलापल्ली च्या सौ माधुरी गांगरेड्डीवार व सौ प्रतिभा देशमुख यांचे समूह यांनी सादर केले व वैयक्तिक गीत सौ गौरी कलकोटवार यांनी सादर केले तर सूत्रसंचालन मंगला मोहूर्ले अहेरी यांनी केले.

द्वितीय सत्रात सुधाताई तिवारी, गौरी तळवलकर, निरामय बहुउद्दिशिय सेवा संस्था नागपूर येथील डॉक्टर उर्मिलाताई क्षीरसागर ,मातृशक्ती संमेलनाच्या संयोजिका जयश्री ताईं नालमवार आदींची उपस्थिती मंचावर होती. या सत्रात महिलांचे आरोग्य ,महिलांच्या समस्या व महिलांचे आर्थिक स्वावलंबन यावर ऊहापोह करण्यात आला.

चर्चासत्रात ऍड. प्रीती डंबोळे,डॉ.अल्का उईके,डॉ.अस्मिता बिरेल्लीवार ,डॉ.नैना घुटे यांनी संमेलनाला उपस्थित महिलांनी विचारलेल्या प्रश्नाचे शंका निरसन केले. या सत्राचे सूत्रसंचालन अर्चना कविराजवार व जेट्टीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन खुशाली शेंडे यांनी केले.

संमेलन स्थळी विविध बचत गट, सामाजिक संस्थेतर्फे हस्तशिल्पाचे स्टॉल व प्रदर्शनी लावण्यात आली होती.
माजी पालकमंत्री राजे अमरीश राव यांनी संमेलनाला धावती भेट दिली. संमेलन यशस्वी करण्यासाठी महिला समन्वय समिती आलापल्ली च्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: