Sunday, December 22, 2024
Homeराज्यभाजप प्रदेश सरचिटणीसांच्या बालेकिल्ल्यावर वंचितने निशाण फडकविले…चोहट्टा पोट निवडणुकीत वडाळ यांचा विजय…राष्ट्रवादी...

भाजप प्रदेश सरचिटणीसांच्या बालेकिल्ल्यावर वंचितने निशाण फडकविले…चोहट्टा पोट निवडणुकीत वडाळ यांचा विजय…राष्ट्रवादी सेना प्रहार व काँग्रेसचे दिग्गज निष्प्रभ…

आकोट – संजय आठवले

आकोट तालुक्यातील चोहट्टा जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत आपला दबदबा कायम ठेवीत वंचित आघाडीच्या उमेदवाराने दणदणीत विजय प्राप्त केला असून भाजप राज्य सरचिटणीसांच्या बालेकिल्ल्यावर वंचितने निळे निशाण फडकविले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत राष्ट्रवादी, सेना, प्रहार व काँग्रेसच्या पराजयाने या पक्षांचे दिग्गज नेते निष्प्रभ ठरले असल्याचे दिसत आहे.

सुमारे एक वर्षांपूर्वी चोहट्टा जि. प. गटाचे विजयी उमेदवार तथा जि. प.अकोलाचे सभापती पंजाबराव वडाळ हे दिवंगत झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन करीत वंचित आघाडीने या निवडणुकीत दिवंगत पंजाबरावांचे चिरंजीव योगेश वडाळ यांना उमेदवारी बहाल केली.

तर महाविकास आघाडीतील सेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांनी गोपाळ म्हैसने यांना रिंगणात उतरवून एकत्रित आणि काँग्रेसने रविंद्र अरबट यांना उमेदवारी देऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. भारतीय जनता पक्षाने गजानन नळे यांना उभे केले. तर प्रहार जनशक्ती पक्षाने जीवन खवले यांना मैदानात उतरविले.

चोहट्टा परिसरात कोळी आणि कुणबी या समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा मराठा उमेदवार वगळता अन्य पक्षांनी कोळी आणि कुणबी उमेदवार देण्यावर भर दिला. त्यामुळे या निवडणुकीत वंचित आणि प्रहार तर्फे कोळी तर भाजप आणि सेना राष्ट्रवादी आघाडीने कुणबी उमेदवारांवर मदार सोपविली.

निकट भविष्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक पक्षाकरिता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्याकरिता सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली. त्यातच या जि. प. गटावर यापूर्वी वंचितचेच प्राबल्य असल्याने ते कायम ठेवण्याचे मोठे आव्हान वंचितपुढे होते. तर हा जि. प. गट भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांचे मतदारसंघातील असल्याने त्यांच्याही प्रतिष्ठेचा सवाल निर्माण झाला होता.

त्यामुळे वंचित वगळता झाडून साऱ्या पक्षांनी प्रचाराकरिता आपापल्या दिग्गजांना रस्त्यावर उतरविले. या दिग्गजांनीही वर्तमान स्थितीचे भान राखून प्रचारात जीव ओतला. वंचितने मात्र स्थानिक नेते व कार्यकर्त्यांवरच विजयाची जबाबदारी सोपवली. अशा स्थितीत दि.१७.१२.२०२३ रोजी २१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये ८,१७२ महिला व ८,९३२ पुरुष अशा एकुण १७,१०४ मतदारांपैकी ४,३५८ महिला व ५,६५१ पुरुष अशा एकुण १०,००९मतदारांनी आपला मत देण्याचा हक्क बजावला त्याची टक्केवारी ५८.५२ होती.

त्यानंतर दिनांक १८.१२.२०२३ रोजी तहसील कार्यालय आकोट येथे मतमोजणी करण्यात आली. यावेळी मतमोजणी करिता एकूण चार टेबल ठेवण्यात आले. त्यामुळे एकावेळी चार मतदान केंद्रांची मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या एकूण ६ फेऱ्या घेण्यात आल्या. सहाव्या फेरीनंतर वंचित आघाडीचे योगेश वडाळ यांना ३,७८१ म्हणजे सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना विजय घोषीत करण्यात आले.

भाजपचे गजानन नळे हे 2,387 मते घेऊन द्वितीय क्रमांकावर राहिले. तृतीय क्रमांकाची १,७६५ मते प्रहार चे जीवन खवले यांना मिळाली. १,१६० मतांवर सेना राष्ट्रवादी आघाडीचे गोपाळ म्हैसने यांना चतुर्थ स्थानी समाधान मानावे लागले. काँग्रेसचे रवींद्र अरबट यांना मात्र मतांचा चौथा अंक गाठता न आल्याने त्यांना तीन अंकी म्हणजे ७९५ मतांवरच थांबावे लागले.

मतांची ही आकडेवारी पाहता योगेश वडाळ यांनी त्यांचे निकटतम प्रतिद्वंद्वी भाजपचे गजानन नळे यांचे वर १,३९४ मतांचे अधिक्य घेतले आहे. राजकीय चर्चेनुसार वंचित, काँग्रेस, राष्ट्रवादी व सेना हे एकत्रित लढले असते तर त्यांना ५,५३६ मते प्राप्त झाली असती. आणि विधानसभेत एकत्र असलेले आणि लोकसभेतही एकत्रच राहणारे भाजप, प्रहार यांना ४,१५२ मते मिळाली असती. म्हणजे महाविकास आघाडीने महायुतीवर १,३८४ मतांनी मात केली असती.

त्यामुळे वंचित, काँग्रेस, राष्ट्रवादी व सेना यांनी भाजप व मित्रपक्षांविरोधात एकास एक उमेदवार दिल्यास भाजप व मित्र पक्षांचा पराभव सहजतेने होऊ शकतो असे या निकालाने स्पष्ट झाले आहे. म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीकरिता विद्यमान महाविकास आघाडीने वंचितशी हात मिळवणी करावी असे राजकीय जाणकारांमध्ये बोलले जात आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: