हेमंत जाधव
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबान खंडपिठाने स्थगिती दिली. ही स्थगिती म्हणजे देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्यांना दिलेला दणका आहे. याचे कारण सरकारीकरण झालेल्या या मंदिरात या पूर्वी दानपेटी लिलाव घोटाळ्यात देवीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, रत्ने, तसेच भाविकांनी अर्पण केलेली रोख रक्कम यांचा 8.50 कोटींहून अधिक रकमेचा अपहार झालेला आहे.
कदाचित् ही रक्कम म्हणजे हिमनगाचे टोकही असू शकते. विशेष म्हणजे या प्रकरणी अद्याप एकाही दोषीवर कारवाई झालेली नाही. दागिने वितळवण्याच्या प्रक्रियेद्वारे सोन्या-चांदीमध्ये घट दाखवून पूर्वी झालेला भ्रष्टाचार दडपून टाकला जाण्याचा धोका होता. नुकतेच देवीचा पाऊण किलोपेक्षा अधिक वजनाचा सोन्याचा मुकुट, तसेच मंगळसूत्र गायब झाल्याचे उघडकीला आले होते. न्यायालयाच्या निर्णयाने या संभाव्य भ्रष्टाचाराला आळा बसला.
पारदर्शक व्यवहार होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन या प्रकरणातील याचिकाकर्त्या आणि हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी केले. ‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू. त्याला भाविकांनी साथ द्यावी’, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रकरणी ज्येष्ठ अधिवक्ता संजीव देशपांडे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू.(श्री.) सुरेश कुलकर्णी, तसेच अधिवक्ता उमेश भडकावकर यांनी बाजू मांडली.
मंदिरांतील भ्रष्टाचार प्रकरणी हिंदु जनजागृती समिती हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून वर्ष 2015 पासून जनहित याचिकांद्वारे लढा देत आहे. या प्रकरणी नेमलेल्या पहिल्या चौकशी समितीने १५ जणांवर ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावेत, असे म्हटले होते; पण या प्रकरणी दुसरी चौकशी समिती स्थापन करून पहिल्या समितीचा अहवाल पालटण्यात आला आणि पहिल्या चौकशी अहवालात दोषी ठरलेल्यांना ‘क्लीन चीट’ देण्यात आली.
सर्वपक्षीय सरकारांना या प्रकरणात दोषींवर कारवाई होण्याविषयी रस नाही; किंबहुना त्यांच्याकडून अशा भ्रष्टाचार्यांना पाठीशीच घातले जात आहे, हे दुर्दैवी आहे. हा भाविकांच्या श्रद्धेला लाथाडण्याचा प्रकार आहे. श्री तुळजाभवानी देवीचा खजिना आणि जमादार खान्यातील अतिप्राचीन, ऐतिहासिक अन् पुरातन सोन्या चांदीच्या वस्तू, मौल्यवान अलंकार, प्राचीन नाणी यांचा अपहार झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
या प्रकरणामध्ये राजे-महाराजेंनी देवीला अर्पण केलेली ऐतिहासिक आणि पुरातन 71 नाणी, देवीचे 2 चांदीचे खडाव जोड आणि माणिक गायब आहेत. या प्रकरणी चौकशी समितीने ठपका ठेवलेल्या दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही. श्री तुळजाभवानी देवीची प्राचीन 71 नाणी गायब झालेल्या प्रकरणात 1 महंत, 3 तत्कालीन अधिकारी आणि 2 धार्मिक व्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक श्री. दीक्षित यांचे वर्ष 2001 मध्ये निधन झाले. त्यानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रीया न करता तत्कालीन सर्व अधिकार्यांनी त्यांच्या घरातून किल्ल्या आणून त्याचा वापर चालू केला. हे बेकायदेशीर कृत्य वर्ष 2001 ते 2005 या कालावधीत झालेले आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविक श्रद्धेने दान देत असतात. त्या प्रत्येक दागिन्यांचा हिशोब चोख रहाणे, तसेच त्याच्या नोंदी असणे आवश्यक आहे. सोने-चांदी वितळवण्याच्या प्रक्रियेत संबंधित दोषींचा अपहार दडपण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने-चांदी वितळवण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती.