जिल्हयातील खनिकर्माने बाधित तसेच दुर्गम गावातील सर्वच नागरीकांना मोठा फायदा होणार…
फिरते दवाखाना मार्फत प्रत्येक गावात आरोग्य तपासणी व उपचार…
रामटेक – राजु कापसे
नागपूर जिल्हयातील ग्रामिण भागात अनेक गावे ही दुर्गम भागात असून ग्रामिण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्या येण्यासाठी फार लांबचा प्रवास करावा लागतो. अनेक गावातील लोक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्राची मागणी करतात. परंतु अपुरे मनुष्यबळ व आर्वती खर्चाअभावी ते उपलब्ध करून देणे शक्य होत नव्हते.
अनेक रूग्ण आजार वाढेपर्यंत रूग्णालयात जात नाही व प्रकृती खालावल्यानंतर रूग्णालयात जातात. त्यामुळे उशीरा रोगाचे निदान झाल्याने उपचार करणे अवघड जाते. त्यामुळे तपासणी होऊन पुर्वीच निदान होणे गरजेचे असते. अनेक रूग्ण किंवा नागरिक आर्थिक अडचणींमुळे व त्यांची मजुरी बुडेल या कारणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयापर्यंत वेळेवर जात नाही.
अनेक महिला स्तनाचे कर्करोग व गर्भशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असतात. परंतु ते आपले त्रास दुसऱ्यांना सांगत नाही व वेळेवर उपचार होत नाही. त्यामुळे वेळेवर रोगाचे निदान व उपचार न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. उपरोक्त बाब विचारात घेता “दवाखाना आपल्या दारी” हे उपक्रम सुरू करून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ज्या ज्या गावात आरोग्य सुविधा व सोयी पुरविणे शासनाला शक्य झाले नाही,
त्यामुळे अश्या अस्तित्वातील आरोग्य सुविधेला सहाय्यभुत असतील अश्या आरोग्य सुविधा निर्माण करणे हे जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे उद्दिष्ट असल्याने हा उपक्रम राबविण्याची मागणी व संकल्पना रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठाणच्या बैठकित मांडली होती. या प्रस्तावाला भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला व दिनांक २०/१०/२०२३ च्या जिल्हा खनिज प्रतिष्ठाणच्या बैठकित मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली होती.
त्यावर जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त प्रस्तावाला दिनांक १७/११/२०२३ रोजी मंजूरी प्रदान करून जिल्हा खनिज निधीतुन रू. ९,४२,४०,८७७/- ऐवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून ज्या रूग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत किंवा शासनाच्या इतर निधीतून किंवा सीएसआर अंतर्गत ज्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत त्या सर्वांचा योग्य वापर करून अतिरिक्त सुविधा ज्यात मोबाईल तपासणी युनिट व फिरता दवाखाना निर्माण करून आता सर्व प्रकारच्या रूग्णांची तपासणी,
शारीरिक आरोग्य तपासणी, त्यावरील उपचार पुरवून जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खनिकर्माने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित गावांना प्राधान्याने आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. या उपक्रमा अंतर्गत गावागावातुन आवश्यकते प्रमाणे रूग्णांना टेलीमेडीसीन मार्फत टेली कन्सल्टेशन घेण्यात येईल. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी मार्फत ही योजना राबविण्यात येणार असून जिल्हयात सर्व नागरीकांना यातुन मोठा दिलासा मिळणार आहे.
भविष्यात आवश्यकतेनुसार रूग्णांना आरोग्य सेवेच्या दृष्टीने अतिरीक्त निधी लागल्यास तो देखिल जिल्हा खनिज प्रतिष्ठाणच्या निधीतुन उपलब्ध करून देण्यात येईल. भविष्यात सर्व नागरीकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची काळजी घेवुन या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठाणचे सदस्य यांनी आमदार आशिष जयस्वाल यांनी जनतेला केले आहे.