आकोट – संजय आठवले
आकोट येथे माजी आमदार संजय गावंडे यांचे नेतृत्वात सर्वपक्षीय लोकांनी मराठा आरक्षण आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेवर पुरुषोत्तम आवारे यांनी ही भूमिका मनोज जरांगे यांच्या मागणीला छेद देणारी असल्याचे वक्तव्य केले. त्यावर आवारें यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची ओबीसी बाबतची भूमिका काय आहे? याची माहिती लोकांना द्यावी असा पलटवार माजी आमदार संजय गावंडे यांनी केला आहे.
यासंदर्भात माजी आमदार संजय गावंडे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करून आवारे यांना उपरोक्त जबाबदारी पार पाडण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, माननीय पुरुषोत्तम आवारे पाटील,
मी मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे या मताचा आहे. परंतु त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील बहुसंख्य असलेल्या ओबीसींवर अन्याय होऊ नये असेही माझे ठाम मत आहे. 346 जातींचा समावेश ओबीसी मध्ये असून त्यांना जवळपास १७ ते १९ टक्के आरक्षण मिळते. मराठा समाजाची मोठी संख्या लक्षात घेता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी पूर्वीपासूनच होत आहे. त्याबद्दल मा. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना १२ ते १३ टक्के आरक्षण स्वतंत्रपणे मिळवून देण्याची कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात जमा केलेली होती.
परंतु माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेमुळे ते आरक्षण मिळाले नाही असा आरोप करून फडणविसांनी जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामूळे आता गत १३ महिन्यांपासून त्या कागदपत्रांद्वारे फडणविसांनी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण का मिळवून दिले नाही? याचा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. मराठा विरुद्ध ३४६ जाती यांच्यात भांडणे लावण्याची ही वेळ नाही हे निश्चित.
माननिय फडणवीस यांच्याच सांगण्याप्रमाणे १२ ते १३ टक्के आरक्षण मराठ्यांना स्वतंत्रपणे मिळत असतांनाही त्यांचा समावेश ओबीसी मध्ये करून मराठ्यांचे व ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचा डाव कुणाचा आहे हे सांगण्याकरिता कुण्या भविष्यकार गरज नाही. मी पक्षाचा नेता वगैरे नसून एक शिवसैनिक आहे. आजपर्यंत मला, माझ्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला, परिचितांना ओबीसी आरक्षणाचा फायदा झाला आहे, हे मी नाकारू शकत नाही.
सर्व पक्षीय आंदोलन म्हणजे सर्वांचा पुढाकार. त्यामुळे आंदोलन यशस्वी करण्याची जबाबदारी एका पक्षाची किंवा व्यक्तींची नसून सर्वांचीच असते. त्यामुळे पुरुषोत्तम पाटल यांनी जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांकडून त्यांची ओबीसी बद्दलची भूमिका काय आहे हे जाणून घ्यावे. आणि लोक कल्याणार्थ ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावी ही विनंती.
– संजय ल गावंडे आकोट