Monday, November 18, 2024
Homeराज्यखामगांव जिल्हा बुलडाणासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचा सहभाग...शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत ७६वा निरंकारी...

खामगांव जिल्हा बुलडाणासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचा सहभाग…शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत ७६वा निरंकारी संत समागम संपन्न…

जगभरातून दररोज सुमारे १० लाख भाविक उपस्थित

सर्वांशी प्रेमपूर्ण व्यवहार केल्यास अवघ्या विश्वात शांतीमय वातावरण निर्माण होईल – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज

खामगांव – हेमंत जाधव – 31 ऑक्टोबर, 2023: ‘‘सर्वांभूती परमात्म्याचे रूप पाहून प्रेमपूर्ण व्यवहार केल्यास विश्वात शांतीमय वातावरण निर्माण होईल.’’ असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी 76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन सत्रामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.

शांती-अंतर्मनाची: ‘शांती- अंतर्मनाची’ या मुख्य विषयावर आधारित हा तीन दिवसीय संत समागम निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा, हरियाणा येथे आयोजित करण्यात आला ज्यामध्ये देशाच्या कानाकोप-यातून तसेच जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले होते. खामगांव तसेच जिल्हा बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या संत समागमामध्ये सुमारे 2 लाख भाविक भक्तगण सहभागी झाले होते ज्यामध्ये सुमारे 20 हजार सेवादल स्वयंसेवकांचाही समावेश होता. दररोज सुमारे 10 लाख भाविक या समागमामध्ये भाग घेत होते.

सद्गुरु माताजींनी सांगितले, की विश्वामध्ये जी प्राकृतिक व सांस्कृतिक स्वरुपातील बहुमुखी विभिन्नता आहे ती सुंदरतेचे प्रतीक आहे. वास्तविक या संपूर्ण सृष्टीचा निर्माता हा निराकार परमात्मा असून सर्वांभूती त्याचेच रूप सामावले आहे. या परम तत्वाचा बोध झाल्यानंतर सहजच आपण एकतेच्या धाग्यात गुंफले जातो आणि आपला दृष्टीकोन विशाल होतो. मग आपण संस्कृती, खाणे-पिणे इत्यादिंच्या कारणावरुन असलेले समस्त भेदभाव विसरुन सर्वांशी प्रेमपूर्ण व्यवहार करु लागतो.

महामहीम राज्यपालांची उपस्थिती:

हरियाणाचे महामहीम राज्यपाल श्री बंडारू दत्तात्रेय यांनी तिस-या दिवशी समागमात येऊन सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी त्यांनी आपले शुभभाव व्यक्त करताना जगभरातून आलेल्या समस्त निरंकारी भक्तांना शुभकामना दिल्या व मिशनकडून केल्या जाणा-या मानव कल्याणाच्या कार्याची प्रशंसा केली.

मानवतेच्या नावे संदेश: समागमाच्या पहिल्या दिवशी 28 ऑक्टोबर रोजी समागमाच्या शुभारंभ प्रसंगी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेच्या नावे दिलेल्या संदेशामध्ये म्हटले, की ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण होण्यासाठी प्रत्येक मानवाच्या अंतर्मनात शांती यायला हवी.’’

समर्पणाची गरज: पहिल्या दिवशीच्या मुख्य सत्राला संबोधित करताना उपस्थित लाखोंच्या जनसागराला संबोधित करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की ईश्वराच्या प्रति समर्पित मनुष्यच मानवतेची यथार्थ सेवा करु शकतो आणि एक सच्चा मानव बनून अवघ्या विश्वासाठी कल्याणकारी जीवन जगू शकतो. सेवा वं समर्पणाची भावना अंगीकारल्यानेच जीवनात शांतीसुखाचा अनुभव येऊ शकतो तथापि, एखादी वस्तु, मान-प्रतिष्ठा किंवा उपाधिच्या प्रति जर आपली आसक्ती जोडली़ असेल तर आपल्या अंतर्मनात समर्पण भाव उत्पन्न होऊ शकत नाही.ईश्वराच्या प्रति कृतज्ञता बाळगा

दुस-या दिवशी सायंकाळी सत्संगाच्या मुख्य सत्रामध्ये उपस्थित लाखोंच्या मानव परिवाराला संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जर आपण शांतीसुखाचे जीवन जगू इच्छित असू तर ईश्वराची ओळख करुन त्याच्या प्रति निरंतर कृतज्ञता व्यक्त करत राहणे नितांत गरजेचे आहे.सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या मस्तकातील ज्या केंद्रातून कृतज्ञतेचा भाव प्रकट होतो त्याच केंद्रातून चिंतेचा भावही उत्पन्न होत असतो.

आता कोणता भाव ग्रहण करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. जर आपण कृतज्ञतेचा भाव धारण करु तर निश्चितच आपल्या अंतर्मनात चालू असलेली चलबिचल हळू हळू संपून जाईल आणि त्या जागी केवळ शांतीसुखाचा निवास होऊ लागेल.

निरंकारी राजपिताजी यांचे विचार समागमामध्ये दुस-या दिवशी निरंकारी राजपिताजींनी आपले भाव प्रकट करताना सांगितले, की सद्गुरुचा एकेक भक्त स्वयमेव ‘शांती’ची परिभाषा बनून जातो. त्याचे सद्गुणांनी युक्त जीवनच जगामध्ये शांतीचा संदेश प्रसारित करते. खरं तर शांतीचा संदेश आपल्याला सदोदित दिला जात आहे.

तथापि, विडंबना ही आहे, की तो संदेश आपण सहजपणे स्वीकार करत नाही. त्यामुळे आपण एका अनमोल अशा ज्ञानरुपी दौलतीपासून वंचित राहतो जी प्राप्त करण्यासाठी मनुष्य जन्म मिळाला आहे. शांतीसुखाची दौलत सद्गुरुकडून प्राप्त होणा-या ब्रह्मज्ञानाद्वारे परमसत्य ईश्वराशी एकरुप झाल्यानेच प्राप्त होते, असे ते शेवटी म्हणाले.

सेवादल रैली: समागमाच्या दुस-या दिवसाचा प्रारंभ एका आकर्षक सेवादल रैलीने झाला. या रॅलीमध्ये भारतभरातून व विदेशातूनही हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे बंधु-भगिनी सहभागी झाले. भारतातील पुरुष स्वयंसेवकांनी खाकी तर महिलांनी निळी-श्वेत वर्दी परिधान केली होती तर विदेशातील सेवादल बंधु-भगिनींसाठी निर्धारित केलेली वर्दी त्यांनी परिधान केली होती.

सेवादल रैलीला संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की समर्पित भावनेने केली जाणारी सेवाच स्वीकार्य असते. जिथे कुठेही सेवेची आवश्यकता असेल त्यानुसार सेवेचा भाव मनात ठेवून जेव्हा आपण सेवेमध्ये भाग घेतो तेव्हा ती सेवेची शुद्ध भावनाच महान सेवा गणली जाते.

बहुभाषी कवि दरबार: समागमाच्या अंतिम सत्रात ‘सुकून – अंतर्मन का’ (शांती अंतर्मनाची) या विषयावर आयोजित बहुभाषी कवी संमेलन समस्त भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनून राहिले. या कवी संमेलनामध्ये देश-विदेशातून आलेले जवळपास 25 कवींनी आपल्या सुंदर भावना हिंदी, मराठी, पंजाबी, उर्दू, नेपाळी, आणि इंग्रजी भाषांच्या माध्यमातून सादर केल्या.

उल्लेखनीय आहे, की यावर्षी समागमाच्या पहिल्या दिवशी बाल कवी दरबार तर दुस-या दिवशी महिला कवि दरबार देखील आयोजित करण्यात आले ज्याचा भक्तगणांनी भरपूर आनंद प्राप्त केला.

निरंकारी प्रदर्शनी: संत समागमामध्ये सत्संग पंडालच्या पाठीमागील बाजूस निरंकारी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मिशनचा इतिहास, विचारधारा आणि मिशनचे देश-विदेशातील मानवतावादी सामाजिक कार्य यांचे सुरेख चित्रण मॉडेल्स, छायाचित्रे तसेच दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले.

यावर्षी या प्रदर्शनीमध्ये नजर-ए-सुकून, दिदार-ए-सुकून, रहमतें-ए-सुकून, बहार-ए-सुकून, एतबार-ए-सुकून, उम्मीद-ए-सुकून आणि सुकून-ए-सद्गुरु अशी आठ दालने तयार करण्यात आली होती..

या व्यतिरिक्त यावर्षी प्रदर्शनीला 6 भागांमध्ये विभाजित करण्यात आले आहे ज्यामध्ये मुख्य प्रदर्शनी व्यतिरिक्त स्टुडिओ डिव्हाईन, बाल प्रदर्शनी, स्वास्थ्य व समाज कल्याण विभाग प्रदर्शनी, थिएटर आणिं डिजाईन स्टुडिओ इत्यादिंचा समावेश आहे.

निरंकारी प्रकाशन व पत्रिका: मंडळाच्या प्रकाशन व पत्रिका विभागाकडून समागम स्थळावर 20 स्टॉल्स लावण्यात आले होते ज्यामध्ये भाविकांना मिशनचे साहित्य, फोटो, डायरी, कॅलेंडर तसेव ‘सुकून – अंतर्मन का’ ही समागम स्मरणिका इत्यादि सामग्री प्राप्त होत आहे. पत्रिकांचे नवीन सभासद नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कार्यालय पत्रिका विभागाकडून उपलब्ध करण्यात आले होतेे.

कॅन्टीन: समागम स्थळ हे चार मैदानांमध्ये विभागले होते व सर्व मैदानांवरएकंदर 22 कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली होती ज्यामध्ये उपाहाराची सर्व सामुग्री, चहा, कॉफी, थंडपेये व अन्य पदार्थ अत्यल्प दरात उपलब्ध करण्यात आले होते.

लंगर: समागमाच्या चारही मैदानांवर लंगर (महाप्रसाद)ची पर्याप्त व्यवस्था करण्यात आली होती. सर्व जातीधर्माचे लोक एकत्र बसून भोजन करताना दिसत होते ज्यामुळे वसुधैव कुटुंबकमचे चित्र साकार होत होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: