पातुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पातुर – निशांत गवई
फायनान्स कंपनीची नोंदणी करून त्या कंपनीच्या माध्यमातून काही लोकांना आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 60 लाख 66 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका दांपत्याविरुद्ध पातुर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर प्राप्त माहिती अशी की पातुर येथील सिदाजी वेटाळ येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी सहदेव गाडगे व सहदेव लक्ष्मण गाडगे यांच्या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की या लोकांनी एक फायनान्स कंपनी नोंदणीकृत केली. या फायनान्स कंपनीच्या माध्यमातून कमी पैशातून अधिक आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. कंपनीवर विश्वास बसण्यासाठी काही कागदपत्रे दाखविण्यात आले.
तसेच स्टॅम्प पेपरवर व्यवहाराबाबत लेखी लिहून देण्याचे सांगण्यात आले. या सर्व बाबींना भूलून काही लोकांनी आर्थिक व्यवहार केले. जवळपास 60 लाख 66 हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी पातुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कैलास रामराव बगाडे रा. गुजरी लाईन पातुर यांच्यातर्फे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मीना घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420, 34 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी हा गुन्हा दाखल केला असून ते स्वतःच या प्रकरणाचा तपास करीत आहेत. यातून आणखी काय काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.