महेंद्र गायकवाड, नांदेड : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी उपोषण सुरु आहे. तर अनेक गावांमध्ये नेते, मंत्री, आमदार यांना प्रवेश बंदी करण्यात आलीय. दरम्यान हिंगोलीचे शिवसेना खासदार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनाम दिला आहे. विशेष म्हणजे ते शिंदे गटाचे असल्याने त्यांच्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
नांदेड येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर खासदार हेमंत पाटील यांनी शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना शौचालय साफसफाई करायला लावले होते. त्यामुळे खासदार हेमंत पाटील राज्यात चर्चेत आले होते. तर आता मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्याने पुन्हा चर्चेत आले आहे.
मराठा समाजातील आरक्षणाची मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांना लिहिलेल्या पत्रामध्ये, ‘ महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा समाजाच्या भावना या विषयी अतिशय तीव्र आहेत. मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी मी अनेक वर्ष भांडत आहे. त्यामुळे मराठा समाजच्या आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठींबा आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे.