मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काही भागात चोरटे मोकाट असल्याचे दिसत आहे, मागील काही दिवसांपासून शहरासह परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. या चोरीच्या घटनांचा पोलीस तपास करीत आहे. मात्र चोरींवर अंकुश ठेवण्यात शहर पोलीस अपयशी ठरत आहे. मूर्तिजापूर शहरातील कंझरा रोडवरील एमआयडीसीमध्ये असलेल्या कृष्णा ॲग्रो मिलमध्ये दसऱ्याच्या मध्यरात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने मिलच्या गेटचा कडी कोंडा तसेच काचेच्या कॅबिनचे लॉक तोडून २ लाख ३५ हजार रुपये रोख व ५१ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केला. याप्रकरणी श्वान पथक व ठसे तज्ज्ञानांही पाचारण करण्यात आले होते.
कृष्णा अॅग्रोे मिलचे अनुप ओमप्रकाश अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मिलमधील काचेच्या कॅबिन मधील टेबलच्या ड्राव्हरमध्ये चिल्लर विक्रीचे रोख २ लाख ३५ हजार व चांदीचे सिक्के, मूर्ती अंदाजे किंमत ५१ हजार ८०० असा एकूण २ लाख ८६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. घटनेचे गांभीर्य पाहता ठाणेदार भाऊराव घुगे यांनी तत्काळ अकोला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, डॉग युनिट, ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. मात्र अद्याप चोरीचा कोणताच सुगावा लागला नाही. मात्र चोरट्यांनी गेटचा कुलूप कोंडा तोडण्याकरिता वापरण्यात आलेले साहित्य आवारात सापडल्याने सदर प्रकरणी लवकरच तपास लागल्याचे आश्वासन सहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी दिले.
या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४६१, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखेडे करीत आहेत.