सांगली – ज्योती मोरे
आपण ज्याप्रमाणे आपल्या जन्मदात्या मातेच्या ऋणामधून कधीच मुक्त होऊ शकत नाही त्याचं पद्धतीने आपण आपल्या भारत मातेच्याही ऋणामधून कधीच मुक्त होऊ शकणार नाही, सदैव आपल्या भारत मातेच्या प्रती प्रगल्भ कृतज्ञभाव राखून आपण आपले निरंतर कर्तव्य पार पाडत रहावे, असा मौलिक सल्ला भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष, सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पै. पृथ्वीराजभैय्या पवार यांनी दिला.
लोकनायक शिक्षण मंडळ सांगलीच्या श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यशवंतनगर, सांगली येथील शारदीय नवरात्रौत्सव महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पृथ्वीराजभैय्या पवार बोलत होते.
समारोप प्रसंगी बोलताना पृथ्वीराजभैय्या पवार म्हणाले, आपल्या भारत देशाची संस्कृती जगप्रसिद्ध असून आज जगात या संस्कृतिचा प्रत्येक देश अनुकरण करत आहे.
पुत्र जसा आपल्या मातीच्या ऋणामधून मुक्त होऊ शकत नाही तसाच तो आपल्या भारत मातेच्याही ऋणातून कदापीही मुक्त होऊ शकणार नाही. आपल्या भारत मातेप्रती सदैव कृतज्ञभाव राखून आपण आपले कर्तव्य पार पाडत रहावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या अनुकरणशील मनांवर लहानपणापासूनच हे स्तुत्य विचार रुजवण्यासाठी श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूलच्या सर्वच घटकांनी शारदीय नवरात्र उत्सवाचा हा जो उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. असे कार्यक्रम वरचेवर घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी.
संस्थेचे अध्यक्ष अरुणदादा दांडेकर, उपाध्यक्ष पै. गौतमभैय्या पवार, सचिव डॉ. निलेश पतकी, सहसचिव रामचंद्र देशपांडे, शाळा समिती अध्यक्ष डॉ. शुभदा गोखले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. जयकुमार चंदनशिवे यांच्या प्रेरणेतून आणि मुख्याध्यापक दत्तात्रय कुंभार आणि पर्यवेक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शारदीय नवरात्र उत्सव महोत्सव राबविण्यात आला.
या महोत्सवाअंतर्गत 5 मिरज शहर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील कुमार गिल्डा यांच्या ‘लोकमान्य भारत’, ईश्वर रायण्णवर यांच्या ‘भारत को मानो-भारत को जानो’ या विषयावर झालेल्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रभावित झाले. पालकांसाठी हळदी कुंकू व मनोरंजनाचे खेळ-तद्नंतर दांडिया खेळाचे आयोजन केले होते.
योगगुरु मोहन जगताप यांचे योगासने या विषयावर प्रबोधनपर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले. शिवराष्ट्र कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे पथक प्रमुख संतोष सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने झांज पथकाचे बहारदार प्रात्यक्षिक करून सर्वांची मने जिंकली. शारदीय प्रभात फेरीने या महोत्सवाची सांगता झाली. प्रभात फेरीत विद्यालयातील कलाशिक्षक प्रकाश गुदले यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन करुन कार्यक्रमात उत्साह आणला.
सांस्कृतिक विभागातील श्रीनिवास जाधव, महादेव केदार, सुरेश जाधव, आनंदी बामणे, अनिता घोरपडे, सुवर्णा मगदूम, प्रकाश गुदले, शाळा समिती शिक्षक प्रतिनिधी साधना सातपुते तसेच नमिता कुलकर्णी यांनी संयोजन केले.