अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या महिला अधीक्षक कीर्ती राजेश चिंतामणी यांची नियुकी करण्यात आली आहे. गेल्या मंगळवारी सरकारने राज्यातील 8 मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या कारागृह अधीक्षकाची जबाबदारी यवतमाळ जिल्हा कारागृहात कार्यरत जेलर कीर्ती राजेश चिंतामणी यांच्याकडे देण्यात आली आहे. त्या उद्या मंगळवारी किंवा बुधवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यापूर्वी कीर्ती राजेश चिंतामणी हे कोण आहेत आणि त्यांच्या कामगिरीबद्दल बरीच चर्चा आहे.
पुण्यातील येरवडा ते मुंबई आणि नागपूर या कारागृहात काम करताना अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या अफाट अनुभवामुळे अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी त्यांची निवड करण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून अमरावती मध्यवर्ती कारागृह विविध प्रकरणांमुळे चर्चेत आहे. तर मध्यवर्ती कारागृहातही दारू आणि गांजाच्या पुरवठ्याची प्रकरणे समोर आली आहेत. मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असण्याबरोबरच अनेक मोठे गुंड आणि दहशतवादी कैदीही आहेत. मात्र कीर्ती चिंतामणी यांच्याकडे पुणे येरवडा कारागृहाचा बराच अनुभव असल्याने अमरावतीच्या कैद्यांना चांगलेच वठणीवर आणणार. त्यांनी यवतमाळ कारागृहातील कैद्यांना शिस्तीत आणलं. त्याचप्रमाणे अमरावती मध्यवर्ती कारागृहातही शिस्त पाळत कैद्यानाही शिस्त लावणार आहेत. अमरावती मध्यवर्ती कारागृहात अनेक शिक्षा झालेले कैदी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात काम करून कारागृह प्रशासनाला आर्थिक फायदा करून दिला होता. आता तसेच कैद्यांच्या कौशल्याची चाचणी घेतल्यानंतर त्यांना आणखी चांगली संधी उपलब्ध करून देणार आहेत.
कीर्ती चिंतामणी याचं संघर्षात जीवन
कीर्ती चिंतामणी हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे बालपण आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे गेले. त्या शाळेत कला आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर होत्या. त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. 1995 मध्ये त्याचं लग्न झाले आणि लग्नानंतर शिक्षण सुरू ठेवले. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी एलएलएम आणि एलएलबीचे शिक्षण घेतले. पण मुलांच्या जन्मानंतर काही वेळाने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा खरा संघर्षाचा काळ सुरू झाला. मुलांचा सांभाळ करण्याबरोबरच शेती साहित्याचा व्यवसाय करून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर एमपीएससीची परीक्षा दिल्यानंतर 2012 मध्ये त्यांची नियुक्ती येरवडा कारागृहात झाली. त्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृह, यवतमाळ, मुंबई, भायखळा जिल्हा महिला विशेष कारागृह आणि तेथून पुन्हा यवतमाळ येथे नियुक्ती करण्यात आली. नागपुरात याकुब मेमनला फाशी दिली त्यावेळी त्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये उपस्थित होत्या आणि आता त्यांच्याकडे अमरावती मध्यवर्ती कारागृहाची जबाबदारी देण्यात आली आहे. आंध्रप्रदेशात राहून सुद्धा आपल्या मराठी भाषेला विसरले नाहीत. मुर्तीजापुरचे अशोक जोशी, विशाल वर्मा हे त्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक तेही त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात.
2018 मध्ये समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
मिळालेल्या माहितीनुसार, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना 2018 मध्ये राज्यपालांच्या हस्ते एकमेव सुवर्णकार समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांनी अनेक उच्चभ्रू प्रकरणांमध्ये सहभाग घेतला आहे.