रिक्षा चालकांचे लायसन्स /बॅच व रिक्षाचे कागदपत्रं तपासणी बाबत रिक्षा संघटनेकडून विनंती अर्ज स्थानिक पोलीस प्रशासनाला सादर…
टिटवाळा – कल्याण / प्रफुल्ल शेवाळे
ठाणे जिल्ह्यातील महागणपतीकरिता तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या टिटवाळा शहरात बोगस रिक्षा चालकांचा तसेच मुजोर रिक्षाचालकांचा सुळसुळाट आणि बेकायदेशीर दुचाकी वाहन पार्किंग दिवसेंदिवस नजरेत पडल्याचं चित्र दिसून येत आहे .
टिटवाळा शहरातील गणपती मंदिर चौक ते टिटवाळा रेल्वे स्टेशन तसेच वाजपेयी चौक ते निमकर नाका, दळवी वाडा व परिसर व इतरही ठिकाणच्या रस्त्यावर दुतर्फा, हातगाडी,बाईक, चारचाकी वाहने पार्किंग करून लोकं दिवसभर जातात. त्यामुळे वाहतुकीची खूप कोंडी होत आहे,
त्यामुळे अत्यावश्यक सेवेची वाहने जसे की अग्निशमन दलाचे वाहन ,रूग्णवाहिका, रिक्षा व इतरही अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडथळा निर्माण झाल्यामुळे त्यांना वेळेवर नियोजित ठिकाणी पोहोचता येतं नाही. अनेक वेळा रिक्षा प्रवाशांची गाडी चुकते व त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येतं नाही.
शाळा-कॉलेज मध्ये वेळेवर न पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे आपल्या दैनंदिन मधील अमुल्य वेळ वाया जातो. तसेच काही बेजबाबदार रिक्षा चालक ही रिक्षा रस्त्यावर लावून ठेवतात.व रहदारीस अडथळा निर्माण करतात.काही रिक्षा या मुंबई तसेच ठाणे RTO कक्षातील असल्याचे दिसून येत आहे.
तरी अशा सर्वच रिक्षा चालकांचे लायसन्स/बॅच व गाडीची कागदपत्रे तपासणी करावी जेणेकरून अधिकृत रिक्षा चालकांना प्रामाणिक पणे रिक्षा व्यवसाय करता येईल व रहदारीस अडथळा होणार नाही.
सदर विषयी पोलीस प्रशासनाने सहानुभूती पूर्वक लक्ष देवून योग्य ती कारवाई करण्यासाठी गणपती मंदिर परिसरातील रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष श्री.देवा पाटील यांनी कागदोपत्री विनंती अर्ज केला आहे.