खामगाव – हेमंत जाधव
एक तारीख,एक घंटा, एक साथ.. स्वच्छता ही सेवा अभियानात मोठ्या संख्येने सामील व्हा असे आवाहन आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 25 सप्टेंबर रोजी वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर जयंती पर्यंत संपूर्ण भारतात सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.
यानंतर अंतर्गत विविध सामाजिक कामे व उपक्रम राबविले जात आहेत. याच अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त एक आगळावेगळा भव्य उपक्रम राबविण्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ठरविले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना “स्वच्छांजली” म्हणून श्रद्धांजली वाहण्याचे ठरविले आहे.
यानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी एक तारीख, एक घंटा, एक साथ… स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविले जाणार आहे. संपूर्ण भारतात एकाच वेळी सकाळी 10 ते 11 वाजे पर्यंत स्वच्छता मोहीम राबविले जाणार आहे. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ, सार्वजनिक स्थळ, नदी नाले, आदीं ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
या अभियानात शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिसर स्वच्छ करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहावी असे आवाहन आ.अँड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.