आकोट – संजय आठवले
तेल्हारा बाजार समिती सभापती व उपसभापती या दोघांच्याही जामीनावर ३० सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली असून यावेळी जामिनाला विरोध करणेकरिता तक्रार पक्षाने जोरदार तयारी केली आहे. या दरम्यान तक्रारकर्त्याने खुलासा केला असून आपली सत्यता प्रामाणिक करणेकरीता त्याने आपला बाजार समितीशी झालेला पत्रव्यवहार प्रस्तुत केला आहे.
दिनांक २५ सप्टेंबर रोजी तेल्हारा बाजार समिती सभापती सुनील इंगळे व उपसभापती प्रदीप ढोले यांचे वर लाच प्रतिबंधक पथकाने कारवाई केल्यानंतर आकोट न्यायालयाने या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांचे जामीनाकरिता ३० सप्टेंबर ही तारीख मुक्रर केली आहे. या दिवशी त्यांचे जामीनावर युक्तिवाद करण्यात येऊन फैसला देण्यात येणार आहे.
या दरम्यान या प्रकरणातील तक्रारदार गौरव धुळे यांनी महाव्हाईस कडे खुलासा दिला असून दोन्ही आरोपींनी आपणास लाच मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पुष्ट्यर्थ त्यांनी बाजार समिती सोबत आपण केलेला पत्रव्यवहार प्रस्तुत केला आहे. यामध्ये बाजार समिती व धुळे यांचे दरम्यान झालेला करारनामाही आहे. या करारनाम्यातील क्रमांक ३ च्या अटी व शर्तीनुसार नाफेडकडून रक्कम आल्यानंतर धनादेशाद्वारे ती रक्कम कंत्राटदारास देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यानुसार कंत्राटदार धुळे यांनी दिनांक ५.७.२०२३ रोजी बाजार समिती सभापती व सचिव यांना पत्र देऊन आपल्याला ऍडव्हान्स स्वरूपात एक लक्ष रुपये देण्याची विनंती केली आहे. त्यानंतर धुळे यांनी बाजार समितीला दिनांक १७.९.२०२३ रोजी पत्र देऊन हमालीची रक्कम १४ लक्ष ३९ हजार ५९२ रुपये होत असल्याचे आणि त्यातील काही रक्कम ऍडव्हान्स म्हणून धनादेशाद्वारे आपल्याला मिळाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर उर्वरित रक्कमही धनादेशाद्वारे देण्याची विनंती या पत्रात केली आहे.
या सोबतच धूळे यांनी बाजार समितीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी व स्वतःला दिलेली तीन पत्रेही प्रस्तुत केली आहेत. त्यातील जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना बाजार समितीने पाठविलेल्या पत्रात यावरील तारीख अस्पष्ट असून “आपल्या कार्यालयाकडून मिळालेल्या रकमेचा तपशील येणे बाबत” असा पत्राचा विषय नमूद आहे. त्यात म्हटले आहे कि, “आपल्या संस्थेमार्फत आधारभूत किंमत खरेदी, अनुषंगिक खर्च, वाहतूक भाडे, कमिशन व इतर काही रक्कम प्राप्त झालेली आहे. परंतु सदर रक्कम कशापोटी अदा केलेली आहे याबाबतचा संपूर्ण तपशील आपल्या कार्यालयात वारंवार व पूर्वी मागणी करून सुद्धा देण्यात आलेला नाही.”
अशी स्थिती सांगून बाजार समितीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना हा तपशील पाठविण्याची विनंती करून पुढे म्हटले आहे कि, हा तपशील प्राप्त झाल्यास आपणाकडून आलेली रक्कम ज्या हेडवर आलेली आहे त्या हेडवर खर्च करणे, जमाखर्चाची नोंद घेणे व पावत्या तयार करणे सोयीचे होईल आणि आमच्या रोख वहीत नोंद घेता येईल.”
या पत्रानंतर बाजार समितीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना पुन्हा दिनांक २९.९.२०२२ रोजी पत्र देऊन ज्यामध्ये “सन २०२१-२२ व २०२२-२३ मध्ये नाफेड खरेदी संदर्भात प्राप्त रकमेचे विवरण मिळणे बाबत” असा विषय आहे. या पत्रात म्हटले आहे की सन२०२१-२२ व २०२२-२३ पर्यंत खरेदी केलेल्या व त्या पोटी प्राप्त रकमेचे विवरण देण्यात यावे. जेणेकरून आमचा जमाखर्च व्यवहार कॅशबुकला नोंद करणे सोयीचे होईल.”
अशाप्रकारे तेल्हारा बाजार समितीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त रकमेचे विवरण वारंवार मागितले. परंतु त्यांनी ते विवरण तेल्हारा बाजार समितीला अद्यापही दिले नाही. त्यामुळे बाजार समितीने दिनांक १.९.२०२३ रोजी तक्रारकर्ता गौरव धुळे यांना पत्र दिले. ज्यात म्हटले आहे कि, ” आपण शासनाच्या आधारभूत किमंत योजने अंतर्गत नाफेड हरभरा खरेदी सन २०२२-२३ हमालीचा ठेका आपणास नियमानुसार देण्यात आलेला आहे.
त्यानुसार आपण जो करारनामा करून दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हमालीची रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यावर देण्यात येईल असे नमूद केलेले आहे. मात्र आपली आर्थिक अडचण लक्षात घेऊन आपल्याला बाजार समितीने स्वनिधीतून रक्कम दिलेली आहे. व उर्वरित रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्या बरोबर आपणास देण्यात येईल.
वास्तविक शासनाकडून जी रक्कम आम्हाला प्राप्त झालेली आहे. ती कशापोटी मिळालेली आहे, याचे विवरण आम्ही जिल्हा मार्केटिंग कार्यालयाला वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात मागणी केलेली आहे. तरी अद्याप पर्यंत ते आमच्या संस्थेला प्राप्त झालेले नाही.”
जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रांच्या प्रति बाजार समितीने गौरव धुळे यांना दिल्या आहेत. त्या प्रती महाव्हाईसला दाखवून सभापती व उपसभापती यांनी आपल्याला लाच मागणी केली आणि लाच प्रतिबंधक विभागाचे माध्यमातून आपण पुढील कार्यवाही केली. असा खुलासा या प्रकरणातील तक्रारकर्ता गौरव धुळे यांनी केला आहे.