नागपुरात शुक्रवारी रात्री ढगफुटी सारखा पाउस बरसल्याने संपूर्ण शहर पाण्याखाली आले असून लोकांच्या मदतीसाठी NDRF तैनात केले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे काम सुरु आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे नागपुरातील अनेक रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले.
मुसळधार पावसामुळे सखल भागात पूरस्थिती
नागपूर विमानतळावर पहाटे साडेपाच वाजेपर्यंत १०६ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. मुसळधार पावसामुळे नागपुरातील अनेक भाग जलमय झाले असून रस्ते जलमय झाले आहेत. परिस्थिती पाहता प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे अंबाझरी तलाव ओसंडून वाहत आहे. आजूबाजूचा सखल भाग मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. शहराच्या इतर भागातही अनेक ठिकाणी पाणी साचल्याची स्थिती आहे.
एनडीआरएफ-एसडीआरएफ पथके तैनात
उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना काही ठिकाणी अडकलेल्या लोकांना तातडीने बाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीमही तैनात करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नागपुरातील सखल भागात असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. अंबाझरी तलाव परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने अंबाझरी परिसरातून सहा जणांची सुखरूप सुटका केली आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना वाचवण्यासाठी अजूनही ऑपरेशन सुरू आहे. नागपुरातील रामदासपेठ परिसरातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती आहे.
Torrential Rainfall Submerges City Roads. #Nagpur pic.twitter.com/FZjv52A8Ib
— TOI Nagpur (@TOI_Nagpur) September 23, 2023