खामगांव व बुलढाणा जिल्ह्यातील तथा छ.संभाजीनगर परिक्षेत्रातील सेवादार भक्तांच्या तुकड्या जाणार सेवेसाठी
नर सेवा, नारायण पूजा – निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
खामगांव – हेमंत जाधव
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या शुभहस्ते 76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ रविवार, दि.17 सप्टेंबर रोजी समालखा (हरियाणा) येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळाच्या पावन भूमीवर करण्यात आला. जसे सर्वविदितच आहे, की यावर्षी वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक 28, 29 व 30 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे.
या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य, केन्द्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे सदस्य, सेवादल अधिकारी, स्वयंसेवक तसेच दिल्ली व जवळपासच्या राज्यांसह इतर राज्यांतील भाविक भक्तगणांनी उपस्थित राहून दिव्य जोडीचे हार्दिक स्वागत केले.
उल्लेखनीय आहे, की भव्य रुपात आयोजित करण्यात येत असलेल्या या या संत समागमाच्या पूर्वतयारीसाठी समागम सेवांमध्ये भाग घेण्यासाठी शेगाव व बुलडाणा जिल्ह्यातील तथा छ.संभाजीनगर परिक्षेत्रातील सेवादल सदस्य व अन्य भक्तगणांच्या तुकड्या समागम स्थळावर पोहचत असून समागम संपन्न होईपर्यंत सातत्याने आपल्या सेवा देत राहणार आहेत.
सेवांच्या या शुभारंभ प्रसंगी भाविक भक्तगणांना संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की सेवा केवळ तनाने होत नाही तर मनापासून केली जाते आणि तेव्हाच ती सार्थक गणली जाते. नि:स्वार्थ व निष्काम भावनेने केलेली सेवा सर्वोत्तम असते असे सांगून त्या म्हणाल्या, की ब्रह्मज्ञानाचा बोध प्राप्त झाल्यानंतरच आपल्या अंत:करणात ‘नर सेवा, नारायण पूजा’ हा उदात्त भाव उत्पन्न होतो.
कारण त्यावेळी आपण प्रत्येक मानवामध्ये या निराकार प्रभूचेच रूप पाहत असतो. सद्गुरु माताजींनी सेवेच्या सार्थकतेबद्दल निरंकारी भक्तगणांना आवाहन केले, की निरंकारी मिशनच्या प्रत्येक भक्ताने याठिकाणी प्राप्त होणाऱ्या उदात्त शिकवणूकीतून सतत प्रेरणा घेऊन एका सुंदर समाजाच्या नवनिर्मितीमध्ये आपले योगदान द्यावे.
समागम स्थळावर सेवांचे विधिवत् उद्घाटन झाल्याबरोबर सेवेला ईश्वर भक्तीचा एक अनुपम उपहार मानणाने भाविक भक्तगण हजारोंच्या संख्येने मोठ्या तन्मयतेने सक्रीय झाले आणि आपापला खारीचा वाटा उचलु लागले. भाविक भक्तगणांना हे चांगले ठाऊक आहे, की निस्वार्थ भावनेने तन-मन-धनाने केली जाणारी सेवा ही भक्तीचे सरळ आणि प्रभावी माध्यम आहे.
म्हणूनच ते कोणत्याही सेवेची संधी न दवडता ‘नर सेवा, नारायण पूजा’ ही भावना कृतीत उतरवत तिला प्राथमिकता देतात. वास्तविक पाहता सेवेचा भावच मनुष्यामध्ये खऱ्या अर्थाने मानवतेचा दिव्य संचार करत अहंकाररहित करतो.