Wednesday, October 30, 2024
Homeराजकीयहिवरखेड ग्रामपंचायत कार्यकारिणी अपात्र करण्याची मागणी… आयुक्तांनी दिला चौकशीचा आदेश… जि प...

हिवरखेड ग्रामपंचायत कार्यकारिणी अपात्र करण्याची मागणी… आयुक्तांनी दिला चौकशीचा आदेश… जि प मुख्य अधिकारी यांचे कडे २२ सप्टेंबर रोजी सुनावणी…

आकोट – संजय आठवले

हिवरखेड ग्रामपंचायत, नगर परिषदेत रूपांतर होण्यापूर्वीच लक्षावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ही ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी करण्यात आल्याने अमरावती आयुक्त यांनी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी अकोला यांना चौकशीचे आदेश दिले असून येत्या २२ सप्टेंबर रोजी याप्रकरणी पहिली सुनावणी मुक्रर करण्यात आली आहे. यावेळी उभय पक्षांचे जाब जबाब नोंदविले जाऊन हा अहवाल आयुक्त अमरावती यांचेकडे पाठविण्यात येणार आहे.

हिवरखेड ग्रामपंचायत नगरपरिषदेत रूपांतरित होण्यापूर्वीच हिवरखेड ग्रामपंचायत कार्यकारिणी बाबत हिवरखेडात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. गजानन रामदास बंड, कामिनअली शोएबअली मिरसाहेब, सुनील मोतीराम इंगळे,कुमारी ऑंचल सुरेश ओंकारे, सौ. वेणूताई ईश्वर इंगळे आणि वसीम बेग वकील बेग या सहा सदस्यांनी सरपंच सौ. वैशाली गणेश वानखडे,

उपसरपंच रमेश सदाशिव दुतोंडे, सदस्य सीमा संतोष राऊत, अब्दुल रजाक शेख महबूब, मंगेश रामचंद्र ताडे, ऋतिका सुमित ढबाले, नसरीन खातून अब्दुल सादिक, नंदाताई अरुण मानकर आणि रवी मधुकरराव घूंगळ या नऊ लोकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

यासोबतच ग्राम विकास अधिकारी ए. एम. खुमकर यांना निलंबित करण्याची व आरोप ठेवण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यकारिणीतील लोक व खुमकर यांचेवर फौजदारी अपराध दाखल करण्याचीही मागणी या सहा लोकांनी केली आहे. मागील काळात या कार्यकारिणीच्या करण्यात आलेल्या तक्रारींच्या शासकीय चौकशी अहवालाच्या आधारे ही मागणी करण्यात आली आहे. या चौकशी अहवालामध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचेवर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत.

पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने घनकचरा व स्वच्छता कामांकरिता लक्षावधी रुपयांच्या घरगुती व सार्वजनिक उपयोगाच्या कचराकुंड्या, घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. परंतु चौकशी वेळी या साहित्याच्या तांत्रिक मूल्यांकनाबाबत ग्रामपंचायतने चौकशी अधिकाऱ्यांना एकही दस्त व साठा पंजी उपलब्ध करून दिली नाही. १०,२०० घरगुती कचराकुंड्यांचे वितरण कुणाला व कधी केले? सार्वजनिक उपयोगाच्या ५७ कचराकुंड्या नेमक्या कुठे ठेवल्या? त्याची स्थळदर्शक माहिती व साठा पंजी ही सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली नाही.

कचरा उचलणेकरिता घेतलेल्या १० घंटागाड्या कुठे ठेवल्यात? त्या उपयोगात आहेत अथवा नाहीत? याचीही माहिती दडवून ठेवण्यात आली. निविदेनुसार कमी दर असल्याने हे साहित्य श्री फॅब्रिकेशन्स कडून खरेदी करण्यात आले. मात्र याची रक्कम एस. के. सेल्स अकोला यांना अदा करण्यात आली. खरेदी केलेल्या साहित्याची गुणवत्ता प्रमाणित करणेकरिता शासकीय नियमानुसार लागणारे गुणवत्ता प्रमाणपत्र सक्षम यंत्रणे कडून घेण्यात आलेले नाही.

त्यामुळे या साहित्याची गुणवत्ता प्रमाणित होत नाही. या साहित्याचा पुरवठा त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी याबाबत कोणताही करारनामा करण्यात आलेला नाही. या साहित्य खरेदीवर भरणा करावयाचा जीएसटी भरणा करण्यात आलेला नाही.

गावातील जुन्या नाल्यांवरच लक्षावधी रुपयांचे बांधकाम दाखवून देयके प्रदान करण्यात आली. असे अनेक आरोप सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व सत्ताधारी अन्य सदस्य यांचे वर करण्यात आलेले आहेत. या आरोपांमुळे हिवरखेड ग्रामपंचायत कार्यकारिणीने लक्षावधी रुपयांचा अपव्य व अपहार केल्याचे दिसून येते. त्यामुळे उपरोक्त सहा सदस्यांनी हिवरखेड ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त करण्याची व ग्राम विकास अधिकारी यांना निलंबित करून त्यांचे सह या कार्यकारिणीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

आयुक्त अमरावती यांनी ही याचिका स्वीकृत करून जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अकोला यांना याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरून मुख्य कार्यपालन अधिकारी अकोला यांनी संबंधितांना नोटिसेस बजावल्या आहेत. त्यानुसार दिनांक २२ सप्टेंबर रोजी अर्जदार व गैरअर्जदार या उभय पक्षांची सुनावणी अकोला येथे ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांचे जाब जबाब, लेखी युक्तिवाद संकलित करून ही माहिती आयुक्त अमरावती यांचेकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर याप्रकरणी निवाडा देण्यात येणार आहे.

येथे उल्लेखनीय आहे कि, सरपंच व उपसरपंच धरून हिवरखेड ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ आहे. यामध्ये प्रहार ५, भाजप २ व अपक्ष २ अशा ९ लोकांनी सत्ता स्थापन केलेली आहे. त्या विरोधात काँग्रेस ४, वंचित १ व अपक्ष १ अशा ६ सदस्यांनी ही तक्रार केलेली आहे. तर २ सदस्य तटस्थ भूमिकेत आहेत.

सरपंच सौ. वैशाली गणेश वानखडे ह्या प्रहार पक्षाशी संबंधित असून उपसरपंच रमेश दुतोंडे हे आमदार प्रकाश भारसाकळे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या प्रकरणी ग्रामपंचायत मधील सत्ताधारी पक्षाला राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या २ आमदारांचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. या तक्रारीमुळे हिवरखेड शहरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी होणाऱ्या निवाड्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: