अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत येथील विनोद वेरूळकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके, उपाध्यक्ष महादेवराव भुईभार व सचिव भांबुरकर यांनी जानेवारी २०१३ मध्ये संस्थेत शिक्षकाची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून वेगवेगळ्या तारखेला एकूण दहा लाख रुपये घेतले, असा आरोप वेरूळकरयांनी केला आहे.
वेरूळकर यांनी त्यांची परिस्थिती चांगली नसतानाही मित्र व नातेवाईकांकडून ही रक्कम घेऊन या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून संस्थेकडे जमा केली. त्याबाबत संस्थेच्या नावाने इमारत निधी, देणगी अशा शीर्षकांच्या पावत्या त्यांना देण्यात आल्या. परंतु या सर्व रक्कम जमा झाल्यावरही या तिघांनी त्यांना नोकरी दिली नाही.
याबाबत वेरुळकर यांनी पाठपुरावा केला असता त्यांना पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळी कारणे व अडचणी सांगून वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली.या दरम्यान २०१३ ते २०१७ मध्ये या पदाधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशावरून श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे संचालित नांदुरा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये पूर्णवेळ शिक्षक म्हणून त्यांनी सेवा दिली.
या सेवेची मस्टरला नोंद घेतली नाही. तसेच अनुभव प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर तेसुद्धा दिले गेले नाही. तसेच विद्यमान अध्यक्षांनीही नवीन भरतीत तुमचा आधी विचार करू असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनीही नोकरी दिली नाही, अशी तक्रार विनोद वेरूळकर यांनी केली आहे. न्याय मिळण्याच्या मागणीसाठी वेरूळकर यांनी पत्नी व मुलांसह उपोषण सुरू केले आहे.