अकोला – उरळ पोलिस स्टेशनअंतर्गत कसुरा येथे मुलांनी बापावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवार, २४ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपी मुलांना घुसर येथील रस्त्यावर उरळ पोलिसांनी अटक केली.
छाया ताथोड यांनी उरळ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती जितेंद्र ताथोड (४३) हे घरी असताना त्यांचे सावत्र मुले राम बाळू ताथोड
(२८) व बजरंग बाळू ताथोड (२२, रा. घुसर, ता. अकोला) यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घराचा हिस्सा मागितला असता, जितेंद्र ताथोड यांनी नकार दिला. त्या कारणाने दोन्ही भावांनी संगनमताने जिवे मारण्याची धमकी देत कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात जितेंद्र ताथोड हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी छाया ताथोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा
दाखल केला होता. दोन्ही आरोपी घुसर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई ठाणेदार गोपाल ढोले, पोलिस उपनिरीक्षक सागर गोमासे, एएसआय सुलताने, पो. हवा झाकर्डे, अनिल येन्नेवार, मुळे, वैतकर, अशोक पटोकार, इम्रान खान, रघनाथ नेमाडे, विकास राठोड, हरीहर इंगळे, नंदकिशोर तांदळे, निखिल माळी, पंजाबराव इंगळे यांनी केली.