राहेगाव, भायेगाव, कीकी, कौडगाव येथील ग्रामस्थांशी साधला संवाद…
नांदेड – महेंद्र गायकवाड
आतापर्यंत ज्या गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. त्यामुळे जी गावे विकासापासून वंचित राहिले आहेत.अशा विकासापासून वंचित असणाऱ्या गावांसाठी विकास निधी मंजूर करू आणि या गावांना विकासाच्या प्रवाहात आणू असे आश्वासन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले.
भाजपा बूथ सशक्तीकरण अभियानानिमित्त खा. चिखलीकर हे आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भायेगाव ,राहेगाव , किकी आणि कौडगाव या गावांना भेटी दिल्या. यावेळी ते ग्रामस्थांशी संवाद साधत होते.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्रामीण भागातील ज्या ज्या बुथवर भाजपाला मतदान कमी झाले त्या त्या बुथला सक्षम करण्याच्या अनुषंगाने सशक्तिकरण अभियान राबविले जात आहे .या अभियानाच्या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज भायेगाव, राहेगाव , किकी आणि कौडगाव येथे दौरा केला . चारही गावांमध्ये खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आतापर्यंत या भागाच्या विकासासाठी जो निधी उपलब्ध करून देणे आवश्यक होता तो निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या भागातील अनेक गावे विकासापासून वंचित राहिले आहेत . या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता आहे यासह अनेक प्रश्न ग्रामस्थांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढे ठेवली. ग्रामस्थांशी संवाद साधत असताना या भागातील नागरी समस्यांची माहितीही खा. चिखलीकर यांनी जाणून घेतली.
राहेगाव किकी मार्गावर असलेल्या नदीवर गेल्या अनेक वर्षापासून पुल उभारण्यात आला नाही त्यामुळे सर्वसाधारण पाऊस झाला तरी या मार्गावरील गावांचा संपर्क तुटतो . परिणामी नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते .त्यामुळे या नदीवर पूर उभारण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी राहेगावच्या ग्रामस्थांनी खा. चिखलीकर यांच्याकडे केली. या मागणीच्या अनुषंगाने निश्चितपणे सकारात्मक विचार करत येथे पूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन खा. चिखलीकर यांनी यावेळी दिले.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे .त्यामुळे देशाला बलशाली भारत करण्यासाठी ग्रामीण भागाचे सक्षमीकरण झाले पाहिजे त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाचे केंद्र सरकार शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवत आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही त्या नागरिकांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
अधिकारी सहकार्य करत नसतील तर भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी निश्चितपणे त्या त्या लाभार्थ्याला त्या त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील असा विश्वासही खा. चिखलीकर यांनी यावेळी दिला.
या दौऱ्यात भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, माजी पंचायत समिती सदस्य व्यंकोबा पाटील येडे , नांदेड दक्षिणचे भाजपा तालुका अध्यक्ष बालाजी पाटील पुणेगावकर, लोहा तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे पत्रकार संग्राम मोरे , संदीप देशमुख, योगेश कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .दरम्यान खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा भायेगाव, राहेगाव, किकी आणि कौडगाव येथे ग्रामस्थांनी भव्य सत्कार केला . यावेळी नागरिक आहे मोठ्या संख्येने उपस्थित होते.