मुंबई – गणेश तळेकर
आपल्या खमक्या स्वभावाने नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ नवरे का आणि कशासाठी शोधतेय? हे जाणून घ्यायचं असेल तर ११ ऑगस्टला रंगभूमीवर येणारं किरकोळ नवरे हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल.
हसून हसून दमछाक करणार डामचिक नाटक अशी टॅगलाईन असलेल्या या नाटकात अभिनेत्री अनिता दाते हिच्यासोबत सागर देशमुख, पुष्करराज चिरपुटकर दिसणार आहेत. अनामिका + युवांजनी नाटक मंडळी निर्मित, साईसाक्षी प्रकाशित या नाटकाचे लेखन – दिग्दर्शन सागर देशमुख याचे आहे.
आजवर वेगवेगळया भूमिकांमधून या तिघांनी आपली कमाल दाखवली आहे. आता एकत्र येत हे तिघे काय धमाल करतात यासाठी हे नाटक पहायला हवं.
मनोरंजनातून अंजन घालणारे हे नाटक करताना आम्ही खूप मजा करतोय. प्रेक्षकही हे नाटक तितकचं एन्जॉय करतील असा विश्वास हे तिघे व्यक्त करतात.
किरकोळ नवरे हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच, पण नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही बोलणारं आहे.
या नाटकाचे निर्माते अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक, दिनू पेडणेकर आहेत. दिग्दर्शन सहाय्य कल्पेश समेळ तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. संगीत सौरभ भालेराव यांचे असून गीते जितेंद्र जोशी यांनी लिहिली आहेत. प्रकाशयोजना विक्रांत ठकार तर वेशभूषा सोनल खराडे यांची आहे.
शुक्र. ११ ऑगस्ट दु. ४.१५ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे आणि शनि.१२ ऑगस्ट दु. ४:३० वाजता सावित्रीबाई फुले, डोंबिवली येथे या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.